प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत education aharta circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत education aharta circular 

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१८/प्र.क्र.३९७/टीएनटी-१,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०१९

वाचा :-

१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. आरटीई-२०१०/प्र.क्र.५७२/प्राशि-१, दि. १३.०२.२०१३.

२) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे पत्र क्र. मराशैसंप्रप/अविवि/शैक्षणिक अर्हता / २०१८-१९/७३६, दि. ०४.०२.२०१९.

३) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. एचएचसी/१३८०/५६०११/(५६३६/८०३, उमाशि-१ दि. २५.०१.१९९०.

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पत्र क्र. एचएससी-१८११/(२३४/२११)/उमाशि-१, दि.०९.११.२०१२.

प्रस्तावना :-

केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत २००२ मध्ये दुरुस्ती करुन ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे. त्या अनुषंगाने केंद्रशासनाने “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ पारित केला असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१ एप्रिल, २०१० राज्यात सुरु झाली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने सदरचा कायदा दिनांक १२ एप्रिल, २०१२ रोजी वैध ठरविला आहे. या अधिनियमातील तरतूदींची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम, २०११” अधिसूचित केले आहेत.

२. केंद्र शासनाने दिनांक ३१ मार्च, २०१० च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्याकरीता सदर कायद्याच्या कलम २३ नुसार “राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE)” यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे.

3. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०१० व दिनांक २९ जुलै, २०११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता (इयत्ता १ ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibity Test- TET) अनिवार्य केली आहे.

४. त्यानुषंगाने राज्यातील प्राथमिक शिक्षकांकरीता (इयत्ता १ ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दि. १३.०२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षक पदाकरीता (इयत्ता १ ली ते ८ वी) शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असले तरी, इयत्ता ६ वी ते ८ वी करिता नियुक्त करावयाच्या शिक्षकांनी पेपर-२ या गटाची परीक्षा कोणता विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे, याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे विषयनिहाय शिक्षक इयत्ता ६ वी ते ८ वी करीता उपलब्ध करुन देणे आवश्यक असले तरी, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याकरीता अशी कोणतीही अट निर्धारित केलेली नसल्यामुळे, उमेदवार त्यांच्या पदवीच्या विषयाऐवजी अन्य शाखेचे विषय घेऊन, सदर परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शालेय स्तरावर अनिवार्य विषय निश्चित आहे. या विषयासाठी अध्यापन करणारे शिक्षक हे त्या त्या विषयांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. मात्र उपरोक्त तरतुदींच्या आधारे आतापर्यंत ज्या विषयांचे अध्यापन करावयाचे आहे, त्या विषयाची पदवी नसली तरी शिक्षकांची नियुक्ती होऊन सदर शिक्षक हे स्वतःच्या पदवी व्यतिरिक्त अन्य विषयांचे अध्यापन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

५. शासन निर्णय दि. २५.०१.२०१६ नुसार आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली राज्यातील अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या समन्वय समितीने दि.२९.०८.२०१८ रोजीच्या बैठकीत विविध विषयांच्या अभ्यासगट व समित्यामधील निवडक अध्यक्षांची निवड केली त्यानुसार संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे अध्यक्षतेखाली गठीत विषय योजना निश्चिती समितीने प्राथमिक/उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांकरीता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषयनिहाय निश्चित करुन दिली आहे. त्यानुषंगाने अशी अर्हता निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन क्र. १, ३ व ४ येथील शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी, २०१३, दिनांक २५.०१.१९९० आणि शासन पत्र दिनांक ०९.११.२०१२ अधिक्रमीत करण्यात येत असून, राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

१.१) इयत्ता १ ली ते ५ वी करिता (प्राथमिक शिक्षक):-

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः-

या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ठ “अ” नुसार प्राथमिक शिक्षकाकरीता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल.

आ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibity Test- TET) उत्तीर्ण अनिवार्य असेल.

१.२) इयत्ता ६ वी ते ८ वी करिता (उच्च प्राथमिक शिक्षक) :-

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः-

सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “ब” नुसार उच्च प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल.

आ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibity Test- TET) उत्तीर्ण अनिवार्य असेल.

१.३) इयत्ता ९ वी ते १० वी करिता (माध्यमिक शिक्षक ) :-

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “क” नुसार माध्यमिक शिक्षकांकरीता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल.

१.४) इयत्ता ११ वी ते १२ वी करिता (उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक) :-

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

या शासन निर्णयसोबत जोडलेल्या परिशिष्ट “ड” नुसार उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल.

२) प्रशिक्षण :-

अ) ज्यांची शैक्षणिक अर्हता ५०% गुणांसह कला, विज्ञान, वाणिज्य शाखेची पदवी आणि D.Ed. अशी असेल किंवा किमान ४५% गुणांसह कला, विज्ञान, वाणिज्य शाखेची पदवी आणि एक वर्षाची शिक्षण शास्त्रातील (B.Ed) पदवी उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांची नियुक्ती दिनांक ०१ जानेवारी, २०१२ पूर्वी इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत प्राथमिक शिक्षक पदावर झाली असेल त्यांना

नियुक्तीनंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेद्वारे मान्यता प्राप्त ६ महिन्यांचा प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक आहे.

ब) ज्यांच्याकडे D.Ed. (विशेष शिक्षण) अथवा B.Ed. (विशेष शिक्षण) अर्हता, त्यांनी नियुक्ती नंतर प्राथमिक शिक्षणशास्त्रातील राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदाद्वारे मान्यता प्राप्त ६ महिन्यांचे प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक आहे.

३) पात्रता गुणांच्या टक्केवारीत सुट: इयत्ता १ ली ते ८ वी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या

पदांकरीता अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती/भटक्या जमाती-ब/भटक्या जमाती-क/ भटक्या जमाती-ड/ इतर मागास प्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये ५% सुट देण्यात येईल.

४. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCET) नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या आणि सुधारीत केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि आवश्यक तेथे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या, शासकीय, अनुदानित, अशंताः अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थ सहाय्यित शाळांमधील शिक्षक पदावर नियुक्ती करिता अनिवार्य असेल.

५. राज्य शासन किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या राज्य शैक्षणिक प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांना किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमध्ये आवश्यक ती भर घालता येईल.

६. प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतांमध्ये करावयाच्या उपरोक्त सुधारणा ह्या महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये करण्यात येत आहेत.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१९०२०७१७२६५३४८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment