२१ जून जागतिक योग दिन संपूर्ण इतिहास jagtik yog din
दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे योगाचे फायदे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यात योगाविषयी जागरूकता निर्माण करणे. योगामुळे केवळ शरीरच नाही तर मन आणि आत्म्यालाही शांती मिळते. त्यामुळे योग मानवी जीवनात खूप महत्त्वाचा आहे.
२०१४ साली सप्टेंबर महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव १७५ देशांनी मान्य केला आणि डिसेंबर २०१४ मध्ये त्याला अंतिम मान्यता मिळाली. त्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिल्यांदाच हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला.
दिल्लीतील राजपथावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी स्वत: योगासने केली. या कार्यक्रमात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार झाले – एक म्हणजे सर्वात मोठ्या योगवर्गात ३५,९८५ लोकांनी सहभाग घेतला, आणि दुसरा म्हणजे ८४ वेगवेगळ्या देशांतील लोकांनी त्यात भाग घेतला.
२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो – या दिवशी सूर्य उगवतो लवकर आणि मावळतो उशिरा. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
योग ही भारताची खूप जुनी परंपरा आहे. शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या योगसाधना केल्या जातात. पूर्वीपासून गुरु-शिष्य परंपरेने हा ज्ञानसाठा जतन केला आहे. मात्र, अनेक लोकांना योगाविषयी योग्य माहिती नव्हती किंवा चुकीचे समज होते. काहींना वाटायचं की योग म्हणजे धार्मिक गोष्ट आहे, तर काहींनी योगाचे चुकीचे प्रकारही तयार केले – जसं की ‘बियर योग’ किंवा ‘डॉग योग’. त्यामुळे योगाचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा, हेही जागतिक योग दिन साजरा करण्यामागे एक कारण आहे.
हा दिवस साजरा करून योगाचे शास्त्रशुद्ध स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे. अनेक सरकारी व खासगी संस्थांनी, शाळांनी, महाविद्यालयांनी योगाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबवले आहेत. यात योगासने, प्राणायाम, शुद्धीक्रिया यांची प्रात्यक्षिके घेतली जातात. योगावरील व्याख्याने, प्राचीन ग्रंथांतील माहिती, योगातील तत्त्वज्ञान यांवर आधारित सत्रं घेतली जातात. विद्यार्थ्यांसाठी सामूहिक सूर्यनमस्कार व योग कार्यशाळाही घेतल्या जातात.
कोविड महामारीच्या काळात, विशेषतः २०२० व २०२१ मध्ये, लोक एकत्र येऊ शकत नसतानाही इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. घरूनच लोकांनी एकत्र योग केला आणि आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला.
दरवर्षी योग दिनाला एक विशिष्ट संकल्पना (theme) दिली जाते. काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:
२०१७ – आरोग्यासाठी योग (Yoga for Health)
२०१८ – शांततेसाठी योग (Yoga for Peace)
२०१९ – हृदयासाठी योग (Yoga for Heart)
२०२० – कुटुंबासोबत योग (Yoga at Home and Yoga with Family)
२०२१ – सर्वांगीण कल्याणासाठी योग (Yoga for Well-being)
या माध्यमातून योगाचा सर्वांगीण उपयोग अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.