छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मुद्देसूद मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti bhashan
ज्यांनी अन्यायाच्या अंधारात स्वराज्याचा सूर्य उगवला…
ज्यांनी तलवारीच्या धारेवर रयतेचा सन्मान जपला…
ज्यांनी सह्याद्रीला स्वाभिमान शिकवला…
असे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज !
महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते
आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो…. आज आपण फक्त एका राजाची जयंती साजरी करत नाही… आपण साजरा करतोय स्वाभिमानाचा जन्म !
पाहुणी छत्रपती तेज, झुकल्या सर्वांच्या नजरा…
जन्मदिनी राजे तुम्हाला, माझा मानाचा मुजरा…
19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊ व वडील शहाजी राजे भोसले यांच्या पोटी जन्माला आले राजे शिवछत्रपती
शिवनेरीच्या किल्ल्यावर वाढणारा तो छोटा शिवबा… आई जिजाऊ त्याला रामायण-महाभारताच्या कथा सांगत होत्या. आई जिजाऊंनी त्यांना तलवार दिली नव्हती… दिलं होतं धैर्य! दिलं होतं स्वराज्याचं स्वप्न ! त्या संस्कारातून घडला – सह्याद्रीचा सिंह !
आईच्या संस्कारांनी घडला तो सिंह महान,
जिजाऊंच्या स्वप्नातून जन्मला स्वराज्याचा अभिमान…
आपण वयाच्या सोळाव्या वर्षी हातात मोबाईल घेऊन बसलोय अरे माझ्या राजाने अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी स्वराज्याच तोरण बांधलं. आई भवानी समोर स्वतःच्या हाताचा अंगठा कापून रक्ताने अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन गड किल्ले जिंकले.
शिवराय एकटे नव्हते… त्यांच्या पाठीशी होते निष्ठावान मावळे! तानाजी मालुसरे – सिंहगड जिंकताना वीरमरण… बाजीप्रभू देशपांडे – पावनखिंडीत छातीवर गोळ्या झेलल्या… मुरारबाजी – रणांगणात शेवटच्या श्वासापर्यंत लढले…
जो 65 किलोची तलवार चालवतो त्याच नाव येसाजी…
जो 2000 सैन्याशी एकटाच झुंजतो त्याच नाव बाजी…
जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याच नाव तान्हाजी..
जो आठ तासात घोडा पुण्याहून दिल्ली ला घेऊन येतो त्याच नाव संताजी…
जो ढान्या वाघाला एकटा फाडतो त्याच नाव संभाजी….
आणि या सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्याच तोरण बांधतो त्याच नांव छत्रपती शिवाजी महाराज..
स्वराज्य वाढत होतं…. आणि विजापूरचा सरदार अफजलखान संतापला. तो सैन्य घेऊन निघाला… मंदिरं फोडली…. भीती पसरवली…. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली…. दोघे आलिंगनासाठी पुढे आले…. पण खानाने कपटाने कट्यार काढून महाराजांवर वार केला! क्षणभर शांतता पसरली…. पण शिवराय सज्ज होते! अंगावर चिलखत होतं! आणि एका क्षणात -वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला! सह्याद्री दणाणून गेला! जय भवानी! जय शिवाजी! असा नारा घुमला !
वाघनख्यानी अफजलखानाचा कोथळा फाडून गेला…
मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला…
स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्याला झुकून मुजरा केला….
असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला….
माझा शिवबा होऊन गेला…
शिवाजी महाराजांनी अनेक महान कार्य केली. रायगडावर भगवा फडकला! स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला! तो क्षण फक्त राज्याभिषेक नव्हता… तो होता गुलामगिरीवर दिलेला प्रहार !
शाहिस्तेखान ची बोटे कापली. विजापूर आणि दिल्ली च्या राजांना आपल्या पुढे झुकवले.
शिवराय गेले… पण त्यांचा वारसा जिवंत होता छत्रपती संभाजी महाराज ! औरंगजेबाने छळ केला… धर्म बदलायला सांगितलं… पण संभाजी महाराजांनी सांगितलं “देह घे… पण स्वाभिमान नाही!” हा आहे महाराष्ट्राचा रक्ताचा रंग!
मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा झुकले नाही डोळे त्यांचे असा माझ्या शिवबाचा छावा…..
३ एप्रिल १६८०… रायगड शांत झाला… मावळ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले… छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. तो फक्त मृत्यू नव्हता… तो होता एका युगाचा अस्त… पण महान व्यक्तिमत्व कधी मरत नाही. ते विचार बनून जिवंत राहतात. देह गेला पण तेज राहिलं, स्वराज्याचं स्वप्न जिवंत राहिलं…
आज या शिवजयंतीच्या पवित्र दिवशी… आपण सगळे उभे राहून… हृदयावर हात ठेवून… त्या महान राजाला, त्या स्वराज्याच्या शिल्पकाराला, त्या सह्याद्रीच्या सिंहाला… मानाचा मुजरा करूया!!! चला पूर्ण ताकदीने घोषणा देऊया जय भवानी!!! जय शिवाजी!!!
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!







