महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत government servants transfer paripatrak
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र. ४९/रवका-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: ०५ ऑक्टोबर, २०२६
संदर्भ: या विभागाचे समक्रमांकाचे दिनांक ११ सप्टेंबर, २०२६ रोजीचे शासन परिपत्रक.
परिपत्रकः-
उपरोक्त संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तथापि, मा. उच्च न्यायालयाने याअनुषंगाने सुस्पष्ट व परिणामकारक सूचना देण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत या शासन परिपत्रकान्वये पुनःश्च पुढीलप्रमाणे स्वयंस्पष्ट सूचना देण्यात येत आहेत:-
१. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम १० (१) अनुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी, त्यास नेमून दिलेले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य व शासकीय काम अत्यंत दक्षतेने व शक्य तितक्या शीघ्रतेने पार पाडण्यास बांधील असून विहित कालमर्यादेत कार्यवाही न केल्यास सदर अधिनियमाच्या कलम १० (२) अनुसार म.ना.से. (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीप्रमाणे त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची तरतूद आहे.
२. विविध प्रशासनिक विभागांमध्ये अनेक प्रकरणी विविध अधिकाऱ्यांच्या स्तरांवर प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर/निवेदनांवर तात्काळ निर्णय घेण्याबाबत मा. उच्च न्यायालयास आदेश पारित करावे लागतात तसेच कोणत्याही सबळ कारणांशिवाय सदर प्रस्ताव/निवेदने जाणीवपूर्वक दीर्घकाळ प्रलंबित ठेवली जात असल्याची बाब मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली आहे व याबाबत मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. मा. उच्च न्यायालयाने शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम १० मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आवश्यक त्या अतिरिक्त सूचना सर्व शासकीय कार्यालयांना देण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.
३. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम १० (१) मधील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी, त्यास नेमूण दिलेले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य व शासकीय काम अत्यंत दक्षतेने आणि शक्य तितक्या शीर्घतेने पार पाडण्यास बांधील असेल अधिनियमातील या तरतुदीचे पालन सर्व प्रशासकीय विभागांकडून काटेकोरपणे होत नसल्याने अनेक न्यायालयीन प्रकरणे उद्धभवत आहेत. सदर बाब विचारात घेऊन पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
(अ) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम १० (१) मधील तरतुदीचे काटेकोरपण पालन करावे. सदरहू तरतुदीचे पालन न करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध अधिनियमाच्या कलम १० (२) व १० (३) अनुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये शिस्तभंगाची कारवाई तातडीने करण्यात यावी.
(ब) सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग त्याचप्रमाणे कार्यालयांतील/विभागांतील प्रलंबित अर्ज/निवेदने/प्रकरणे (नस्त्या) यांचा मासिक आढावा घ्यावा व त्याचा जलदगतीने निपटारा होण्याच्या दृष्टीने संबंधितांना निर्देश द्यावेत, मासिक आढाव्याचे विवरणपत्र पुढीलप्रमाणे राहील:-
क) सर्व विभागप्रमुखांनी/कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन कार्यालयात प्राप्त होणारे संदर्भ /आवेदनपत्र/नस्त्यांवर केलेल्या कार्यवाहीबाबत उक्त विवरणपत्रानुसार मासिक आढावा घ्यावा.
(ड) या कार्यालयीन भेटीच्या वेळी कार्यालयामध्ये विनाकार्यवाही प्रलंबित असलेल्या संदर्भावर /निवेदनांवर विहित वेळेत कार्यवाही न करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध संबंधित अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करावी. यानुसार केलेल्या कारवाईचा पुढील विवरणपत्रानुसार अहवाल संबंधित वरिष्ठ कार्यालयास सादर करावा.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून त्याचा संगणक संकेतांक २०२६१००५१५३९०७२१०७ असा आहे. तसेच सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










