जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ बाबत स्पष्टीकरण online teacher transfer update 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ बाबत स्पष्टीकरण online teacher transfer update 

वाचा :-

शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/११८/आस्था-१४, दि.१८.६.२०२४.

शासन परिपत्रक

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे सुधारित धोरण वाचा येथील दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील व्याख्या १.८ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक परित्यक्ता/घटस्फोटीत महिला शिक्षक, ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, कुमारिका शिक्षक, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमुद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादी अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

२. तथापि, विशेष संवर्ग-१ मधून विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करुन बदलीमधून सूट मिळविणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये जिल्हांतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करुन अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले आहे, याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित केले आहे.

३. त्यामुळे शासन निर्णय दि.१८.६.२०२४ मधील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ च्या अनुषंगाने खालील सविस्तर सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहेत,-

1) विशेष संवर्ग-१ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकाने सादर केलेले दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन युडी-आयडी प्रमाणपत्राबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीस सदर शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत काही साशंकता आढळून आल्यास, संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्य चिकीत्सकांकडून तपासणी करुन घेण्यात यावी.

II) तसेच दिव्यांगत्वाबाबतचे देण्यात आलेले उपरोक्त प्रमाणपत्र हे दिव्यांगत्वाचे लाभ अनुज्ञेय करण्याकरीता दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेले असले पाहिजे.

III) तसेच विविध आजारांबाबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये अनियमितता आढळून आल्यास, अशा शिक्षकांची देखील जिल्हा शल्य चिकीत्सकांमार्फत फेरतपासणी करण्यात यावी.

IV) विशेष संवर्ग- १ मधून बदलीसाठी अर्ज सादर करणाऱ्या घटस्फोटीत/परित्यक्ता महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधित घटस्फोटीत शिक्षिकेच्या मा. न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत, परित्यक्ता शिक्षिकेने ती पतीबरोबर राहत नसल्याबाबत सादर केलेले स्वयंघोषणापत्र, त्यांच्या रहिवासाचे दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका इत्यादीवरुन पडताळणी करावी. तसेच आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षिकांच्या निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करावी.

V) दिव्यांग व वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच परितक्त्या असल्याबाबतच्या स्वयंघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचे आढळून आल्यास, अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच संबंधित शिक्षकाचे निलंबन करुन शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी.

VI) अशा शिक्षकांविरुध्द कारवाई न झाल्याचे आढळून आल्यास, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६१६१२२६००७६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment