“चला पाण्याचे गणित समजून घेऊया” स्थिर पाणी आणि वाहते पाणी मोजण्याची एकके पाहूया flowing and constant waters measurement 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“चला पाण्याचे गणित समजून घेऊया” स्थिर पाणी आणि वाहते पाणी मोजण्याची एकके पाहूया flowing and constant waters measurement 

पाणी म्हणजे जीवन. पण पाणी किती आहे, ते कसं मोजलं जातं, हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही.
पाण्याशिवाय आपले अस्तित्वच शक्य नाही. म्हणूनच पाण्याचा साठा किती आहे, वाहते पाणी किती आहे आणि ते मोजण्यासाठी कोणती एकके वापरली जातात, हे प्रत्येकाने समजून घेणे महत्त्वाचे आहे.
चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊ.

पाणी मोजण्याची पद्धत दोन प्रकारची आहे
*स्थिर पाणी (Static Water)* आणि
*वाहते पाणी (Flowing Water).*

*स्थिर पाणी (Static Water) मोजण्याची एकके :*

घरामध्ये, टाकीत किंवा तलावामध्ये साचलेले पाणी लहान प्रमाणात मोजण्यासाठी लिटर हा सर्वांत सोपा एकक वापरला जातो. थोड्या मोठ्या प्रमाणासाठी घनफूट (Cubic Foot) हे एकक वापरले जाते. तर मोठ्या प्रमाणातील पाणी दाखवण्यासाठी घनमीटर (Cubic Meter) हे एकक प्रचलित आहे. त्याहून मोठ्या प्रमाणात
धरणात असलेला पाणीसाठा मोजण्यासाठी आणि त्यातून सोडण्यात येणारं पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरली जातात. पाणीसाठा ‘टीएमसी’ आणि ‘दलघमी’मध्ये मोजला जातो. तर नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडणार्‍या पाण्याचा वेग मोजण्यासाठी ‘क्युसेक’ आणि ‘क्युमेक’ ही परिमाणं वापरली जातात.

लिटर (Liter) – पाण्याचे लहान प्रमाण मोजण्यासाठी

घनफूट (Cubic Foot) – थोडं मोठं प्रमाण दाखवण्यासाठी

घनमीटर (Cubic Meter) – मोठं प्रमाण दाखवण्यासाठी

१ घनमीटर = १००० लिटर

*वाहते पाणी (Flowing Water) मोजण्याची एकके :*
एक क्यूसेक पाणी म्हणजे एका सेकंदात एक धनफूट पाण्याचा प्रवाह. *या प्रमाणात एका सेकंदात २८.३२ लिटर पाणी बाहेर पडते. याचप्रमाणे १ क्यूमेक पाणी म्हणजे एका सेकंदात एक घनमीटर पाण्याचा प्रवाह. म्हणजे एक क्यूमेकमध्ये एका सेकंदात १,००० लिटर पाणी बाहेर पडते.*

क्युसेक (Cusec) – १ घनफूट प्रति सेकंद

क्युमेक (Cumec) – १ घनमीटर प्रति सेकंद

साधं लक्षात ठेवा :

*१ क्युसेक = २८.३२ लिटर प्रति सेकंद*
१ क्युमेक = १००० लिटर प्रति सेकंद

क्युसेकचे गणित :

१ फूट = ३०.४८ सेंमी

त्यामुळे १ घनफूट = ३०.४८ × ३०.४८ × ३०.४८ = २८,३१६.८५ सेमी³

१००० सेमी³ = १ लिटर

त्यामुळे *१ क्युसेक = २८.३२ लिटर/सेकंद*

टीएमसी म्हणजे काय?

मोठ्या प्रमाणासाठी एक वेगळं एकक वापरलं जातं, ते म्हणजे टीएमसी (TMC). याचा अर्थ Thousand Million Cubic Feet असा होतो. हे सोप्या भाषेत समजावायचं झालं, तर साधारण *२३०० एकर क्षेत्रात १ फूट पाणी साचलं, तर ते पाणी १ टीएमसी इतकं मानलं जातं.*

१ TMC चे गणित :

१ फूट x १ फूट x १ फूट
म्हणजे १ घनफूट पाणी

*१ घनफूट महणजे २८.३१ लिटर्स पाणी,*

१ दशलक्ष घनफूट म्हणजे १०,००,००० घनफूट पाणी.

१,००० दशलक्ष घनफूट म्हणजे १ टीएमसी पाणी
(एक अब्ज घनफूट पाणी)

*म्हणजेच १ टीएमसी = अंदाजे २८३१ कोटी लिटर पाणी*
*( २८ अब्ज ३१ कोटी लिटर)*

अशा प्रकारे पाणी मोजण्याची वेगवेगळी एकके आपल्याला पाण्याचा साठा आणि प्रवाह समजून घेण्यासाठी मदत करतात. लिटर, घनफूट आणि घनमीटर ही स्थिर पाणी मोजण्याची एकके आहेत, तर क्युसेक आणि क्युमेक ही वाहते पाणी मोजण्याची एकके आहेत. मोठ्या पातळीवर पाण्याचा साठा मोजण्यासाठी टीएमसी हे एकक प्रचलित आहे.

पाण्याचं गणित समजून घेतलं, तर पाणी किती उपलब्ध आहे, ते किती साठवता येईल आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा हे ठरवणं खूप सोपं होतं.
सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती आपण अनुभवत आहोत. काही दिवसांत कोट्यवधी लिटर पाणी नद्यांतून, धरणांतून आणि शेतांमधून वाहून गेले. पाण्याच्या या प्रचंड प्रवाहाचं नेमकं मोजमाप किती आहे हे लक्षात आलं, की पाण्याचं महत्त्व आणि त्याची ताकद अधिक जाणवते. एकीकडे लोक पाण्यासाठी तहानलेले असतात, तर दुसरीकडे पुरामुळे गावोगाव पाणीचं महासंकट उभं राहतं. अशा वेळी पाण्याचं गणित नीट समजून घेऊन पाणी साठवणूक, जलव्यवस्थापन आणि नियोजन केलं, तर भविष्यातील दुष्काळ आणि पूर या दोन्ही संकटांना सामोरं जाणं सोपं होईल.

Related posts:

Leave a Comment