‘राष्ट्रीय गणित दिन’ जागतिक किर्तीचे भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंती ganittadnya shrinivas ramanujan
जागतिक किर्तीचे भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तमिळनाडू राज्यातील इरोड येथे झाला. शालेय शिक्षण कुंभकोणम येथे झाले. लहानपणी शाळेत असताना ते शिक्षकांना गणिताचे अनेक प्रश्न विचारून व त्याची उत्तरे स्वतःच सांगून शिक्षकांना चकित करत. कागदाची किंमत जास्त असल्याने ते पाटीवरच गणिते सोडवायचे. गणितात त्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले. मात्र ते अकरावीत एक वेळा व बारावीत दोन वेळा इतर विषयात नापास झाले. त्यामुळे ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकले नाहीत. १९०३ साली ब्रिटिश गणिततज्ञ जी. एस. कार यांचा ‘सिनॉप्सिस ऑफ प्युअर मॅथेमॅटिक्स’ हा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. त्यामुळे त्यांच्या बुध्दीला चालना मिळाली. परंतु गणिताने मात्र पोट भरत नाही म्हणून काही काळ त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चेन्नई/मद्रास बंदर मंडळात नोकरी केली. १९११ साली त्यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात छापून आला. त्यामुळे त्यांना जगभर प्रसिध्दी मिळाली. १९१३ साली इंग्लंडमधील लंडन येथील केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी महाविद्यालयातील प्रा.जी.एच. हार्डी यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला. गणितातील संशोधनाने प्रभावित होऊन हार्डी यांनी रामानुजन यांना इंग्लंडला येण्याचे
निमंत्रण दिले. त्यासाठी रामानुजन यांनी शिष्यवृत्ती मिळवली. धार्मिक कारणास्तव व घरच्यांच्या विरोधाला न जुमानता १७ मार्च १९१४ रोजी ते इंग्लंडला बोटीने रवाना झाले. तेथे पाच वर्षाच्या काळात त्यांनी संशोधनपर ३२ लेख व ४००० हजार नवीन सूत्रे, प्रमेय व सिध्दांत लिहिले. यामध्ये लांडाउ- रामानुजन स्थिरांक, रामानुजन मूळ संख्या, थीटा फंक्शन, रामानुजन अभाज्य यासह इतर अनेक गणिती सूत्रांचा समावेश आहे. शेवटी आजारपणामुळे १८१९ साली ते भारतात परतले.
१९१६ साली त्यांच्या संशोधनामुळे केंब्रिज विद्यापीठाने त्यांना बी.ए. पदवी बहाल केली. १९१८ साली त्यांची अधिछात्र म्हणून निवड केली. अशी निवड होणारे ते पहिले भारतीय ठरले. याचवर्षी लंडन येथील रॉयल सोसायटीने त्यांना फेलोशिप बहाल केली. हे सदस्यत्व मिळवणारे ते दुसरे भारतीय ठरले. १९१७ साली त्यांची लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीवर निवड करण्यात आली. शेवटी २७ एप्रिल १९२० रोजी क्षयरोगाने अवघ्या ३३ व्या वर्षी कुंभकोणम येथे त्यांचे निधन झाले. पुढे कलेक्टेड पेपर्स ऑफ श्रीनिवास रामानुजन (१९२७) व नोटबुक्स ऑफ श्रीनिवास रामानुजन (१९५७) या ग्रंथातून त्यांचे संशोधन कार्य प्रसिध्द करण्यात आले. २०१२ पासून त्यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो.










