दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व शाळामध्ये मातांचा सन्मान सोहळा आयोजित करणे बाबत international women’s day celebration
संदर्भ
: १) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय, क्र. संकीर्ण- २०२१/ प्र.क्र.१७९/एसडी-६, दि. २९ जून २०२२.
२)या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मप्रशिप/सशि/FLN/कास/२०२५-२६/२०५६, दिनांक १४ जुलै २०२५.
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या अनुषंगाने मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये मातांचा सहभाग केल्यामुळे राज्यात निपुण माता-पालक गट कार्यक्रम यशस्वीरित्या सुरु आहे. मुलांच्या शिक्षणात मातांचा सहभागाने शाळा, माता गट व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या पुढाकाराने गावात शैक्षणिक वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. या करीता प्रत्येक शाळेने इयत्ता १ ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांच्या मातांचे वाडी-वस्ती निहाय माता-पालक गट बांधणी करून शिक्षणात सक्रीय सहभाग होण्यास सदर गटांचे कार्य सुरु आहे.
सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करीता प्रत्येक शाळेअंतर्गत वाडी-वस्ती निहाय असलेल्या निपुण माता गटाचा अधिक सक्रीय सहभाग होण्यासाठी सर्व शाळांमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळा स्तरावर माता गटांना एकत्र करून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव ग्रामस्थांसमोर करावयाचा आहे. माता गटांना सन्मानित करून त्यांच्या कल्पना व त्यांनी मुलांच्या शिक्षणात वाढविलेल्या सक्रीय सहभागाबद्दल गावातील नागरिकांना माहिती देणे, जेणेकरून प्रत्येक मूल निपुण होण्यासाठी मदत होईल. महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपुण करण्यास महिला दिनानिमित्त माता-पालक गटाच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन प्रत्येक शाळा स्तरावर करावे.
शाळा स्तरावर जागतिक महिला दिनानिमित्त मातांचा सन्मान सोहळा व उपक्रमाचे आयोजन पुढील प्रमाणे करावे.
१. गावातील सर्व मातांना व ग्रामस्थांना शाळा स्तरावर निमंत्रित करावे.
२. सदर कार्यक्रमात प्रत्येक गटाच्या लीडर मातांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात यावी.
३. आदर्श माता-पालक गट संकल्पना व्हिडिओ दाखवणे व आदर्श गटा बाबत गटचर्चा करणे.
४. शाळेत शिक्षक/मुख्याध्यापक माता-पालक गटांना, जागतिक महिला दिनानिमित्त थोर महिलांच्या कार्याची यशोगाथा सांगतील. (उदा. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इ.)
५. मुलांच्या शिक्षणात मातांचा महत्वपूर्ण सहभाग याबाबत मार्गदर्शन करणे.
६. भाषण निवडक विद्यार्थ्यांकडून आई बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे.
७. यशोगाथा गावातील मातांच्या सहभागामुळे मुलांच्या शिक्षणात झालेले बदल याबाबत एका मातेची यशोगाथा सादर करणे व लिहून पाठवणे.
८. निपुण सखी प्रमाणपत्र निपुण कार्यक्रमात मातांचा उत्कृष्ट सहभागा बद्दल मातांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात यावे.
सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या स्तरावर विभाग/जिल्हा/तालुका स्तरावर सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करावे व दिनांक ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त शाळास्तरावर माता गटांना निमंत्रित करून शाळा स्तरावर माता-पालक गट सन्मान सोहळ्याचे आयोजन करणेबाबत सूचना देण्यात याव्या. तसेच माता पालक सन्मान सोहळ्याची माहिती निवडक बोलक्या फोटोसहीत व सन्मान सोहळा संबंधित अहवाल या कार्यलयास सादर करावा. कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी निवडक बोलके फोटो व लिखित अनुभव या कार्यालयाच्या सोशल मिडिया हँडलला Tag करून प्रसारित करण्यात यावे.









