“प्रामाणिक पहारेकरी” मराठी बोधकथा marathi bodhkatha
प्रामाणिक पहारेकरी
एकदा छत्रपती शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजूत खूप दूर होता. दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहोचणे शक्य नव्हते. साहजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यासह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहोचले, परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झालेले होते. आता काय करायचं? असा प्रश्न सर्वांच्याच चेहऱ्यावर उमटला.
दिवस मावळला होता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतीलच असा विश्वास सगळ्यांना वाटत होता, गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, “कोण आहे रे पलीकडे? दार उघड!” “तुमी कोण हायसा ?” पहारेकऱ्याने आतून दरडावूनच विचारलं.
पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आले. तरीही हसू दाबत महाराज म्हणाले, “आम्ही महाराज आहोत.” पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता, तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार? त्याला वाटले, ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय. तो आपला विचार करत राहिला आणि इकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, “अरे, उघड की दरवाजा !
“तुमी कुणी बी असा; पण दरवाजा उघडायला न्हाय जमायचं पाव्हणं! आव सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा हुकूम आहे. आन् आमचं महाराज काय बी झालं तरी सोताचा हुकूम सोताच कधीच मोडाय सांगत नाहीत. असं समदी म्हनत्यात ! आवं, कुणीही लुंग्या, सुंग्या येईल आन् महाराजांचं नाव घिऊन दार उघडाया सांगन. आम्हांला एवढं कळना व्हय? तवा तुमी कुणीबी असा रातभर भायीरच बसा ! दिस उजाडल्यावर बघू आपण कोण असन ते.”
महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला नियम त्यांना
मोडायचा नव्हता. महाराजांनी मग अख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली. सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यांनी रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचे पाहिले. त्यांनी नीट खातरजमा करून त्यांना आत घेतले. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याला कळाले, की ज्यांना रात्री आपण दरवाजावर अडवले ते खरोखरचे महाराज होते, तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला.
पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलांने पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, “तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जीवावर तर आमचे स्वराज्य उभे आहे.”







