अवर्षण / दुष्काळग्रस्त भागातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत students exam shulka circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अवर्षण / दुष्काळग्रस्त भागातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत students exam shulka circular 

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्र. एडीआर-२०२६/प्र.क्र.८५/६-१९०६७७४/तांशि-६

मंत्रालय, विस्तार भवन, मादाम कामा मार्ग

हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – ४०००३२.

दिनांक : ०३ नोव्हेंबर, २०२६.

संदर्भ:-

१. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र. क्र. ८५५/तांशि-४, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२६.

२. मदत व पुनर्वसन विभाग शासन निर्णय क्र. समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२, दिनांक २५ सप्टेंबर, २०२६.

३. मदत व पुनर्वसन विभाग शासन निर्णय क्र. समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२६.

४. मदत व पुनर्वसन विभाग शासन निर्णय क्र. समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२६.

५. संचालक, कला संचालनालय यांचे पत्र क्र. डिओओ-२०२६/दोन/१३८७, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२६.

प्रस्तावना:-

उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय क्र. २ अन्वये मदत व पुर्नवसन विभागाने सन २०२६ च्या खरीप हंगामात Trigger-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे तसेच मदत व पुर्नवसन विभागाने उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय क्र. ३ अन्वये दुष्काळी तालुक्यांची संख्या अंतिमतः ३०४ इतकी निर्धारित केली आहे. सदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष बाब म्हणून लागू केलेल्या उपाययोजना व सवलतींमध्ये शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी अशी सवलत लागू केली आहे.

त्याच अनुषंगाने अवर्षण / दुष्काळग्रस्त भागातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय क्र. ३ मध्ये नमूद अवर्षण/दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये तत्कालीक व आगामी परीक्षांचा आर्थिक भार विचारात घेता आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी येणारा खर्च एकूण रु.२०,३८, ६३०/- (रुपये वीस लाख अडतीस हजार सहाशे तीस फक्त) इतका आहे.

२. अवर्षण / दुष्काळग्रस्त भागातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे:-

१) जे विद्यार्थी त्याच परीक्षेला दुसऱ्यांदा किंवा पुनर्प्रविष्ठ (रिपिटर) म्हणून बसले असतील आणि ज्यांना इतर योजनेतून १००% लाभ मिळत असेल, त्यांना दुहेरी लाभ दिला जाणार नाही.

२) ज्या विद्यार्थ्यांनी बहिःस्थ (External) म्हणून नोंदणी केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना सदर सवलत अनुज्ञेय असणार नाही.

३) ज्या विद्यार्थ्यांचे पालक प्रत्यक्ष शहरात राहून नोकरी/धंदा करतात, परंतु त्यांच्या नावावर गावामध्ये शेतजमीन आहे, अशा विद्यार्थ्यांना सदर सवलत अनुज्ञेय असणार नाही.

४) कला परिसंस्थांकडून परीक्षा शुल्क माफ करण्याच्या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव मागविण्यात यावेत. प्राप्त प्रस्तावातील प्रमाणित माहिती, योजनेचे निकष व पात्रता यांची सखोल तपासणी करुनच परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत कार्यवाही करावी.

५) शिष्यवृत्ती पडताळणी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या मागासवर्गीय अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आधीच ५०% किंवा १००% परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची माहिती कला परिसंस्थांकडून मागविण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांना ५०% लाभ मिळाला आहे, त्यांना उर्वरित ५०% रकमेची माफी देण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला लाभाची द्विरुक्ती होणार नाही.

३. सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेला खर्च महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या खाते क्र. ४३१९५६३०४४० या चालू खात्यामधून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२६११०३१५५४५८०१०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

प्रति,

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

DR SHRIKANT

LAXMANRAO

PULKUNDWAR

(डॉ. श्रीकांत पुलकुंडवार) सहसचिव, महाराष्ट्र शासन.

१) संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

२) संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

३) महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.

४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

५) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.

६) कार्यासन तांशि-६ संग्रहार्थ.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment