“बाहयरुपी” मराठी बोधकथा marathi bodhkatha
बाहयरुपी
एका गावात एक पुजारी रोज सकाळी पूजा करून घरी परतत असे. घरी परतत असताना त्याच्या वाटेत कोणी विधवा, क्षुद्र जातीचा असा आला तर त्या पुजाऱ्याला तो अपशकुन, अपवित्र वाटे. एक दिवस असेच तो पूजा करून येत असताना त्याच्या वाटेत एक विधवा स्त्री आली. तिला पाहताच त्याचा क्रोध अनावर झाला. त्याचे मंत्र पुटपुटणे थांबले, तो म्हणाला, “चांडाळीण कुठली? तुला माहिती नाही काय? मी रोज या वेळेत देवाची पूजा करून घरी जात असतो. कशाला माझ्या मार्गात आलीस? बाजूला हो! माझा मार्ग अपवित्र करू नकोस ?”
रोज घरी जाताना परमेश्वराची स्तुती, प्रार्थना करणाऱ्या त्या पुजाऱ्याच्या तोंडात शिव्या, शाप येऊ लागले. यावर ती स्त्री शांतपणे म्हणाली, “पुजारीजी, मला सांगा मी कुठे जाऊ? डावीकडे? की उजवीकडे? मागे की पुढे? कारण परमेश्वर तर चारही बाजूंना आहे. तो तर सर्वव्यापी आहे. मग माझी अपवित्रता घेऊन मी कोणत्या बाजूला जाऊ?” हे बोल ऐकून त्या पुजाऱ्याचा सर्व अहंकार गळून पडला. त्याला आपल्यापेक्षा त्या स्त्रीचे ज्ञानच मोठे वाटू लागले. इतके दिवस मंदिरात पूजाअर्चा करून आपल्याला जे सत्य कळले नाही. ते या स्त्रीला कळले. म्हणजेच बाह्यरूपाची पवित्रता पाहण्यापेक्षा अंतर्मन पाहणे खूप गरजेचे आहे.









