लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर सर्व तत्सम स्पर्धा परीक्षा, सेवांतर्गत परिक्षा त्याचप्रमाणे इतर लेखी परिक्षांसाठी लेखनिक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत मार्गदर्शक सूचना disabilities students competitive exams
प्रस्तावना :-
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम १७ (आय) मधील तरतूदीनुसार ज्या दिव्यांग व्यक्तींना लेखी परिक्षांसाठी लेखनिक तसेच इतर सोयी-सुविधांची आवश्यकता आहे, त्यांना सदर सवलती उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तथापि अशा सूचना संबंधीत प्राधिकाऱ्यांना वेळोवेळी देऊनही दिव्यांग व्यक्तींना लेखनिक व इतर सुविधा उपलब्ध करुन देताना समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या दिनांक २९ ऑगस्ट, २०१८ च्या कार्यालयीन ज्ञापनातील सूचना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने विचार करुन उपरोक्त दिनांक ५ ऑक्टोबर, २०२१ च्या परिपत्रकान्वये यासंदर्भातील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि असे निदर्शनास आले आहे की, उक्त परिक्षांचे नियमन
करणाऱ्या यंत्रणांकडून सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने दिव्यांग परिक्षार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे उक्त परिपत्रकातील काही सूचनांबाबत परिक्षांचे नियमन करणाऱ्या यंत्रणांकडून संदिग्धता निर्माण केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. सबब यासंदर्भात केंद्र शासनाच्या वाचा क्र. ४, ५ तसेच ७ येथील कार्यालयीन ज्ञापनातील तरतूदींस अनुसरुन त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांसंदर्भात स्पष्टता आणण्याच्या दृष्टीने दिव्यांग परिक्षार्थ्यांना संबंधित परीक्षा देणे अधिक सुलभ होण्यासाठी दिनांक ५ ऑक्टोबर, २०२१ चे शासन परिपत्रक अधिक्रमित करुन नव्याने सुधारीत परिपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सबब दिनांक ५ ऑक्टोबर, २०२१ चे शासन परिपत्रक अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे.
शासन परिपत्रक :-
केंद्र शासनाने संदर्भाकित कार्यालयीन ज्ञापनान्वये दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थ्यांबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबत विविध मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याच धर्तीवर, केंद्र शासनाच्या मार्गदर्शिका स्विकृत करुन महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षा, इतर सर्व तत्सम स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे सेवांतर्गत परीक्षा यांचेकरिता दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थ्यांबाबत लेखी परीक्षा घेताना लेखनिक तसेच इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मार्गदर्शिका खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
१. सदर मार्गदर्शिकेस “दिव्यांगत्त्व असलेल्या व्यक्तींची लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदर्शिका, २०२५” असे संबोधण्यात यावे.
२. नियमित लेखी परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांच्याकरिता स्वतंत्र निकष असण्याची गरज नाही.
३. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २ (आर) मधील व्याख्येनुसार लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्त्व असलेल्या तसेच कलम २ (एस) मधील व्याख्येनुसार दिव्यांगत्त्व असलेल्या ज्या व्यक्तींना लिखाण करताना अडचणी / मर्यादा येतात. त्याचप्रमाणे ज्यांची लेखनाची गती कमी असते अशा दिव्यांग व्यक्तींची इच्छा असल्यास त्यांना लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
४. लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्त्व असलेल्या इतर प्रकारांतील दिव्यांग परिक्षार्थीच्या बाबतीत, संबंधित दिव्यांग व्यक्तीस लिखाण करण्यास शारिरीक मर्यादा आहेत व त्याचे वतीने परीक्षा देण्यासाठी लेखनिकाची आवश्यकता आहे, अशा आशयाचे शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी/जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रमाणित केलेले विहित नमुन्यातील (Appendix-1) प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सदर दिव्यांग परिक्षार्थी लेखनिक /वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची सुविधा उपलब्ध करून घेण्यास पात्र होईल.
तसेच अंधत्त्व / शारीरिक दिव्यांगत्त्व (दोन्ही हात बाधित असलेले / दोन्ही हात नसलेले) / मेंदूचा पक्षाघात या दिव्यांगांच्या प्रकारांमधील लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थीना त्यांची इच्छा असल्यास लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. या वर्गवारीमधील दिव्यांग परिक्षार्थ्यांना शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी/जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रमाणित केलेले विहित नमुन्यातील (Appendix-1) प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
५. तसेच कलम २ (एस) मधील व्याख्येनुसार दिव्यांगत्त्व असलेली व्यक्तीने लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या दिनांक १० ऑगस्ट, २०२२ च्या कार्यालयीन ज्ञापनातील परिच्छेद ३ (सी) मध्ये नमूद केल्यानुसार खालील समितीचे विहित नमुन्यातील (Appendix- II) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
६. दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थ्यास लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची स्वतः निवड करण्याचे अथवा परीक्षा आयोजित करणाऱ्या यंत्रणेस सदर सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्याचे स्वातंत्र्य असेल. परीक्षेच्या आवश्यकतेनुसार परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा जिल्हा स्तरावर / विभागीय स्तरावर / राज्य स्तरावर, लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांचे पॅनल करू शकेल. तसेच प्रत्येक प्रसंगी दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थी उमेदवारास परीक्षा यंत्रणेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांचेसोबत परीक्षेपूर्वी दोन दिवस अगोदर भेट घेण्याची मुभा दिली जाईल, जेणेकरून संबंधित लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक सुयोग्य आहे किंवा कसे याबाबत परिक्षार्थीस पडताळणी करता येईल.
७. अ) परीक्षा यंत्रणेने लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या प्रकरणी संबंधित लेखनिकाची शैक्षणिक पात्रता ही सदर परीक्षेकरीता निश्चित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी तथापि किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असल्याबाबत खातरजमा करावी.
ब) त्याचप्रमाणे संबंधित दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थीस स्वतः लेखनिक / वाचक /प्रयोगशाळा सहाय्यक यांची व्यवस्था करण्यास मान्यता दिली असल्यास अशा
परिस्थितीमध्ये लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता सदर परीक्षेकरिता निश्चित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा किमान एका टप्प्याने कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा किमान एका टप्प्याने कमी असावी. दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थी उमेदवाराने विहित नमुन्यात (Appendix-III) लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची माहिती परीक्षा यंत्रणेकडे देणे आवश्यक राहील.
टीप :
उपरोक्त परिच्छेदामध्ये “एका टप्प्याने कमी हा शब्दसमूह खालील तक्त्यामध्ये नमूद उदाहरणांद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. तसेच परीक्षा यंत्रणेने उपलब्ध करून दिलेला लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक हा परिक्षेसाठी विहित करण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित शाखेचा (Faculty) असावा.
उक्त तक्त्यामध्ये नमूद उदाहरणांव्यतिरिक्त संबंधित परिक्षेसाठी विहित करण्यात आलेली शैक्षणिक पात्रता भिन्न असल्यास परिक्षा यंत्रणेने वरील पद्धतीनुसार लेखनिक / वाचक /प्रयोगशाळा सहाय्यक उपलब्ध करून द्यावा.
क) संबंधित दिव्यांग परिक्षार्थीने परीक्षा यंत्रणेकडे लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केल्यास त्यानुसार परीक्षा यंत्रणेस सदर सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. तथापि जर काही अपरिहार्य परिस्थितीत परीक्षा यंत्रणा ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकली नाही, तर संबंधित परिक्षार्थ्यासंदर्भात ती परीक्षा केंद्र शासनाच्या दिनांक २६ फेब्रुवारी, २०१३ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करावी.
९. लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवारांकरीता विशेष सूचनाः-
९.१ दिव्यांग उमेदवार प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचण्यास आणि अथवा उत्तरे लिहीण्यास सक्षम नसल्याच्या कारणास्तव त्यास लेखनिकाची मदत अनुज्ञेय आहे. यास्तव, लेखनिकाने दिव्यांग
उमेदवारास केवळ प्रश्न वाचण्यास तसेच उमेदवाराने उत्तर छायांकित करण्यास / लिहीण्यास मदत करणे अपेक्षित आहे.
९.२ लेखनिकाने प्रश्न वाचून दाखवल्यानंतर उमेदवाराने सांगितलेले उत्तरच विहीत ठिकाणी छायांकित करणे/लिहीणे अपेक्षित आहे. उत्तराच्या निवडीबाबत लेखनिकाने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप / मार्गदर्शन / सूचना करू नये. तसेच परीक्षा यंत्रणेने प्रत्येकी ५ उमेदवारांकरीता (लेखनिकासह) एक समवेक्षक या प्रमाणात समवेक्षकाची नेमणूक करुन उमेदवाराने सांगितलेले उत्तरच लेखनिकाने विहीत ठिकाणी छायांकित / लिहिलेले आहे याची खातरजमा करावी. परीक्षा अधिक पारदर्शक होण्याच्या दृष्टीने परीक्षा यंत्रणेने शक्य असल्यास परीक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही / व्हिडीओ रेकॉडींग यंत्रणा बसवावी.
९.३ लेखनिकाने परीक्षा कालावधीत प्रश्नोत्तराबाबत अथवा इतर कोणत्याही विषयी उमेदवारांशी चर्चा / गप्पा करु नयेत. तसेच इतर लेखनिक / उमेदवार यांच्याशी बोलू नये.
९.४ दिव्यांग उमेदवार व लेखनिक यांना परीक्षांचे सर्व नियम / सूचना जशाच्या तसे लागू असतील.
९.५ उमेदवाराने स्वतः व्यवस्था केलेल्या लेखनिकाच्या गैरवर्तनाची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील. तसचे लेखनिक व उमेदवार यांच्यामधील संभाषणामुळे परीक्षेची शांतता कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही अथवा इतर उमेदवारांची एकाग्रता भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.
१०. आपत्कालीन परिस्थितीमध्ये परिक्षार्थीस उपलब्ध करून देण्यात आलेला लेखनिक / वाचक /प्रयोगशाळा सहाय्यक जर परीक्षा सुरु होण्याच्या ऐनवेळी उपस्थित राहू शकला नाही किंवा अन्य अपरिहार्य कारणास्तव त्यास बदलण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास अशा लेखनिकाच्या बदलण्याच्या प्रक्रीयेमध्ये लवचिकता असावी. त्यासाठी परीक्षा यंत्रणेने परीक्षा केंद्रावर आवश्यकतेनुसार राखीव लेखनिकांची व्यवस्था करून ठेवावी.
११. वेगवेगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेसाठी मुख्यत्त्वेकरुन भाषाविषयक प्रश्नपत्रिकेसाठी वेगवेगळे लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक नियुक्त करण्याची संबंधित दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थी उमेदवारास परवानगी राहील. तथापि एका विषयाकरिता एकच लेखनिक / वाचक /प्रयोगशाळा सहाय्यक वापरता येईल.
१२. परीक्षेचे माध्यम (उदा. सर्वसाधारण / ब्रेल लिपी / संगणकाद्वारे / ध्वनीमुद्रण / ठळक व मोठ्या अक्षरातील प्रती) स्विकारण्याचा पर्याय संबंधित लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्त्व परिक्षार्थी उमेदवारास उपलब्ध करावा. जेणेकरुन परीक्षा यंत्रणेस सुलभरित्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रश्नपत्रिकेचे रुपांतर मोठ्या व ठळक अक्षरातील प्रतीमध्ये / ई-टेस्ट / ब्रेल लिपी / ब्रेल मजकुराचे रुपांतर इंग्रजी व प्रादेशिक भाषांमध्ये करणे सोईचे होईल.
१३. संबंधित दिव्यांग परिक्षार्थी उमेदवारास संगणकीय प्रणालीद्वारे परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली असल्यास अशा परिस्थितीत संबंधित उमेदवारास परीक्षेच्या एक दिवस अगोदर संबंधित संगणकीय प्रणालीची पाहणी व तपासणी करण्याची परवानगी देण्यात यावी. जेणे करुन जर संगणक प्रणाली हाताळणी करण्यामध्ये काही समस्या असतील तर त्याचे निराकरण करता येईल. परंतु स्वतःचा संगणक लॅपटॉप परीक्षेस वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये. तथापि दिव्यांगत्त्व असलेल्या व्यक्तींकरिता दिव्यांग स्नेही व वैशिष्टयपूर्णरित्या बनविण्यात आलेले की-बोर्ड, माऊस अशी उपकरणे वापरण्यास परवानगी राहील.
१४. लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक पुरविण्याची प्रक्रिया सुलभ असावी तसेच सदर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या माहितीची नोंद परीक्षेचा अर्ज भरण्याच्या वेळी घेण्यात यावी. परीक्षा यंत्रणेने दिव्यांगत्त्व असलेल्या व्यक्तीने मागणी केल्यानुसार परीक्षेचे माध्यम तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी सुयोग्य अशी बैठक व्यवस्था पुरविण्यात आल्याबाबत खात्री करावी.
१५. ज्या परिक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात, त्या परिक्षांसाठी जर दिव्यांग परिक्षार्थी स्वतः लेखनिक इ. ची व्यवस्था करणार असेल तर परिक्षा यंत्रणेने संबंधित लेखनिकाबाबतची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा परिक्षार्थीस उपलब्ध करून द्यावी.
१६. कोणत्याही ठिकाणच्या सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या दिव्यांगत्त्वाच्या प्रमाणपत्राचा (UDID Certificate / Card) स्वीकार देशभरात करण्यात यावा.
१७. दिव्यांगत्त्व असलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या जादा वेळेबाबत सद्यस्थितीत प्रचलित असलेला “शब्द, “परीक्षेकरिता जादा वेळ/अतिरिक्त वेळ” याऐवजी “भरपाई वेळ” असा बदलण्यात यावा. तसेच लेखनिक / वाचक प्रयोगशाळा सहाय्यक वापरण्यास परवानगी देण्यात आलेल्या दिव्यांगत्त्व असलेल्या व्यक्तींना देण्यात येणारा सदरचा भरपाई वेळ हा प्रति तास वीस मिनिटे यापेक्षा कमी नसावा. दिव्यांगत्त्व असलेले जे परिक्षार्थी लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक वापरण्याची सुविधा मिळण्यास परिच्छेद-४ मध्ये विहित केल्यानुसार पात्र असतील, अशा परिक्षार्थीना त्यांनी लेखनिकाची सुविधा घेतलेली नसली तरीसुद्धा तीन तासांच्या परीक्षेसाठी किमान एक तास अधिक याप्रमाणे भरपाई वेळ (Compensatory Time) देण्यात यावा. जर परीक्षेचा वेळ एक तासापेक्षा कमी असल्यास भरपाई वेळ हा त्या प्रमाणात (pro-rata basis) देण्यात यावा. तथापि सदर वेळ हा पाच मिनिटांपेक्षा कमी नसावा व पाच मिनिटांच्या पटीत सदर वेळ देण्यात यावा.
१८. दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थी उमेदवारास परीक्षेसाठी आवश्यक असणारी सहाय्यक उपकरणे जसे बोलणारा कॅलक्युलेटर (ज्या परीक्षापध्दतीत कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी आहे अशा बाबतीत), टेलर फ्रेम, अॅबैंकस, ब्रेल पाटी, भूमितीय कीट, ब्रेल मोजमाप पट्टी, सुसंवादवर्धक उपकरणे जसे की कम्युनिकेशन चार्ट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इ. आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी असावी.
१९. परीक्षेच्या वेळी होणारा उमेदवाराचा संभ्रम व गोंधळ टाळण्यासाठी दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थीसाठी परीक्षेपूर्वी योग्य अशी स्वतंत्र बैठक व्यवस्था (प्राधान्याने तळमजल्यावर) करण्यात यावी. उमेदवारास प्रश्नपत्रिका दिल्याच्या वेळेची नोंद अचूकपणे घेतल्याबाबतची तसेच त्यांना वेळेवर पुरवणी पत्रिका पुरविण्यात आल्याबाबतची खात्री करावी.
२०. परीक्षा यंत्रणा, अंध उमेदवारांना शक्यतेनुसार वाचनसाहित्य ब्रेल लिपीमध्ये किंवा ई-टेक्स्ट किंवा ज्या संगणकामध्ये खुली पुस्तक परीक्षेसाठी (Open Book Exam) सुयोग्य असे स्क्रीन रिडींगचे सॉफ्टवेअर संलग्न आहे अशा स्वरुपात पुरवेल. त्याचप्रमाणे ऑनलाईन परीक्षा ही दिव्यांगत्त्व असलेल्या परिक्षार्थीसाठी वापरास सुगम्य असावी. उदा. वेबसाईट, प्रश्नपत्रिका व इतर अभ्यास साहित्य हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित व सुगम्य असावेत.
२१. ज्याप्रमाणे सद्यस्थितीतील धोरणानुसार अंध परिक्षार्थीना आकृती व आलेखाऐवजी इतर वैकल्पिक प्रश्न उपलब्ध करुन देण्यात येतात त्याचप्रमाणे दिव्यांगत्त्व असलेल्या कर्णबधीर परिक्षार्थीसाठी वर्णनात्मक प्रश्नांऐवजी इतर वैकल्पिक प्रश्न उपलब्ध देण्यात यावेत.
२२. शक्यतोवर सर्व दिव्यांग परिक्षार्थीच्या परीक्षा या तळमजल्यावर घेण्यात याव्यात. तसेच परीक्षा केंद्रे ही दिव्यांग व्यक्तींनी वापरण्याच्या दृष्टीने सुलभ व सुगम्य असावीत.
२. तसेच असे निदर्शनास आले आहे की, संबंधित परीक्षा यंत्रणांकडून उक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने दिव्यांग परिक्षार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः अंघ /शारीरिक दिव्यांग (दोन्ही हात बाधीत असलेले / दोन्ही हात नसलेले) / मेंदूचा पक्षघात या प्रकारातील लक्षणीय दिव्यांगत्त्व (Benchmark Disability) असणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित नसताना, त्यांचेकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली जाते. संबंधित उमेदवारास पुरविण्यात येत असलेल्या लेखनिकाची उमेदवारासोबत परिक्षेपूर्वी दोन दिवस आधी भेट घडवून आणली जात नाही. तसेच अनेक वेळा पुरविण्यात आलेल्या लेखनिकाचा दर्जा हा निकषांनुसार नसतो. सबब परीक्षा यंत्रणांना पुन्हा सूचित करण्यात येते की, त्यांनी उक्त सूचनांचे अधिक काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून संबंधित दिव्यांग परिक्षार्थ्यास परीक्षा देणे सुलभ होईल.
३. सदर शासन परिपत्रक संबंधीत मंत्रालयीन विभागांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख तसेच महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, मंडळे, सार्वजनिक उपक्रम व सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था यांच्या तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आयुक्त, समाज कल्याण, आयुक्त, दिव्यांग कल्याण, व संचालक (बहुजन कल्याण विकास विभाग) यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील शैक्षणिक व सर्व प्रकारच्या संस्था यांना तातडीने पाठवावे आणि वरील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना त्यांना द्याव्यात, असेही आदेश देण्यात येत आहे.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा संकेतांक क्र. २०२५०८०११५४१२११६३५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.









