शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना eleventh online pravesh prakriya suchna 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना eleventh online pravesh prakriya suchna 

वाचा:- १. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५-प्रक्र.१६/ एसडी-२, दि. ०६.०५.२०२५.

२. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५-प्रक्र.१६/ एसडी-२, दि. ०२.०६.२०२५.

प्रस्तावना:-

संदर्भाकित शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे. तरी, आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचलनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार अल्पसंख्यांक महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास उर्वरीत जागा पहिल्या फेरीनंतर प्रत्यार्पित (Surrender) करण्याची मुभा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचलनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्याची मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्याअनुषंगाने यापुर्वी निर्गमित करण्यात आलेले संदर्भ क्र.२ येथील शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे, व सुधारीत शुध्दीपत्रक खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे.

शुध्दीपत्रक :-

संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामधील

अ) मुद्दा क्र.११ –

“अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत अल्पसंख्यांक कोट्यातील जागा कोणत्याही परिस्थितीत प्रत्यार्पित करता येणार नाहीत. भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील, अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. तद्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल.”

ऐवजी

मुद्दा क्र.११ –

“अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. परंतु, अल्पसंख्यांक कोट्यातील जागा पहिल्या फेरीअंती रिक्त राहिल्यास पहिल्या फेरीनंतर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महविद्यालयांना उर्वरीत जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल. परंतु, दूस-या फेरीच्या वेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील व तदनंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण मध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असेल. तथापि, उर्वरीत जागा प्रत्यार्पित करणे पुर्णतः ऐच्छिक असून कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेवर बंधनकारक नसेल.

भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील, अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. तद्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल.”असे वाचावे.

आणि

ब) मुद्दा क्र.१३ – इन-हाऊस कोटा –

“इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने भरण्यात याव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात/आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील. तद्नंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरीता इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील.”

ऐवजी

मुद्दा क्र.१३ – इन-हाऊस कोटा –

१. इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने भरण्यात याव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात/आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील. तद्नंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरीता इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील.

२. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय /वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळा करीता एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील.

३. राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील.

असे वाचावे.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०६१०१६०७४०७८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय येथे पहा download 

Leave a Comment