500+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ marathi mhani artha
अ
* अडला नारायण गाढवाचे पाय धरी: आपले काम करून घेण्यासाठी कनिष्ठ किंवा मूर्खाला नमस्कार करावा लागतो.
* अतिशहाणा त्याचा बैल रिकामा: स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्या व्यक्तीकडून कोणतीही सुयोग्य अथवा खरेखुरे शहाणपण दर्शवणारी कृती घडून येत नाही.
* असतील शिते तर जमतील भुते आपल्याजवळ पैसा, साधनसंपत्ती असेतोपर्यंत मित्रांचा गोतावळा जमतो.
* अति तेथे माती : मर्यादेचे उल्लंघन झाले म्हणजे माणसाची किंमत उरत नाही.
* अति रागा भीक मागा: अतिरागामुळे मनुष्य भिकेला लागतो.
* अग अग म्हशी मला कुठे नेशी स्वतःची चूक मान्य न करता ती चूक दुसऱ्याच्या माथी मारणे.
* असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ : संगत करण्यास अयोग्य असणाऱ्या माणसाशी संगत केल्यास जिवाला धोका असतो.
* अचाट खाणे मसणात जाणे : खाण्यापिण्यात अतिरेक करणे हे अनेक रोगांचे मूळ आहे.
* असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा : अनुकूलता असेल त्यावेळी चैन करणे, विपत्तीचे दिवस आले म्हणजे रडणे.
* अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण : मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.
* अन्नाचा मारलेला खाली पाही, तलवारीचा मारलेला वर पाही : सौम्यपणामुळे मनुष्य नरम करता येतो, उद्धटपणाने तो आपला शत्रू होतो.
* अर्धी टाकून सगळीला धावू नये : सबंध वस्तू मिळविण्याच्या हव्यासापायी हाती आलेली अर्धी वस्तू टाकून देणे हा मूर्खपणा आहे.
* सत्पात्री दान महापुण्य गरजू माणसाला दिल्याने मोठे पुण्य लागते.
* अन्नसत्री जेवणे व मिरपूड मागणे : फुकट तर जेवायचे व पुन्हा मिजास दाखवायची.
* आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना : दोन्हीकडून अडचण
* आजा मेला, नातू झाला एखादे नुकसान झाले असता, त्याचवेळी फायद्याची दुसरी गोष्ट घडणे.
* आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? आतच जे नाही ते बाहेर कसे होईल ? जे मुळातच नाही, त्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
* आपला हात जगन्नाथ : करील ती पूर्व दिशा.
* आयजीच्या जिवावर बायजी उदार : दुसऱ्याच्या पैशावर औदार्य दाखविणे.
* आधी पोटोबा मग विठोबा आधी स्वार्थ, मग परमार्थ.
* आयत्या बिळात नागोबा : दुसऱ्याने स्वतः करिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती.
* आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास आधीच आळशी असलेल्या व्यक्तीस त्याच्या आळशीपणास पूरक अशी स्थिती निर्माण होणे.
* आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटे: आपले ते चांगले दुसऱ्याचे ते वाईट.
* आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसांनी केलेल्या चुका लोकांत स्पष्ट करून दाखविता येत नाहीत.
* आपण हसे लोका, शेंबूड आपल्या नाका: ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो, तोच दोष आपल्या ठिकाणी असणे.
* आले अंगावर घेतले शिंगावर प्रसंग आल्यास तो निभावून नेणे.
* आधी बुद्धी जाते, मग लक्ष्मी जाते: आधी आचरण बिघडते, मग अवदसा येते.
* आपली पाठ आपणास दिसत नाही आपलेच दोष आपल्या लक्षात न येणे.
* आगीतून उठून फुफाट्यात पडणे : छोट्या संकटातून निघून मोठ्या संकटात जाऊन पडणे.
* आभाळास ठिगळ कोठवर लावणार : सारखी संकटे कोसळत असताना त्यांचे सारखे निवारण करणे शक्य नसते.
* आधणातले रडतात आणि सपातले हसतात: आज जे सुखात आहेत. त्यांना उद्या दुःखाची स्थिती येणे, हे सृष्टीनियमानुसार आहे.
* आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन : एखाद्या गोष्टीची हौस आणि त्यात दुसऱ्याचे उत्तेजन.
* आकारे रंगती चेष्टा: मनुष्याच्या बाह्य स्वरूपावरून त्याच्या हातून घडणाऱ्या कृतीचे स्वरूप ताडता येते.
* आंधळ्या-बहिन्याशी गाठ : एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ.
* आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते : एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
* आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे : एका इच्छित गोष्टीबरोबर अनपेक्षितपणे दुसरी एखादी गोष्ट मिळणे.
* आत्याबाईला मिश्या असत्या तर काकाच म्हटले असते : न होणाऱ्या गोष्टीबद्दल चिकित्सा करण्यात काही अर्थ नसतो.
इ
* इकडे आड, तिकडे विहीर : दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती असणे,
उ
* उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग : अतिशय उतावळेपणा करणे.
* उथळ पाण्याला खळखळाट फार : थोडासा गुण असणाऱ्या माणसाला
अतिशय गर्व असतो.
* उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता बोलणे.
* उधाराचे पोते सव्वा हात रिते : उधार जिन्नस महाग मिळाल्यामुळे पुरवठ्यास येत नाही.
* उचल पत्रावळी म्हणे जेवणार किती ? : जे काम करायचे ते सोडून भलत्या गोष्टींची उठाठेव कशाला ?
* उखळात डोके घातल्यावर मुसळाला कोण भितो? : येईल ते संकट सोसायला मन तयार झाल्यावर कशाचीच भीती राहत नाही.
* उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही अत्यंत बिकट अवस्था.
* उपट सूळ घे खांद्यावर : नसते लचांड मागे लावून घेणे.
* ऊन पाण्याने घरे जळत नसतात एखाद्यावर खोटे आरोप केल्याने त्याची बेअब्रू होत नाही.
* उंटावरून शेळ्या हाकणे स्वतः काही न करता दुसऱ्याला उपदेश करीत राहणे.
* उंदराला मांजर साक्षी दोघेही एकमेकांचे साथीदार.
ए
* एक ना धड भाराभार चिंध्या सगळेच अपूर्ण.
* एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात दोघांचाही दोष असतो.
* एका माळेचे मणी : सगळेच सारखे.
* एक घाव दोन तुकडे : झटपट निकाल लावणे.
* एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये : एकाने वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहानशीदेखील वाईट गोष्ट करू नये.
* एक पंथ दो काज : एकाच मार्गावरची दोन कामे एका खेपेत करता येतात.
* एका कानाने ऐकावे व दुसऱ्या कानाने सोडून द्यावे : एखादी गोष्ट ऐकून
घ्यावी; पण त्याप्रमाणे वर्तन करू नये.
* एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत : दोन तेजस्वी माणस शेजारी-शेजारी राहू शकत नाहीत.
* एकदा कानफाट्या नाव पडले की पडले : लोकांमध्ये अप्रीती निर्माण झाली की ती सहजा जात नाही.
* एकाची जळते दाबी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी : दुसऱ्याच्या संकटाचा विचार न करता त्यापासूनसुद्धा स्वतःच्या यत्किंचितही फायदा करून घेणारा.
* ऐकावे जनाचे करावे मनाचे: लोकांचे मत घ्यावे, पण आपल्या मनाप्रमाणे करावे.
ओ
* ओळखीचा चोर जीवे न सोडी : ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
अं
* अंगापेक्षा बोंगा मोठा वस्तुस्थितीपेक्षा तिचे अवडंबरच मोठे.
* अंथरूण पाहून पाय पसरावेत: ऐपतीच्या मानाने खर्च ठेवावा.
* आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी जेथे अडाणी माणसे जमलेली असतात त्यात थोडासा जाणता असला तर तो सर्व मंडळींत मोठा पंडित म्हणून गणला जातो.
क
* कर नाही त्याला डर कशाला? : ज्याच्या हातून गुन्हा घडला नाही त्याला भीती कशाला?
* करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय? : प्रत्येक पदार्थाच्या वाढीला मर्यादा असते,
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळळे, तरी कडू ते कडूच दर्जन कशानेही सुधारत नाहीत.
ॐ कधी तुपाशी, कधी उपाशी : सांसरिक स्थितीत बदल होणे.
*कवळी-कवळी माया जोडी कृपणपणाने धनसंचय करणे.
करावे तसे भरावे : ज्या प्रकारचे कृत्य करावे, त्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात.
* काळ्यापेक्षा पिठा दगड बरा : दोन्ही वस्तूंतील एक वस्तू अधिक बरी.
* कसायला गाय धार्जिणी: दुष्ट आणि कठोर माणसाशी सारे लोक गरिबीने वागतात.
* काट्याचा नायटा (होतो): एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास होणे.
* काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही: खऱ्या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.
* काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाहीत थोड्याशा अधिकाराने जे काम होते ते पुष्कळशा पैशानेदेखील होत नाही.
* काडीचोर तो माडीचोर क्षुल्लक अपराध करणाऱ्या व्यक्तीचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.
* कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर पाहिलेली गोष्ट व ऐकलेली गोष्ट यात केव्हा केव्हा अंतर असते.
* कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही वाईट माणसाच्या निंदेने थोरांचे उणे होत नाही.
* काळ आला होता, पण वेळ आली नव्हती: नाश होण्याची वेळ आली असता थोडक्याच बचावणे.
* कानामागून आली आणि तिखट झाली : मागून येऊन वरचढ होणे.
* काप गेले नि भोके राहिली वैभव गेले नि फक्त त्याच्या खुणा राहिल्या.
* कामापुरता मामा : काम साधून घेण्यापुरते गोड गोड बोलणे.
* काही सोन्याचा गुण, काही सोनाराचा : एखादी गोष्ट घडवून आणण्यात जसे थोरामोठ्यांचे तसेच तुंग्यासुंग्यांचेही साहाय्य होते.
* कुडास कान, ठेवी ध्यान : सावधगिरीने बोलणे,
* कुड़ी तशी पुडी : देहाप्रमाणे आहार.
* कुचेष्टेवाचून प्रतिष्ठा नाही : तावूनसुलाखून निघणे.
* कुन्हाडीचा दांडा गोतास काळ : होणे. कुटंबातील व्यक्ती नाशास कारण
* कुसंतानापेक्षा निसंतान बरे : वाईट पुत्र असण्यापेक्षा मुळीच नसलेले बरे.
* कुंभारणीच्या घरात जाईल तो किडा कुंभारीणच होतो : कोणी मनुष्य उलट मतांच्या मंडळीत गेला तर त्यांच्या आदरसत्काराला व गोड बोलण्याला बळी पडून त्यांच्याच पक्षात सामील होतो.
* कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच घडलेली अशी एखादी गोष्ट आज नाही तर उद्या जगजाहीर होईलच.
* कुंपणानेच शेत खाल्ले: ज्याच्या हाती रक्षणाचे काम दिले त्यानेच नुकसान केले.
* केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी अत्यंत दरिद्री अवस्था.
* कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभट्टाची तट्टाणी : एक अति थोर मनुष्य आणि क्षुद्र माणूस यांची बरोबरी करणे हा मूर्खपणा होय.
* कोठे राजा भोज आणि कोठे गंगा तेली: चांगल्या पदार्थाबरोबर क्षुद्र पदार्थाची बरोबरी होत नाही.
* कोरड्याबरोबर ओलेही जळते वाईटाच्या संगतीस चांगला लागल्यास वाईटाच्या नाशाबरोबर चांगल्याचाही नाश होतो.
* कोळसा किती जरी उगाळला तरी काळा तो काळाच : वाईट गोष्टीची कितीही भलामण केली तरी ती चांगली असे कधी ठरावयाचे नाही.
* कोल्हा काकडीला राजी: मोठी वस्तू मिळत नाही असे लक्षात आल्यावर छोट्या वस्तूतही समाधान मानणे.
* कोंबड़े झाकले तरी तांबडे फुटायचे राहत नाही : जी गोष्ट होणारच आहे ती क्षुल्लक अडथळ्यास जुमानत नाही.
* कोंड्याचा मांडा करून खावा : आपल्याला जे मिळत असेल त्यात तृप्त
ख
* खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते: खर्च करणाऱ्याच खर्च होतो, पण दुसराच एखादा त्याबद्दल कूरकूर करतो.
* खऱ्याला मरण नाही: खरे कधी लपत नाही, ते केव्हा ना केव्हातरी उघडकीस आणि प्रत्ययास येते.
* खाई त्याला खवखवे : कोणी वाईट काम केले तर त्याबद्दल त्याच्या मनात सतत डाचत असते व त्याला अस्वस्थ करते.
* खाण तशी माती : ज्या जातीची खाण असेल, त्याच जातीच्या खाणीत माती असावयाची.
* खाऊ जाणे, तो पचवू जाणे जो मनुष्य एखादे कृत्य हिमतीने करावयास उद्युक्त होतो, तो ते शेवटासही नेतो.
* खायला काळ नि धरणीला भार अत्यंत निरूपयोगी मनुष्य.
* खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी आपल्या मनाप्रमाणेच करणे.
* खाऊन माजावे, पण टाकून माजू नये: गैरवापर न करणे.
* खाजवून खरूज काढणे मिटलेली भांडणे पुन्हा उकरून काढणे.
* खिळ्यासाठी नाला गेला, नालासाठी घोडा, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला: क्षुल्लक गोष्टीत जरा जरी हह्यगय केली तर तिचपासून परंपरेने मोठा अनर्थच गुदरतो.
ग
* गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार आईवडिलांचे गुण मुलात उतरतात.
* गरज सरो वैद्य मरो जरूरीपुरती एखाद्याची आठवण काढणे व मग त्यास विसरणे.
* गजरवंताला अक्कल नसते : गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घ्यावे लागते.
* गर्जेल तो बरसेल काय? बडबड करणान्यांच्या हातून कार्य होत नसते.
* गर्वाचे घर खाली : अभिमानाचा परिणाम अपमानात किंया नुकसानीत व्हावयाचा.
* गाजराची पूंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली: झाल्यास फायदा होईल नाहीतर तोटा तरी खास होणार नाही.
* गाड्याबरोबर नळ्याची यात्रा: मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.
* गाड्यावर नाव आणि नावेवर गाडा : गरीबाचा श्रीमंत होतो आणि श्रीमंताचा गरीब होतो.
* गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ : मूर्ख लोक एके ठिकाणी गोळा झाले तर ते मूर्खपणाचीच कृत्ये जातात.
* गाढवाने शेत खाल्ल्याचे ना पाप ना पुण्य : निरूपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात.
* गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता : ज्याच्यात उपदेशाचे ग्रहण करण्याची पात्रता नाही, त्याला उपदेश करण्याचे श्रम न घेता, पूर्वीची गैरसोयी पत्करणे हे अधिक बरे.
* गाढवाला गुळाची चव काय माहीत ? : चांगल्या वस्तूचे नाव, गुण तिच्याशी परिचित नसणाऱ्याला कळत नाहीत.
* गावंढ्या गावात गाढवी सवाशीण जेथे चांगल्याचा अभाव असतो तेथे एका टाकाऊ वस्तूसही महत्त्व येते.
* गाव करी ते राव न करी : एकीची महती.
* गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी : नुसती एखाद्या गोष्टीची अनुकुलता असून उपयोग नाही, तिचा फायदा करून घेण्याची शक्तीही पाहिजे.
* गुरूची विद्या गुरूलाच : एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलविण्याचे कृत्य.
* गूळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी : आपण गरीब असलो तर आपण पैशाने दुसऱ्याला मदत करू शकणार नाही, पण त्याच्याशी गोड
बोलणे शक्य असते.
* गोगलगाय अन् पोटात पाय : बाह्यस्वरूप एक आणि कृन्ती दुसरीच.
घ
* घरोघरी मातीच्या चुली प्रत्येकाच्या घरी सारखीच परिस्थिती.
* घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते : वेगवेगळ्या माणसांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार वेगवेगळे सुखदुःखाचे भोग प्राप्त होतात.
* घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात : प्रतिकूल परिस्थितीत लहान-मोठे सर्वच उलट वागू लागतात.
* घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून : घर बांधल्याशिवाय आणि लग्न केल्याशिवाय त्या त्या कामात किती खर्च किंवा संकटे येतात हे कळत नाही.
* घराची ओज अंगण सांगते: एखाद्या घरात कितपत टापटीपपणा आहे हे अंगणाची स्थिती पाहून समजते.
* घरासारखा पाहुणा होतो, पण पाहुण्यासारखे घर होत नाही : परक्या ठिकाणी मनुष्य गेला असता त्याला त्या ठिकाणाच्या चालीरीती स्वीकाराव्या लागतात. त्या ठिकाणचे लोक त्याच्या चारीरीती, भाषा स्वीकारीत नाहीत.
* घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे स्वतःचे काम झाले नसताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे.
* घर सारव तर म्हणे कोनाडे किती? जे काम करावयाचे ते सोडून भलत्या गोष्टीची उठाठेव कशाला?
* घ घाची विद्या येते पण द द्याची विद्या गावी नाही: घेणे ठाऊक आहे पण देणे ठाऊक नाही.
* घुसळतीपेक्षा उकळतीच्या घरी अधिक : कष्ट करून पोट भरण्यापेक्षा दुसऱ्याला तुबाडणाऱ्याचीच चैन अधिक असणे.
* घोडामैदान जवळ आहे: परीक्षेची वेळ जवळच आहे.
* घर ना दार, देवळी बिऱ्हाड : घरदार, बायकापोरे नसणारा एकटा
च
* चढेल तो पडेल आणि पोहेल तो बुडेल वृथा गर्व करू नये.
* चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे : प्रत्येकाला केव्हातरी महत्त्व येते.
* चालत्या गाड्याला खीळ घालणे : सुरळीत चाललेल्या कामात विघ्न आणणे.
* चोराची पावले चोरास ठाऊक : चोरांची कृत्ये, लबाड्या चोरासच माहिती असतात.
* चोराच्या हातची लंगोटी : ज्याच्याकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे म्हणजे भाग्य.
* चोराला सोडून संन्याशाला सुळी देणे : खऱ्या अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा करणे.
* चोरावर मोर : चोरी करणाऱ्याचीच चोरी केलेली वस्तू चोरून नेणारा.
* चोराच्या मनात चांदणे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात भीती असणे.
* चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे.
छ
* छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम् : लहान मुलांना शिकवताना छडीचा उपयोग वारंवार केल्याने मुलगा भराभरा अभ्यास करू लागतो.
ज
* जगी सर्वसुखी असा कोण आहे? : ज्याला सर्व सुखे प्राप्त झाली आहेत, असा ह्या जगात कोण मनुष्य आहे?
* जनी जनार्दन : पाचामुखी परमेश्वर.
* जन्मा घाली तो भाकर देईल : जो आपणास जन्म देतो, तो आपले पालनपोषण करतो.
* जळते घर भाड्याने कोण घेतो ? : एखादी वस्तू आपले नुकसान करील असे स्पष्ट दिसत असता ती कोण स्वीकारेल ?
* जळात राहून माशाशी वैर करू नये : जेथे आपणास राहायचे आहे तेथे सलोख्याने राहावे.
* जशी देणावळ तशी धुणावळ : दाम तसे काम.
* जसे करावे तसे भरावे: जशी कृती असेल तसे फळ मिळते.
* जन्माला आला हेला, पाणी वाहता मेला: निर्बुद्ध माणसे केवळ
खायला काळ आणि भुईला भार होतात. त्यांच्या हातून कोणतेही कार्य न झाल्यामुळे त्यांचा जन्म वृथा होतो.
* जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे: अनुभव मिळण्यानेच कोणत्याही गोष्टीची कल्पना येते.
* जाईल तेथे हत्ती नाही तेथे मुंगीसुद्धा जाणार नाही : काही ठिकाणी पुष्कळ निरर्थक खर्च होतो, तर काही ठिकाणी क्षुद्र बाबतीतसुद्धा काटकसर होते.
* जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही: मनुष्याला जी खोड लागलेली असेल, तो ती जिवंत आहे तोपर्यंत राहावयाचीच.
* जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी: स्त्रीकडूनच जगाचा उद्धार होतो.
* जी खोड बाळा ती जन्मकळा लहानपणी ज्या सवयी लागतात त्या जन्मभर टिकतात.
* जेवेन तर तुपाशी नाहीतर उपाशी : स्वतःच्या मतानुसार वागणे.
* ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी एकाच ठिकाणचे लोक एकमेकांना पुरेपूर ओळखतात.
* ज्याच्या मनगटात जोर तो बळी मनगटात बळ असेल तर सर्व काही साध्य होते.
* ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे : कधी कधी ज्याच्यावर
आपण उपकार केले आहेत तोच आपल्यावर उलटतो.
* ज्याचे मन त्याला ग्वाही देते : आपण पाप केले आहे किंवा नाही, है ज्याचे मन त्याला सांगत असते.
* ज्याचे हाती सत्ता तो पारधी : एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.
* ज्याचे कुडे त्याचे पुढे : दुसऱ्याचे वाईट जो चिंतितो त्याचेच वाईट होते.
* ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी : आपणावर ज्याचे उपकार झाले असतील, त्याच्याशी बेईमान होऊ नये.
* ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल : ज्याला दुःख भोगावे लागते तो त्या दुःखाच्या निवारणाच्या तजविजीला लागतो.
* झाकली मूठ सव्वा लाखाची : आपल्या अंगी असलेली दुर्गुण उघडे करू नयेत.
ट
* टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही : श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.
* टिटवीदेखील समुद्र आटविते : क्षुल्लक माणसाच्या हातूनदेखील कधी कधी पराम्रमाची कामे होतात.
ड
* डोळ्यात केर आणि कानात फुंकर : रोग एक आणि उपाय निराळाच.
* डोळा तर फुटू नये व काडी तर मोडू नये : धूर्तपणाने वागणे. कुणालाही न दुखावता निर्णय घेणे.
* ढवळ्याशेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला : वाईट माणसांच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो.
त
* तळे राखी तो पाणी चाखी : ज्याध्याकडे एखादी वस्तू रक्षणासाठी ठेवलेली असते, तो त्या वस्तूचा स्वतः उपयोग व फायदा करून घेतोच.
* ताकाला जाऊन भांडे लपविणे : दुसऱ्याजवळ काही मागावयाचे झाले तर ते उघड उघड न मागता आढेवेढे घेऊन मागणे.
* ताटात सांडले काय आणि वाटीत सांडले काय, एकच : कोणत्याही प्रकारची भिन्नता नाही, असे.
* तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यावी : सर्व साधनसामग्रीची अनुकूलता असताना आपले इष्ट कार्य करून घ्यावे.
* ताकापुरते रामायण : एखाद्याकडून आपले काम करून घेईपर्यंत त्याला खूष ठेवावे.
* ताटावरचे पाटावर, पाटावरचे ताटावर : श्रीमंतीचा डौल.
* ता म्हणता ताकभात समजावा : यत्किंचित अंशावरून सगळ्या गोष्टी अंदाजाने ओळखाव्यात.
* तहान लागल्यावर विहीर खणणे अगदी आयत्यावेळी कामाला लागणे.
* तेरड्याचा रंग तीन दिवस : अंगात खरी धमक नसता नुसता देखावा केला तर तो फार टिकत नाही.
* तुला फें तुझ्या बापाला फें: दोघांचीही पर्वा करीत नाही.
* तोबऱ्याला पुढे, लगामाला मागे : खाण्याच्या वेळी पुढे व काम करावयाच्या वेळी मागे (अळंटळं).
* तो पाप देणार नाही, पुण्य कोठून देणार? : अतिशय कंजूष माणूस.
* तोंड दाबून बुक्क्यांचा मार : स्वतःचा अपराध नसताना अन्याय सहन करावा लागणे.
* तोंड करी बाता, ढुंगण खाई लाथा : एखादा मनुष्य तोंडाने स्वतःची हवी तेवढी प्रतिष्ठा मिळवितो, पण त्याची खरी योग्यता म्हणजे दुसऱ्याच्या लाथा खाण्याइतकीच असते.
थ
* थेंबे थेंबे तळे साचे : थोडे थोडे साठविल्यास पुढे मोठा संचय होतो.
* धोराघरचे श्वान त्याला सर्व देती मान: मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो.
द
* दगडापेक्षा वीट मऊ: मोठ्यापेक्षा लहान संकट कमी नुकसान करते.
* दस की लकडी एक का बोजा: प्रत्येकाने थोडा थोडा हातभार लावल्यास सगळ्यांच्या सहकार्याने मोठे कामही पूर्ण होते.
* दगडावरची रेघ: खात्रीची गोष्ट.
* दाम करी काम, बीबी करी सलाम: पैशाने सर्व कामे घडवून आणता येतात.
* दात कोरून पोट भरत नाही मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.
* द्यावे तसे घ्यावे, करावे तसे भोगावे जसे कर्म घडते तसे फळ मिळते.
* दिवस बुडाला, मजूर उडाला मनापासून काम न करणारा मनुष्य.
* दिल चंगा तो कठौती में गंगा: मन शुद्ध व निष्कलंक असेल तर त्याला स्नानासाठी काशीला जाण्याचे कारण नाही.
* दिव्याखाली अंधार मोठ्या माणसातदेखील दोष असतो.
* दिल्ली तो बहोत दूर है: अजून व्हायचे काम पुष्कळ उरले आहे.
* दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत : एक गोष्ट अनुकूल असली तर तिच्या जोडीला आवश्यक अशी दुसरी गोष्ट अनुकूल नसते.
* दुधाने तोंड भाजले म्हणून ताक फुंकून प्यावे लागते : एकदा अद्दल
घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीतही सावधगिरी बाळगतो.
* दुष्काळात तेरावा महिना अगोदरच्या संकटात आणखी एका संकटाची भर पडणे.
* दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए: फसणारे मूर्ख पुष्कळ असतात त्यांना फसविणारा मनुष्य पाहिजे.
* दुसऱ्याच्या डोळ्यात भसकिनी बोट शिरते : दुसऱ्याच्या दोषावर टीका करावयास मनुष्य एका पायावर तयार असतो.
* दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही : दुसऱ्याची क्षुल्लक चूकदेखील दिसते पण स्वतःचा मोठा दोष दिसत नाही.
* दुरून डोंगर साजरे : कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप उघड होते.
* दुभत्या गाईच्या लाथा गोड : ज्याच्यापासून एखादा लाभ होतो त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.
* दुधात साखर : फारच उत्तम.
* देखल्या देवा दंडवत: सहजगत्या केलेला नमस्कार.
* देश तसा वेश : परिस्थितीनुरूप बदलणे.
* दे माय धरणी ठाय : पुरेपुरेसे होणे.
* देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मरणानंतर देह नष्ट होतो पण त्या माणसाने केलेल्या चांगल्या कामाची लोकांना आठवण येते.
* देणे नास्ती, घेणे नास्ती: कोणताही व्यवहार करणे नाही.
* दैव देते आणि कर्म नेते : सुदैवाने आपणास एखादी वस्तू मिळाली तरी पूर्वजन्माचे कर्म प्रतिकूल असल्याने ती वस्तू लाभत नाही.
* दोन्ही घरचा पाहुणा उपाशी: दोन आधारांवर अवलंबून असणारा मनुष्य फशी पडतो.
* दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी: एखादा मित्र जवळ राहत असूनसुद्धा क्वचित काळी त्याची भेट होते.
* दृष्टिआड सृष्टी : आपल्यामागे काय चालते हे दिसू शकत नाही.
ध
* धर्म करता कर्म उभे राहते: दुसऱ्यावर उपकार म्हणून करावयास जावे, तो कधीकधी आपल्यावरच संकट ओढवते.
* धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा : एखाद्या वस्तूवर ज्याचा वास्तविक अधिकार आहे त्याला ती वस्तू न मिळता दुसऱ्याला मिळते.
* धर्माचे गायी आणि दात कामे नाही: फुकट मिळालेल्या वस्तूत खोड
करीत बसू नये कारण ती बोतूनचातून धर्माचीच.
न
* नखाने काम होते तेथे कुऱ्हाड कशाला? जेथे क्षुल्लक साधनाने काम होण्याजोगे आहे, तेथे मोठे साधन कशाला योजावे ?
* नव्याचे नऊ दिवस : नवीन वस्तूचे कौतुक थोडा वेळ केले जाते.
* नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये : पूज्यपणा आणि पवित्रता या
सर्व पूर्वपरंपरेवर अवलंबून नसून ज्याच्या त्याच्या अंगच्या गुणावर व चारित्र्यावर आधारित असतात.
* वी विटी नवे राज्य सगळीच परिस्थिती नवीन असणे.
* नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने दोषयुक्त काम करणाऱ्याच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात.
* न कर्त्याचा वार शनिवार : ज्याला एखादे काम मनातून करावयाचे नसते, तो कोणत्यातरी सबबीवर ते करण्याचे टाळतो.
* नकटे व्हावे, पण धाकटे होऊ नये आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे, परंतु लाचारी पत्करू नये.
* नवरा मरो की नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशी कारण : पुढे काहीही परिणाम होवोत, तूर्त मतलबाशी कारण.
* न खात्या देवाला नैवेद्य : जो घेणार नाही अशी आपली पक्की खात्री असते त्याला एखादी वस्तू घेण्याविषयीचा आग्रह करणे.
* नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा : नाव मोठे पण कर्तृत्व कमी
प्रतीचे.
* नावडतीचे मीठ अळणी नावडत्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी ती वाईटच दिसते.
* नासली मिरी जोंधळ्याला हार जात नाही: कर्तृत्ववान मनुष्य कितीही खालावला, तरी तो कर्तव्यशून्य माणसाहून अधिक योग्यतेचा असतो.
* नाकापेक्षा मोती जड : गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व येणे.
* नाव मोठे लक्षण खोटे : भपका मोठा परंतु कृती मात्र काही नाही.
* नाचता येईना अंगण वाकडे आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या गोष्टीत दोष दाखविणे.
* नाक दाबले की तोंड उघडते: एखाद्याकडून आपले काम करवून घ्यायचे असल्यास त्याची कुचंबणा केली की तो ताबडतोब ते करतो.
* न ही ज्ञानेनं सदृशं पवित्रं इह विद्यते: ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही.
प
* पडलेले शेण माती घेऊन येते चांगल्या मनुष्यावर एखादा ठपा आला आणि ठपक्याचे जरी त्याने निरसन केले, तरी त्याची थोडीतरी बदनामी होतेच.
* परदुःख शीतल : दुसऱ्याच्या दुःखाची खरी कल्पना लोकांस होत नाही.
* पळणारास एक वाट, शोधणारास बारा वाटा: लबाडी करणे सोपे असते पण ती शोधून काढणे कठीण असते.
* पळसाला पाने तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
* पदरी पडले पवित्र झाले : कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे ठेवू नये, तिच्या बाबतीत समाधान मानावे.
* पांचामुखी परमेश्वर : बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे.
* पाचही बोटे सारखी नसतात : सर्व व्यक्ती सारख्या स्वभावाच्या नसतात.
* पायातील वहाण पायीच बरी: कोणालाही त्याच्या योग्यतेप्रमाणेच वागवावे.
* पालथ्या घड्यावर पाणी केलेला उपदेश निष्फळ ठरणे.
* पाण्यात काठी मारली तर का पाणी दोन होते ?: खरी मैत्री किरकोळ भांडणाने भग्न होत नाही.
* पाय धू म्हणे तर तोडे केवढ्याचे ? : जे काय करावयाचे ते सोडून भलत्या गोष्टीची उठाठेव कशाला ?
* पिंडी ते ब्रह्मांडी : आपल्यावरून जग ओळखावे.
* पी हळद नि हो गोरी कोणत्याही बाबतीत उतावीळ होणे.
* पुढच्यास ठेच मागचा शहाणा : दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो व सावधपणे वागतो.
* पुनरपि जननं पुनरपि मरणं जन्ममृत्यूचा फेरा, पुनः पुन्हा तीच गोष्ट करणे व तिच्याबद्दल शिक्षा भोगणे.
* पुराणातील वांगी पुराणात: पुराणातील उपदेश जागच्या जागीच राहतो आणि मनुष्याच्या लहरीप्रमाणे वर्तन घडते.
* पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवेल : जी अशक्य गोष्ट ती सुद्धा घडून येईल.
* पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा : देणे थोडे व त्याबद्दल काम मात्र खूप करून घ्यायचे.
* पोटात एक ओठात एक : लबाड माणसांची कृती एक आणि विचार वेगळे असतात.
* पोटचे द्यावे पण पाठचे देऊ नये: शरण आलेल्या माणसाला स्वतःचे मूल द्यावे पण भावंड देऊ नये.
फ
* फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याव: फाशांनी दिलेले दान उलट असले तरी स्वीकारावे लागते, त्याचप्रमाणे राजाने दिलेला न्याय प्रजाहिताच्या उलट असला तरी तो पत्करावा लागतो
* फार झाले हसू आले कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास ती अंगवळणी पडून तिचे काही वाटेनासे होते.
* फुटका डोळा काजळाने साजरा करावा : आपल्या अंगचा जो दोष
नाहीसा करून टाकणे शक्य नाही, त्याचा होईल तितका उपयोग किंवा फायदा करून घ्यावा.
ब
* बळी तो कान पिळी: बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता चालवितो.
* बडा घर पोकळ वासा दिसण्यात श्रीमंती, पण प्रत्यक्षात तिचा अभाव.
* बडे बाप का बेटा : बापाच्या मोठेपणावर डौल मिरविणारी व्यक्ती.
* बसता लाथ उठता बुक्की: सदासर्वदा मार खाणे.
* बावळी मुद्रा देवळी निद्रा: दिसण्यात बावळट पण व्यवहारचतुर.
* बाप तसा बेटा : जे बापाच्या अंगी गुण, तेच मुलाच्या अंगी असायचे (वडील तसा मुलगा)
* बाप से बेटा सवाई: वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार.
* बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कसा म्हणेल ? : जवळच्या नातलगाला जो ओळखत नाही तो दूरच्याला काय ओळखणार ?
* बाबया गेला नि दशम्याही गेल्या दोन्ही गोष्टीस मुकला.
* बाबा वाक्यम् प्रमाणम् : वाडवडिलांचा शब्द हाच आधार.
* बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर तुमच्या म्हणण्याला आधार काय तो दाखवा, नाहीतर ती गोष्ट खोटी आहे असे कबूल करा.
* बायकांत पुरूष लांबोडा : बायकांच्या घोळक्यात पुरुषाने जाणे योग्य नाही.
* बुडत्याचा पाय खोलात : अवनती होऊ लागली म्हणजे ती सर्व बाजूंनी होते.
* बुगड्या गेल्या पण भोके राहिली : वैभव गेले, खुणा मात्र राहिल्या.
* बाजारात तुरी भट भटणीला मारी: जी गोष्ट अजून घडलेली नाही तिच्याबद्दल अगोदर व्यर्थ वाद घालीत बसणे.
* बैल गेला नि झोपा केला: एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ असते.
* बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला मान द्यावा.
* बोला फुलास गाठ : दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडणे.
* बोलेल तो करील काय?: केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही.
* बोलणाऱ्याचे तोंड दिसते, करणाऱ्याची कृती मात्र दिसत नाही : रागे भरणाऱ्या मनुष्याचे शब्द सर्वांना ऐकू जातात, पण खोटे काम करणाऱ्याचे अन्याय कोणाला दिसत नाहीत.
भ
* भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी मागणाऱ्या माणसाला एखादी वस्तू दिली असता तेवढ्याने त्याची तृप्ती न होता तो जास्त मागत सुटतो.
* भरल्या गाड्यास सूप जड नाही: मोठ्या कामात एखादे बारीक काम सहज करून टाकता येते.
* भरवशाच्या म्हशीला टोणगा: खात्री असलेल्या व्यक्तीकडून संपूर्ण निराशा होणे.
* भाड्याचे घोडे ओझ्याने मेले : दुसऱ्याच्या वस्तूची काळजी कोण घेतो ?
* भांडणाचे तोंड काळे भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो.
* भिकेची हंडी शिंक्यास चढत नाही: दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्याच्या हातून मोठे कार्य काय होणार ?
* भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस : भित्रा माणूस भीतीचे कारण नसतानादेखील भीत असतो.
* भिंतींना कान असतात: सावधगिरीने बोलणे.
* भीक नको पण कुत्रा आवर एखाद्या व्यक्तीकडून ती गोष्ट मिळाली नाही तरी चालेल पण त्याचे विसंगत वागणे नको,
* भुकेला कोंडा नि निजेला धोंडा अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्यासाठी माणसाची तयारी असते.
म
* मरावे परि किर्तीरूपे उरावे: व्यक्ती देहाने मरते, मण चांगल्या कामाच्या रूपाने जिवंत राहते.
* मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये : मेहरबानीमुळे मिळालेल्या सवलतीचा दुरूपयोग करू नये.
* मन जाणे. पापा आपण पाप केले आहे की नाही हे ज्याचे मन त्याला सांगत असते.
* मन राजा मन प्रजा: बरे-वाईट करणे हे आपल्या इच्छेवरच असते.
* मनाएवढी ग्वाही त्रिभुवनात नाही : मनासारखा खरे सांगणारा साक्षीदार साऱ्या दुनियेत नाही.
* मनास मानेल तोच सौदा आपणास आवडत असेल तोच सौदा करावा, विरोधकाकडे लक्ष देऊ नये.
* मनी वसे ते स्वप्नी दिसे: ज्या गोष्टीचा आपणास निदिध्यास लागलेला असतो, ती गोष्ट स्वप्नातदेखील दिसते.
* मस्करीची होते कुस्करी: थट्टेचा परिणाम कित्येक वेळा भयंकर होतो.
* मनात मांडे पदरात धोंडे: भव्य मनोराज्य आणि अखेरीस निराशा.
* मातीचे कुल्ले लावल्याने लागत नाहीत : आपल्या व्यक्तीस रागवले असूनही त्याचा फारसा राग येत नाही.
* मान सांगावा जनात आणि अपमान सांगावा मनात आपला सन्मान लोकांना सांगावा, आणि अपमान झाला असेल तर त्याची वाच्यता करू नये.
* मारणाराचा हात धरवतो, पण बोलणाऱ्याचे तोंड धरवत नाही : दांडग्या माणसास आवरणे सोपे, पण अगातद्वा बोलणाऱ्या माणसास गप्प
करणे कठीण.
* मानला तर देव नाहीतर धोंडा : मान ठेवला तर ठेवला नाही तर नाही.
* मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे एखादी त्रास देणारी व्यक्ती असण्यापेक्षा ती नसलेलीच बरी.
* मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी : दुसऱ्या व्यक्तीस आपली बाजू योग्य असूनही ती पटवून देण्यास असमर्थ असणे.
* मुलाचे पाय पाळण्यात दिसतात : मुलगा पुढे कसा निघेल हे लहानपणीच कळते.
* मुसळाला अंकुर फुटणे : अशक्य गोष्ट घडणे.
* मुंगी होऊन साखर खावी, हत्ती होऊन लाकडे फोडू नये : नम्रता धारण करून आपला फायदा करून घ्यावा, ताठ्याने वागून दुःख भोगीत बसू नये.
* मिया मूठभर, दाढी हातभर : बेडौलपणाचा उपहास करणे.
* मेले मेंढरू आगीला भीत नाही : ज्याची एकदा अब्रू गेली त्याला बेअब्रूची भीती वाटत नाही.
* मेल्या म्हशीला मणभर दूध : मनुष्य मेल्यानंतर त्याच्या गुणांचे चीज केले जाते.
* मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते : एक करतो म्हणून त्याचे पाहून दुसऱ्याने तसे करणे योग्य नाही.
* म्हशीची शिंगे म्हशीला जड होत नाहीत आपली माणसे आपणास जड वाटत नाहीत.
* म्हातारीने कोंबडे झाकून ठेवले, म्हणून उजाडावयाचे राहत नाही : जी गोष्ट व्हावयाची ती होऊ नये म्हणून कितीही प्रयत्न केला तरी होतेच.
य
* यथा राजा तथा प्रजा: प्रमुखाप्रमाणे त्याचे कुटुंबीय वागतात.
* या बोटाची धुंकी त्या बोटावर करणे लटपटपंची करून दुसऱ्यास फसविणे.
* येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरून पुन्हा पूर्वीप्रमाणेच वागणे.
र
* रात्र थोडी सोंगे फार कामे भरपूर पण वेळ थोडा.
* राजा बोले दल हाले, काजी बोले दाढी हाले समर्थाच्या शब्दाला मान मिळतो, क्षुल्लक माणसाच्या शब्दाला मिळत नाही.
* राजाला दिवाळी काय माहीत ? ज्याच्या घरी नेहमीच उत्सव, त्याला उत्सवाचे महत्त्व वाटत नाही.
* राज्याअंती नरक आणि नरकाअंती राज्य : पापे केल्याने राज्य मिळते आणि राज्यानंतर नरकात पडावे लागते.
* रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी : रिकामा उद्योग करीत बसणे.
* रोज मरे त्याला कोण रडे: नेहमीच घडणाऱ्या गोष्टीला महत्त्व नसते.
ल
* लकडीवाचून मकडी वठणीस येत नाही: द्वाड माणसाला सुधारण्यास कडकच उपाय योजावे लागतात.
* लंकेत सोन्याच्या विटा: दुसरीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीचा आपणास उपयोग नसतो.
* लाथ मारीन तेथे पाणी काढीन सामर्थ्यवान मनुष्य.
* लाज नाही मना कोणी काही म्हणा: निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करीत नाही.
* लाडे लाडे केले वेडे : मुलाचे फार लाड केले म्हणजे ते वेडे चाळे करू लागते.
* लागो भागो दिवाळी नफा होवो की तोटा होवो, तिकडे न पाहता
व्यापार करून नशिबाची परीक्षा पाहणे.
* लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण : पुष्कळ माणसे लोकांना उपदेश करतात, पण त्यांचे स्वतःचे आचरण मात्र उपदेशाच्या उलट असते.
व
* वरातीमागून घोडे : योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे व्यर्थ असते.
* वळचणीचे पाणी आड्याला जात नाही : हलके ते हलके व थोर ते थोर.
* वासरात लंगडी गाय शहाणी : मूर्ख माणसांत थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो.
* वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही: सरळ मार्गाने इष्ट कार्य साधत नसेल तर वक्र मार्गाचा अवलंब करावा लागतो.
* वारा पाहून पाठ द्यावी : देश, काल, वर्तमान वगैरे पाहून वर्तन करीत राहावे.
* वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे : सर्व साधने अनुकूल असता होईल तो फायदा करून घ्यावा.
* वाऱ्यावर वरात आणि दर्यावर घाला बेजबाबदारीचे काम.
* वाणला तितका घाणला : जितकी जास्त स्तुती केली तितका अधिक बिघडला.
* विटले मन आणि फुटले मोती सांधत नाहीत : एखादी वस्तू आवडेनाशी झाली म्हणजे पुन्हा आवडती होणे शक्य नसते.
* विशी विद्या तिशी धन: एखाद्या माणसाला विद्या कितपत आली आहे याची अठकळ वीस वर्षानंतर व पैसा कितपत मिळविल याची अटकळ तीस वर्षानंतर करता येते.
* विंचवाचे बिहऱ्हाड पाठीवर : आपली चीजवस्तू घेऊन सतत फिरावे लागणे.
* व्यक्ती तितक्या प्रकृती: निरनिराळी माणसे निरनिराळ्या स्वभावाची
असतात.
श
* शहाण्याला शब्दांचा मार : शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तर पुरते.
* शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार वेल पुरत नाही : लोकांनी दिलेली शिदोरी गरीब मनुष्यास एका वेळेस पुरेल, पण त्यानंतर त्याला उपाशी राहण्याची पाळी येणार.
* शितावरून भाताची परीक्षा थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची परीक्षा होते.
* शिंक्याचे तुटके बोक्याचे फावले : अकल्पित रीतीने एखादी गोष्ट झाली
व तिच्यामुळे एखाद्याला पाहिजे होते ते आयतेच मिळाले.
* शेजी देईल काय आणि मन धायेल काय?: शेजारीने एखादा पदार्थ कितीही सढळ हाताने दिला, तरी त्याच्या योगाने मनाची तृप्ती होऊ शकत नाही.
* शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड : एखाद्याने दुसऱ्याचे काही काम जीव तोडून केले व ते त्यास पटले नाही म्हणजे तो या अर्थाची म्हण योजतो.
* शेरास सव्वाशेर : एकाला दुसरा वरचढ भेटणे.
* शेंडी तुटो की पारंबी तुटो : जिवावर उदार होण्याइतका धाडशी व दृढनिश्चयाचा माणूस.
* षटकर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणे महत्त्वाची गोष्ट इतरांना सांगितल्यामुळे संकटात पडणे.
स
* सत्तेपुढे शहाणपण नाही : ज्याच्याजवळ अधिकाराचे बळ आहे, त्याच्यापुढे शहाण्याचे काही चालत नाही.
* सदा मरे त्याला कोण रडे? : अधिकाधिक कष्टमय स्थिती येत गेल्यास
ती अंगवळणी पडते आणि तिच्याबद्दल त्रास वाटेनासा होतो.
* सगळे मुसळ केरात : केलेले सर्व व्यर्थ.
* सरड्याची धाव कुंपणापर्यंत ज्याचे सामर्थ्य अत्यल्प आहे त्याने आपणाकडून कितीही मोठे काम केले तरी ते अल्पच असणार.
* सब घोडे बारा टक्के गुणावगुणांची पारख न करणे. सगळेच सारखे मानणे.
* साखरेचे खाणार त्याला देव देणार : भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.
* सारी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही : सर्व स्थितींची बतावणी करता येते, परंतु श्रीमंतीची करता येत नाही.
* साखरेवरले मुंगळे : जोपर्यंत उत्कर्षाचे दिवस आहेत तोपर्यंत मित्र म्हणविणारे.
* सांग काम्या ओम नाम्या सांगेल तेवढेच काम करणे.
* सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा सांगितलेले काम जो मुकाट्याने करतो आणि जे वेतन देतील ते घेतो असा चाकर.
* सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही: क्षुल्लक वस्तू वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूना नाश पत्करणे योग्य नाही.
* सुंभ जळेल पण पीळ जळणार नाही : हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही.
* सोन्याहून पिवळे : फारच उत्तम.
* संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी: एखादे कार्य करावयाचे झाल्यास त्याची अगदी चुमिक अवस्थेपासून सुरूवात करणे.
ह
* हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते : आजार, विपत्ती येताना लवकर व मोठ्या प्रमाणात येतात पण जाताना सावकाश जातात.
* हलवायाच्या घरावर तुळशीपत्र : दुसऱ्याच्या पैशाने औदार्य दाखविणे
* हपापाचा माल गपापा: अन्यायाने मिळविलेले द्रव्य निष्काळजीपणे खर्चिले जाते.
* हत्ती गेला पण शेपूट राहिले: कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसा व्हायचा राहिला.
* हसतील त्यांचे दात दिसतील आपले काम करीत राहणे. लोकांच्या हसण्याची पर्वा न करता
* हरी जेवण आणि मठी निद्रा स्वतःचे घरदार नाही.
* हातचा एक बाहेरच्या शंभराच्या बरोबर: जे पूर्णपणे आपल्या कब्जात आहे, ते थोडे जरी असले तरी त्याची योग्यता जास्त असते.
* हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये : जे आपल्या कब्जात पूर्णपणे आलेले आहे ते आपणास दुसरा काही मोठा लाभ होईल अशा आशेने सोडू नये.
* हातच्या काकणाला आरसा कशाला स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.
* हात फिर तिथे लक्ष्मी फिरे आणि तोंड फिरे तिथे अवदसा फिरे :
उद्योगशील मनुष्याच्या घरात संपत्ती नांदते, उद्योग न करता नुसती वटवट करतो त्यास दारिद्रय येते.
* हा सूर्य आणि हा जयद्रथ: प्रत्यक्ष पुरावा दाखवून समोरासमोर उलगडा करणे.
* हात ओला तर मित्र भला जोपर्यंत मनुष्य दुसऱ्याला देत असतो तोपर्यंत त्याच्याशी सगळे मित्रत्वाने वागतात.
* ह्या हाताचे ह्याच हातावर वाईट कृत्याची फळे या लोकीच मिळतात.
* हिरा तो हिरा आणि गार ती गार: थोर कोण आणि हलका कोण हे तेव्हात दृष्टोत्पत्तीस येते.
* हाजीर तो वजीर जो प्रथम हजर होईल त्याला पहिल्याने लाभमिळेल.