“कर्तव्यनिष्ठा” मराठी बोधकथा marathi bodhkatha
कर्तव्यनिष्ठा
फ्रान्स या देशामधील ही गोष्ट आहे. पेरिस शहरात मोठी दंगल झाली. मॅथ्यू हेन्जलर नावाचा पत्रकार प्रत्यक्ष दंगलीच्या ठिकाणी जाऊन आपल्या वर्तमानपत्रासाठी बातमी तयार करत होता. दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शेवटी गोळीबार करावाच लागला. त्यात चुकून त्या पत्रकाराला एक गोळी लागली. तो जखमी झाला. लगेच डॉक्टरांना बोलवण्यात आले, घायाळ झालेला तो पत्रकार डॉक्टरांना म्हणाला, “मी लिहू शकत नाही. भयंकर वेदना होत आहेत.” डॉक्टर त्याला धीर देत म्हणाले, “अरे लिहायचे काय घेऊन बसलाय ? आता तुला प्रथम विश्रांतीची खूप गरज आहे.”
त्यावर तो पत्रकार म्हणाला, “प्रथम मला माझे कर्तव्य बजावले पाहिजे. प्रत्येकाचे काम ठरलेले असते. माझे काम बातमी लिहिणे आहे. कृपया हा माझा कागद घ्या व त्याच्या खाली लिहा. सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पोलिसांनी गोळीबार केला. तीन माणसे जखमी झाली व एक मरण पावला.” डॉक्टरांनी विचारले, “मेला कोण”? उत्तर मिळाले “मी” आणि हे सांगता सांगताच त्या पत्रकाराने आपला प्राण सोडला.








