शालार्थ आयडी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाईज करणेबाबत shalartha Id
संदर्भ –
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २४१२/(८१-अ/१२)/अर्थसंकल्प, दिनांक ७/११/२०१२.
२) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २४१२/ (८१-अ/१२)/अर्थसंकल्प, दिनांक २४/०१/२०१३.
३) आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र क्र. आशि/ई गव्ह. सेल/शालार्थ/२०१६/५९ दिनांक १८/११/२०१६.
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शालार्थ १११८/प्र.क्र.३०/१८/टिएनटी-३ दिनांक २८/०२/२०१८.
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक क्र. शालार्थ १११८/प्र.क्र.३० /१८/ टिएनटी-३ दिनांक २२/०५/२०१८.
६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शालार्थ १११८/प्र.क्र.३०/१८/टिएनटी-३ दिनांक २०/०३/२०१९.
७) आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र क्र. आशिका/१८-१९/शालार्थ/विकृद/आस्था क १४४/ २०३१ दिनांक २९/०३/२०१९.
८) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शालार्थ १११८/प्र.क्र.३०/टिएनटी-३ दिनांक १०/०६/२०२२.
राज्यातील खाजगी/जिल्हा परिषद/महानगरपालिका/नगरपालिका मधील अनुदानित कर्मचा-यांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीमार्फत करण्याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश/परिपत्रक निर्गमित करण्यात आलेली आहेत.
१. संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका व नगरपालिका मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन व भत्ते ‘शालार्थ’ या नवीन वेतन प्रणालीद्वारे अदा करणेबाचत पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत. यापुढे सर्व अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्था मधील शाळांच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीमधून करण्यात यावेत. ऑफलाईन पध्दतीने करु नये. यानुसार त्या त्या वेळी कार्यरत शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
२. संदर्भ क्र. ६ नुसार शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करणेबाचत निर्णय घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या बाबतीत विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ, (सहसंचालक दर्जा) यांनी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करणेबाबत निर्णय घ्यावा असेही निर्देश दिलेले आहेत.
३. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त होणारे शिक्षक यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये पवित्र पोर्टल वरुन शालार्थ प्रणालीस सरळ माहिती पाठवून शालार्थ आयडी तयार करण्यात येतो.
शालार्थ प्रणालीसंदर्भात उपरोक्त शासन आदेशासह व या परिपत्रकाद्वारे पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
नव्याने वैयक्तिक मान्यता देणे व शालार्थ आयडी देतेवेळी अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती.
१. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्ताव सोबतच मुख्याध्यापक / शाळा व्यवस्थापनाने शालार्थ मान्यतेकरीता आवश्यक असणारी कागदपत्रे सोबत जोडावीत असे संबंधितांना कळविण्यात यावे. वैयक्तिक मान्यता प्रस्तावासोबतच शालार्थ मान्यतेची आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. सदरील वैयक्तिक मान्यता/शालार्थ प्रस्ताव ई- ऑफिस प्रणालीमध्ये आवक नोंदीसह स्विकारावा.
२. विभागीय शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक व शिक्षण निरीक्षक (मुंबई) यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्ताव मान्य झाल्यास वैयक्तिक मान्यता आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह निर्गमित करण्यात यावेत.
३. वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव शालार्थ मान्यतेकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी वैयक्तिक मान्यतेच्या आदेशासह विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे ई-ऑफिसमार्फत सादर करावा. याच ई-ऑफिसमधील प्रस्तावावर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षक/शिक्षकेत्तर पदावरील कर्मचाऱ्यांच्या शालार्थबाबत निर्णय घेणे आवश्यक असेल. प्रस्ताव मान्य झालेनंतर शालार्थ आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह निर्गमित करण्यात यावेत.
४. त्याचप्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव व ई-ऑफिस जावक क्रमांकासह वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ मान्यतेकरिताचा प्रस्ताव ई-ऑफिसमार्फत विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ यांचेकडे सादर करावा. प्रस्ताव मान्य झाल्यास शालार्थ आयडीचे आदेश ई-ऑफिसच्या जावक क्रमांकासह निर्गमित करावेत.
५. विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्तावासोबत शालार्थकरिता प्राप्त झालेली कागदपत्रे व मुळ वैयक्तिक मान्यता आदेशाच्या आधारे शालार्थ मान्यतेचे/अमान्यतेचे आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह
निर्गमित करावेत. तसेच शालार्थ मान्यता आदेशाच्या दिनांकापासून ३ कामकाजाच्या दिवसांमध्ये शालार्थ प्रणालीत सदर नाव समाविष्ट करावे आणि याच प्रणालीवर अपलोड करावेत.
६. विभागीय शिक्षण उपसंचालक / विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ यांना वैयक्तिक मान्यता आदेश चुकीचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक/विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित कर्मचारी, शाळा व्यवस्थापन सचिव/अध्यक्ष, प्राचार्य/मुख्याध्यापक व सर्व संबंधितांची विभागीय शिक्षण उपसंचालक/विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शासन निर्णय दिनांक २३/८/२०१७प्रमाणे सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता वैध अवैध बाबत निर्णय घ्यावा.
वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी आदेश प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी अभिलेखे डिजिटलाईज करण्यासाठी
करावयाची कार्यवाही.
१. दिनांक ७/७/२०२५ किंवा तदनंतर निर्गमित होणा-या शालार्थ आयडी आदेश प्रकरणात पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
वैयक्तिक मान्यता/शालार्थ आयडी आदेश निर्गमित करण्यात आलेल्या कर्मचा-यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश प्रत, नियुक्ती आदेश व रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर विभागीय शिक्षण उपसंचालक/विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करावेत.
२. यापूर्वीच्या प्रकरणाबाबत दिनांक ७/७/२०२५ पूर्वी निर्गमित शालार्थ आयडी आदेशाबाबत (दिनांक १८/११/२०१६ ते दिनांक ७/७/२०२५) शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना सक्षम प्राधिका-याने वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रदान केलेनंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेश प्रत, शालार्थ आयडी आदेश प्रत, संबंधित खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचा-याचा रूजू अहवाल शालार्थ पोर्टलवर अपलोड करणेबाबत डिडिओ-१ तथा मुख्याध्यापक/प्राचार्य स्तरावरून कार्यवाही करणे अनिवार्य असेल. दिनांक ७/११/२०१२ ते दिनांक १८/११/२०१६ या कालावधीत शालार्थ आयडी आदेश निर्गमित केलेले नाहीत या कालावधीमधील कर्मचा-यांच्या संदर्भात संबंधित कर्मचा-याचा खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल व वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.
३. ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे नियुक्ती आदेश, रूजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी आदेश (लागू असल्यास) ही अभिलेखे शालार्थ प्रणालीवर दिनांक ३०/८/२०२५ पर्यंत अपलोड झालेले नसल्यास अशा कर्मचा-यांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी वैयक्तिक मान्यता आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत काय याची खातरजमा करावी. विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेकडून अशा प्रकरणात सदर शालार्थ आयडीचे आदेश त्यांच्या कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत काय याची तात्काळ खातरजमा करावी.
४. नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी आदेश उपलब्ध नाहीत अशा प्रकरणात एकस्तर वरिष्ठ अधिकारी यांनी शासन निर्णय दिनांक २३/८/२०१७ प्रमाणे सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा. या वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासकीय निधीचा अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी.
५. शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक/विभागीय शिक्षण उपसंचालक / विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झालेल्या वैयक्तिक मान्यता आदेश व शालार्थ आयडी आदेश एकत्रित संग्रही ठेवले जातील याची दक्षता घ्यावी.
. शाळा व्यवस्थापन/संस्था सचिव व मुख्याध्यापक यांनी आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी आदेश (लागू असल्यास) संग्रही ठेवणे अनिवार्य आहे.
या निर्देशाचे काटेकोर पालन करावे.