क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रथम क्रमांक मिळवून देणारे मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रथम क्रमांक मिळवून देणारे मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti 

ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञानसंवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई !

देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई !

धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे.. क्रांतीज्योती सावित्रीबाई !

आज ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती….

“स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया,

शब्द ही अपुरे पडती तुमचे गुण गाया !

विधवा, अनाथांच्या बनल्या तुम्ही आई,

त्रिवार वंदन करतो /करते व माझ्या भाषणाला सुरुवात करतो / करते

सावित्रीबाईंच्या स्मृतिगंधात रंगलेले ज्ञानमय व्यासपीठ, सावित्रीबाईंसारखे ज्ञानदानाचे महान कार्य करणारे माझे प्रिय गुरुजन, ज्ञान उपासक मित्र व मैत्रिणींनो…. सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे, पण सावित्रीबाई फुले ज्या परिस्थिती मध्ये शिकल्या व मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा जर

आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळेल. त्या काळात मुली जन्माला येणं हे सुद्धा पाप समजलं जात होतं, त्या काळात मुली नऊ दहा वर्षांच्या झाल्या की त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्षे वयाने मोठ्या पुरुषाशी लावून दिलं जात होत. त्या काळात महिलांना अबला, कमजोर समजलं जायचं. त्या काळात महिलांना शिक्षणाचे..

अधिकार नव्हते. त्यांना समाजात मान सन्मान नव्हता. त्या काळाच्या काही कर्मठ लोकांना माहीत होत, या अबला जर शिकल्या, या अबला जर सबला झाल्या तर आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. अशा अंधकाराच्या वाता-वरणात दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाईच्या पोटी एका वाघिणीचा

जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभं राहत त्यांचं सुंदर प्रतिबिंब ! सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी, स्त्री मुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च केलं.

मित्रांनो, अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी…

सावित्रीबाई सरस्वती ठरल्या ! महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिणी आहे, स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते, हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले.

मित्रांनो, स्त्री शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. याकरिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी खूप संघर्ष केला. या कालबाह्य रूढीच्या बेड्या तोडण्याकरिता ज्योतिबा व सावित्री बाईंनी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. अशाप्रकारे सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात ज्ञानाची ज्योती पेटवली. स्त्रियांनी शिकणे व शिकवणे धर्माला अनुसरून नाही, असे काही लोकांना वाटे. अशा

लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला. सावित्रीबाई शाळेत जायला निघाल्या, की हे विरोधक त्यांच्यावर दगड, शेण व चिखल फेकत. पण सावित्रीबाईंनी या सगळ्यांना खंबीरपणे तोंड दिले.

मित्रांनो, सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नाही तर विधवांची परिस्थिती सुधारावी आणि बालहत्या थांबाव्यात म्हणून त्यांनी आश्रम उभारले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा ही सावित्रीबाईंनी यशस्वीरित्या सांभाळली. स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या, दीनदलितांना मायेने जवळ घेणाऱ्या, अनाथांना आश्रय देणाऱ्या आणि ज्योतिबांच्या खांद्याला खांद्या लावून स्त्री शिक्षणाचा दिवा देशात लावणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू देखील समाजसेवेचे व्रत करत असतानाच झाला. मित्रांनो, आपणा सर्वांना कोरोना माहीतच आहे. कोरोना जसा संसर्गजन्य आजार आहे तसाच एक आजार म्हणजे प्लेग….. प्लेगमुळे माणसाला काखेत गाठ यायची आणि काही दिवसांनी माणूस मरायचा. ज्याप्रमाणे कोरोनामुळे 2020-21 मध्ये आपल्या भारतात लक्षावधी लोक मेले. त्यापेक्षाही भयंकर अशी प्लेग साथ 1896-97 मध्ये पुण्यात पसरली होती. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्लेगच्या रुग्णांची सेवा केली. अशातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या आणि समाजसुधारणे च्या अनमोल कार्यामुळे त्या अनंत काळपर्यंत स्मरणात रहातील.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

“आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी,

झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी !!

ज्ञानाचा प्रकाश पसरविणाऱ्या तुम्ही ज्ञानज्योती !

वंदन करतो मनोभावे तुम्हाला कोटी कोटी !!

 

Related posts:

Leave a Comment