शाळेत नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे पटसंख्येत पोर्टलवर नोंदविल्यास गुन्हा ! शाळांची एकाच वेळी पट पडताळणी होणार; shala patpadtalni
गटशिक्षणाधिकाऱ्यांना १५ डिसेंबरची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलढाणा : प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत
वाढत चाललेल्या अनियमितता, बनावट विद्यार्थ्यांच्या नोंदी आणि अनुदानातील कथित गैरव्यवहार यांना आळा घालण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मोठी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. सर्व शाळांची विद्यार्थी उपस्थिती यादी म्हणजेच पटसंख्या एकाचवेळी आणि सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकपदे वाढवण्यासाठी करण्यात येणारी खोटी नोंदणी, पोर्टलवरील फुगवलेले आकडे आणि त्यामुळे शासनावर पडणारा आर्थिक बोजा थांबवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
शाळांकडून पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थी संख्या व प्रत्यक्ष वर्गात उपस्थित विद्यार्थी संख्येत तफावत राहू नये, यादृष्टीने तपासणी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांद्वारे अंतिम पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
चुकीची माहिती भरल्यास कारवाई
पट पडताळणी करताना जर चुकीची माहिती भरलेली असल्यास संबंधित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बोगस पटसंख्येला चाप लावण्यासाठी ही पटपडताळणी होणार आहे. त्यासाठी पोर्टलवर योग्य माहिती भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तीन स्तरावरून पडताळणी
पट पडताळणीची प्रक्रिया तीन स्तरांवर राबवली जाणार असून, शालेय पोर्टलवरील प्रत्येक नोंदीची सखोल छाननी केली जाणार आहे.
मुख्याध्यापक आणि
वर्गशिक्षकांनी सर्व विद्यार्थी नोंदी पुन्हा तपासून चुकीची माहिती असल्यास तत्काळ दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. तसेच दीर्घकाळ अनुपस्थित असलेले किंवा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची नोंद अद्ययावत करून वास्तव परिस्थिती पोर्टलवर परावर्तित होईल, याची खात्री करणे आवश्यक ठरणार आहे.
गटशिक्षणाधिकारी यांनी
3 शाळांना भेट देऊन केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची पडताळणी, हजेरी व पोर्टल डेटा तुलना करून आवश्यक तिथे निर्देश व दुरुस्ती करण्याच्या सूचना देणे महत्त्वाचे आहे.
राज्यस्तरावर एकाचवेळी विशेष तपासणी होणार आहे. यावेळी विशेष पथक अचानक शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थितीची पोर्टलवरील डेटाशी मेळ तपासणार आहे.
दक्षता घेण्याचे करण्यात आले आवाहन
शाळांमध्ये दाखल नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे पोर्टलवर नोंदवणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार असल्याने सर्व शाळांना याबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण प्रशासनाने घेतलेली ही मोहीम शैक्षणिक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि शिस्तीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
शाळांकडून पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थी संख्या व प्रत्यक्ष वर्गात उपस्थित विद्यार्थी संख्येत तफावत राहू नये. आदेशानुसार १५ डिसेंबरपर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांद्वारे अंतिम पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश आले आहेत.
विकास पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)










