स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करताना सादर करावयाच्या पुराव्याबाबतचे सुधारीत आदेश – २०२५ election voting evidence list
परिपत्रक येथे पहा pdf download
संदर्भ :-
१) राज्य निवडणूक आयोगाचे समक्रमांकाचे दि. २९ मार्च, २०१०, दि. ८ नोव्हेंबर, २०११, दि. ६ फेब्रुवारी, २०१२, दि. २ ऑगस्ट, २०१२ चे आदेश.
२) राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक-रानिआ/मनपा-२०१०/प्र.क्र.४/का.५,
दि.२२ ऑक्टोबर, २०१०
आदेश
विधानसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटविण्याकरिता मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त १२ पुरावे ग्राह्य धरता येतील असे आदेश दि. १७ ऑक्टोबर, २०२४ रोजी निर्गमित केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने आदेश क्र. रानिआ/मनपा/२००९/प्र.क्र.१६/का-०५ दि. ८ नोव्हेंबर, २०११ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये मतदारांची ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १७ कागदपत्रे सादर करण्यास परवानगी दिली होती. तसेच या विषयास अनुसरुन उपरोक्त संदर्भात नमूद केल्यानुसार स्पष्टीकरणात्मक आदेश काढले होते. हे सर्व आदेश रद्द करून आता त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे झाले असल्यामुळे पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :-
१. मतदान केंद्राध्यक्षाने मतदारास आपली ओळख पटविण्याकरिता प्रथम फोटो असलेले निवडणूक ओळखपत्र सादर करण्यास सांगावे. असे ओळखपत्र सदर मतदाराकडे उपलब्ध नसल्यास किंवा त्यावरून त्या मतदाराची ओळख पटत नसल्यास खालील पुराव्यांपैकी कोणताही पुरावा सादर करण्याची सूचना मतदान केंद्राध्यक्ष मतदारास करेल व त्यानुसार मतदाराची ओळख पटल्यानंतर मतदारास मतदान करू देईल.
परिपत्रक येथे पहा pdf download
अन्य पुरावे
१ .भारताचा पासपोर्ट
२ .आधार ओळखपत्र
३ .वाहन चालविण्याचा परवाना
४ .आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र
५ .केंद्रशासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेली ओळखपत्रे
६ .राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
७ .सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
८. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील, फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA जॉब कार्ड)
९. निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.
१० लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
११ स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
१२ केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड
२. उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधींनी मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप घेतल्यास किंवा मतदाराने सादर केलेल्या ओळखीच्या पुराव्याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास मतदान केंद्राध्यक्ष त्याबाबत संपूर्ण शहानिशा करेल व आवश्यकता वाटल्यास इतर ओळखीच्या पुराव्यांची मागणी करून मतदाराच्या ओळखीची संपूर्णतः खात्री पटल्यानंतरच त्यांना मतदान करू देईल. जर एखादा मतदार असा ओळखीबाबतचा समाधानकारक पुरावा/कागदपत्रे सादर करू न शकल्यास त्यास मतदान करू देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत तोतया मतदाराकडून मतदान होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मतदान केंद्राध्यक्षांची असेल.
३. स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार यादी विधानसभेच्या मतदार यादीवरुन तयार करण्यात येते. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये जर काही मतदारांच्या नावासमोर त्यांचे फोटो अथवा अन्य तपशील चुकीचा छापण्यात आला असल्यास त्या तपशीलात सुधारणा करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास नाहीत. मात्र जर अशा मतदारांची ओळख राज्य निवडणूक आयोगाने या आदेशात विहित केलेल्या पुराव्यांच्या आधारे पटत असेल तर त्या मतदारास मतदानाची परवानगी देण्यात यावी.
४. भारत निवडणूक आयोगाच्या दि. १७ ऑक्टोबर, २०२४ च्या आदेशानुसार परदेशात रहात असलेल्या मतदारांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम २० अ मधील तरतुदीनुसार त्यांच्या भारतीय पासपोर्टच्या आधारे विधानसभेच्या मतदार यादीमध्ये मतदार नोंदणी केली असल्यास, अशा मतदारांना केवळ त्यांचा मूळ पासपोर्ट हा पुरावा तपासूनच मतदान करु द्यावे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,