निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सध्याच्या विविध प्रपत्रांमध्ये सुधारणा करुन एक नमुना तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने तयार करणे आणि इतर बदलांबाबत nivruttivetan online prapatra paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सध्याच्या विविध प्रपत्रांमध्ये सुधारणा करुन एक नमुना तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने तयार करणे आणि इतर बदलांबाबत nivruttivetan online prapatra paripatrak 

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांकः सेनिवे-२०१४/प्र.क्र.३६/सेवा-४

वित्त विभाग

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

तारीख: ०२ जुलै, २०१५.

प्रस्तावना –

शासकीय सेवेतून सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तसेच सेवेत असताना मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मध्ये विहीत केलेली निवृत्तीवेतन विषयक विविध प्रपत्रे कार्यालय प्रमुखांकडून भरुन घेण्यात येतात. त्या नंतर त्यांचे निवृत्तीवेतन प्रकरण निवृत्तीवेतन प्राधिकृत करण्याकरिता महालेखापाल कार्यालयास पाठविण्यात येते. अशा प्रकारे आवश्यक माहिती प्राप्त होऊन कार्यपध्दती पूर्ण होण्यास, निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यास व मंजूरी मिळण्यास बराच कालावधी व्यतित होतो आणि पर्यायाने निवृत्तीवेतन प्रदानास त्यामुळे विलंब होतो. प्रचलित नियमातील काही तरतूदी आता कालबाह्य झाल्यामुळे त्यात बदल करणे अथवा अनावश्यक तरतूदी वगळणे आवश्यक झाले आहे. असा विलंब टाळण्यासाठी कार्यपध्दतीत सुधारणा करणे आणि अगदी आवश्यक तेवढी कागदपत्रे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून / त्याच्या कुटुंबाकडून प्राप्त करुन घेणे शक्य व्हावे या करीता निवृत्तीवेतन विषयक नमुने एकत्र करुन एकच नमुना निर्धारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने शासन आता खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय –

(अ) निवृत्तीवेतन प्रकरण संगणक प्रणालीव्दारे तयार करण्यास तसेच निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त करण्याकरिता विविध नमुन्यांऐवजी एकाच नमुन्याचा वापर करुन माहिती प्राप्त करणे व ती एकाच नमुन्यात महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यास मान्यता देणे.

१) निवृत्तीवेतन वाहिनी या संगणक प्रणालीवर निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दिनांक ०१ सप्टेंबर, २०१५ पासून सदर प्रणालीव्दारे निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यास व ते नमुना-१ या परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या नमुन्यात तयार करुन सदर प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. दिनांक ०१ सप्टेंबर, २०१५ नंतर प्रत्येक निवृत्तीवेतन प्रकरण नवीन नमुन्यात तयार करुन सादर करणे बंधनकारक राहिल.

२) कार्यालय प्रमुखांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती प्राप्त करुन घ्यावी. त्या आधारे प्रणालीत माहिती भरुन परिशिष्ट-अ मधील नमुना-१ तयार करावा व त्याची प्रत मुद्रीत करुन प्रकरण महालेखापाल कार्यालयास सादर करावे.

(ब) निवृत्तीवेतन प्रकरण तयार करणे :-

(१) सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची जबाबदारी:-

१) यासोबतच्या परिशिष्ट-अ मधील नमुना-१ मधील माहिती विहित मुदतीत भरुन कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे ही सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी राहील.

२) यासोबतच्या परिशिष्ट-अ मधील नमुना-१ मधील माहिती भरुन लवकरात लवकर कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे ही स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी राहील.

३) यासोबतच्या परिशिष्ट-अ मधील नमुना-१ मधील माहिती भरुन लवकरात लवकर कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे ही सेवेत असतांना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाची जबाबदारी राहील. ४) परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेला नमुना-१ निवृत्तीवेतनवाहिनी या प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यातील निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरिता अत्यंत आवश्यक अशी वैयक्तिक माहिती सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने किंवा सेवेत असतांना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाने सादर करावी. ५) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम क्रमांक १२१ (१) (सी) मधील तरतूदीनुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने भरावयाच्या प्रपत्र-ड मध्ये निरक्षर (लिहिता / वाचता न येणाऱ्या) कर्मचाऱ्याच्या बोटांचे ठसे प्राप्त करुन घेण्याची तरतूद आहे. या आदेशाच्या दिनांकापासून साक्षर कर्मचाऱ्याच्या बोटांचे ठसे सेवानिवृत्तीवेतन विषयक प्रकरणाकरीता प्राप्त करुन घेण्यात येऊ नयेत.

६) यापुढे निवृत्त होणाऱ्या / झालेल्या कर्मचाऱ्याने / सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाने अशा कर्मचाऱ्याचा आधार क्रमांक प्रणालीत नमूद करणे बंधनकारक राहील.

७) सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने निवृत्तीवेतनाचे प्रकरण तयार होताना तो, निवृत्तीवेतन ज्या विहित बँकेच्या शाखेतून (कोअर बँकिग सिस्टिम उपलब्ध असणाऱ्या) घेऊ इच्छितो अशा बँकेत खाते उघडणे बंधनकारक राहिल. त्याचप्रमाणे सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाने अशा प्रकारचे बँक खाते उघडणे बंधनकारक राहिल. परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या नमुना-१ मधील माहिती देतांना त्यात बँकेच्या शाखेचा IFS Code व खाते क्रमांक अचूक नमूद करणे ही सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची / सेवेत असतांना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाची जबाबदारी राहिल.

(२) कार्यालय प्रमुखाची जबाबदारी :-

१) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील प्रकरण १० मध्ये विहीत केलेल्या कालावधीत कार्यालय प्रमुखाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याकडून सेवानिवृत्तीप्रकरण तयार करण्याकरीता महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम क्रमांक ११५ (१) (२), ११६ (१४), ११७ (७), १२१ (१) (सी) व १२३ (१) व (३) प्रमाणे आवश्यक माहिती परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या नमुना-१ मध्ये प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

२) कार्यालय प्रमुखाने शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीप्रकरण तयार करण्याकरीता महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम क्रमांक १३६ (२) (बी), १३६ (३) (अ) आणि (ब) आणि १४४ (२) (बी) (i), (सी) (iii) आणि (डी) (i) प्रमाणे विहित केलेली आवश्यक माहिती कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडून परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या नमुना-१ मध्ये शक्य तेवढ्या लवकर प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

३) कार्यालय प्रमुखाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याकडून / शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाकडून केवळ निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरिता अत्यावश्यक अशी, अशा कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात अथवा इतर वैयक्तिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध नसेल एवढीच वैयक्तिक माहिती प्राप्त करुन घ्यावी.

४) कार्यालय प्रमुखाने उपरोक्त प्रकारे प्राप्त झालेली माहिती तसेच कार्यालयीन अभिलेखात उपलब्ध असलेली माहिती प्रणालीमध्ये भरावी. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेली कर्मचाऱ्यासंबंधीची माहिती आपोआप उपलब्ध होईल.

५) नियत वयोमानाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वी किमान सहा महिने आधी कार्यालय प्रमुखांनी परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या नमुना-१ मध्ये निवृत्तीवेतन प्रकरण तयार करणे आवश्यक आहे.

६) शासन असेही आदेश देत आहे की, दिनांक ०१ सप्टेंबर, २०१५ पासून पुढे नियत वयोमानाने अथवा स्वेच्छेने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या नमुना-१ मध्ये तयार करुन ती महालेखापाल कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. दिनांक ०१ सप्टेंबर, २०१५ पूर्वी नियत वयोमानाने अथवा स्वेच्छेने सेवानिवृत्त झालेल्या किंवा त्या दिनांकापूर्वी शासन सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, परंतू ज्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे सादर झालेली नाहीत, अशा कर्मचाऱ्यांची प्रकरणे देखील परिशिष्ट-अ मधील नमुना-१ मध्ये भरुन तयार करुन महालेखापाल कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

(७) कार्यालय प्रमुखाने उपरोक्त प्रमाणे तयार केलेला नमुना-१ मुद्रीत करुन घ्यावा. त्यावर स्वाक्षरी करावी आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह तसेच मूळ सेवापुस्तकासह असे प्रकरण महालेखापाल कार्यालयास मंजूरीस्तव सादर करावे.

(क) इतर महत्वाच्या सुचना :-

१) दिनांक ०१ सप्टेंबर, २०१५ पासून संगणक प्रणालीवर तयार होणाऱ्या नमुन्या व्यतिरिक्त इतर प्रकारे तयार करण्यात आलेली निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयात स्वीकारण्यात येणार नाहीत.

२) सेवा निवृत्तीच्या दिनांकास प्रतिनियुक्तीवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १२९ नुसार विहीत केलेल्या प्राधिकाऱ्याने सेवा निवृत्तीवेतन प्रकरण संगणक प्रणालीवर तयार करावे व वर दर्शविलेल्या पध्दतीने ते महालेखापाल कार्यालयाकडे पाठवावे.

३) शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वी किमान तीन महिने आधी सुधारीत प्रपत्रात माहिती भरुन सेवानिवृत्ती प्रकरण प्राधिकृत करण्याकरिता महालेखापाल कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक आहे.

४) या संदर्भातील सविस्तर सूचना या शासन निर्णयासोबत परिशिष्ट-ब मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करावे.

(ड) नवीन सुधारणाः-

१) या आदेशाच्या दिनांकापासून १५ वर्षानी निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करण्याकरिता निवृत्तीवेतनधारकाकडून अर्ज प्राप्त करुन घेणे आवश्यक राहणार नाही. अधिदान व लेखा अधिकारी आणि कोषागार अधिकाऱ्यांनी निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग निवृत्तीवेतनधारकाच्या अर्जाशिवाय पुनःस्थापित करावा. (कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना पुनः स्थापनेचा लाभ अनुज्ञेय नाही)

२) या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मध्ये करावयाच्या सुधारणा

यथावकाश करण्यात येतील.

३) ज्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन प्राधिकृत करण्याची प्रकरणे या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात यावयाची आहेत, त्या प्रकरणीच हा शासन निर्णय लागू राहील.

इ) या शासन निर्णयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध

करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१५०७०२१२०४४१०१०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने

साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment