“हंस कोणाचा ?” मराठी बोधकथा marathi bodhkatha
हंस कोणाचा ?
भगवान गौतम बुद्धांच्या बालपणीची ही गोष्ट आहे. दहा-अकरा वर्षांचे वय होते. बुद्धांचे! ते तेव्हा त्यांच्या मूळ ‘सिद्धार्थ’ या नावानेच ओळखले जात होते. एकदा छोटा सिद्धार्थ आपल्या मित्रासह राजोट्यानात बोलत बसला असता, बाण लागल्यामुळे रक्तबंबाळ झालेला एक हंस कसाबसा उडत त्याच्या पुढ्यात येऊन पडला. सिद्धार्थने त्याला उचलले, जवळच्या पुष्करणीपाशी नेऊन पाणी पाजले आणि थोडा वेळ प्रेमाने कुरवाळले, नंतर त्याने त्याची जखम धुवून तिच्यावर औषधी वनस्पती लावली. एवढं झाल्यावर त्या हंसाला थोडे बरे वाटू लागले. तेवढ्यात सिद्धार्थचा अंदाजे त्याच्याच वयाचा चुलत भाऊ देवदत्त तेथे आला व म्हणाला, “सिद्धार्थ, या हंसाला बाण मारून मी घायाळ केले असल्याने, हा माझा आहे, तेव्हा त्याला माझ्या स्वाधीन कर!”
सिद्धार्थ म्हणाला, “देवदत्ता, एखाद्याच्या जिवावर उठलेल्या माणसापेक्षा, त्याच्या जीवाचं रक्षण करणाऱ्याचाच त्याच्यावर खरा अधिकार असतो. तू या हंसाच्या जिवावर उठला होतास, पण मी याला वाचवले, तेव्हा हा हंस आता माझाच आहे.”
अळेर देवदत्त हा सिद्धार्थच्या वडिलांकडे गेला व त्याने त्यांच्याकडे सिद्धार्थविरुद्ध तक्रार केली. महाराजांनी सिद्धार्थला बोलावून घेतले व त्याचे म्हणणंही ऐकून घेतले. त्यानंतर ते सिद्धार्थला म्हणाले, “बाळ ! एकूण धर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार करता, या हंसाचे रक्षण तू केलसं. म्हणून हा हंस तुझा आहे हे खरे असले, तरी क्षत्रिय धर्माचा विचार करता, एखादया क्षत्रियाने एखाद्या प्राण्याची शिकार केली की, तो प्राणी पूर्ण मेलेला असो वा अर्धवट मेलेला असो, तो त्या क्षत्रियाच्या मालकीचा होतो. या हंसाला देवदत्ताने घायाळ केले असल्याने हा त्याचाच ठरतो.” यावर तीक्ष्ण बुद्धीचा सिद्धार्थ वडिलांना म्हणाला, “महाराज ! क्षत्रिय धर्माच्या दृष्टीने विचार केला तरी? हा हंस माझ्याजवळ राहू देणेच इष्ट ठरते.
देवदत्ताने या हंसाला बाणाने अर्धवट मारला असला, ज्या अर्थी हा माझ्या पायाशी येऊन पडला, त्या अर्थी या शरणागताला अभय देऊन याचे रक्षण करणे हे क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्य नाही काय?” बाल सिद्धार्थच्या या असामान्य बुद्धितेजाने थक्क झालेले त्याचे वडील म्हणाले, “खरं सांगायचं, तर हा हंस नक्की कुणाचा, हे मला कळेनासे झाले आहे. तेव्हा आपण हे प्रकरण आपल्या राज्याच्या न्यायमूर्तींकडे नेऊ.” न्यायमूर्तीकडे हे प्रकरण जाताच त्यांनी त्या हंसाला एका सेवकाला दिले. तिथून परस्पर विरुद्ध दिशांना समान अंतरावर देवदत्त व सिद्धार्थ यांना बसायला सांगून, त्या दोघांनाही त्या हंसाला आपल्याकडे बोलवायला सांगितले. प्रथम देवदत्तने टाळी वाजवून “ये, ये” म्हणत हात हलवून त्या हंसाला आपल्याकडे बोलावले; पण त्या हंसाने त्याच्याकडे ढुंकूनही बघितले नाही,
त्यानंतर सिद्धार्थने त्या हंसाला एकदाच “ये” म्हणताच, तो जखमी हंस मोठ्या कष्टाने उडत उडत त्याच्याकडे गेला व त्याला बिलगून बसला! तो प्रकार पाहून न्यायमूर्ती म्हणाले, “हंस कुणाचा, या प्रश्नाचे उत्तर आता प्रत्यक्ष या हंसानेच दिले असल्याने, मी वेगळा निर्णय देण्याचा प्रश्नच उरत नाही.








