“जनसेवा हीच माझी ईश्वरसेवा” मराठी बोधकथा marathi bodhkatha
महात्मा गांधीजींना अनेक लोक भेटायला येत. गांधीजींच्या नुसत्या सहवासातूनच लोकांना कितीतरी गोष्टी सांगण्याची गांधीजींची पद्धत अतिशय प्रभावी होती. त्यामुळे त्यांच्या भेटीला येणारा प्रत्येक माणूस तेथून निघतांना प्रेरणा घेऊनच निघत असे.
एकदा एक गृहस्थ गांधीजींना भेटायला आले. नेहमी काही वेळ ते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असे. पण त्या दिवशी गांधीजी त्यांना म्हणाले, क्षमा करा, पण आता माझी मंदिरात जाण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही.
यावर ते गृहस्थ म्हणाले, हो का ? मलासुद्धा येथून मंदिरातच जायचे होते त्यामुळे आता आपण सोबतच मंदिरात जाऊ आणि पूजा करू. हे उद्गार ऐकून गांधीजी किंचित हसले आणि म्हणाले, परंतु मला तुम्ही जात असलेल्या मंदिरात जायचे नाही. माझे मंदिर वेगळे आहे. म्हणजे काय हे त्याला कळलेच नाही. तरीही त्या व्यक्तीने गांधीजींसोबत येण्याचा आग्रह केला. गांधीजी म्हणाले, ठीक आहे, तुमचा हट्ट आहे तर चला माझ्याबरोबर. असे म्हणून ते त्या गृहस्थाला आपल्यासोबत घेऊन गेले.
गांधीजी ज्या ठिकाणी गेले ते ठिकाण बघून त्या गृहस्थाला मोठा धक्का तर बसलाच ; पण मनापासून गांधीजींचे पाय धरावेसे वाटले. कारण गांधीजी एका वृद्धाश्रमात गेले होते आणि तेथील वृद्धांची ते सेवा करत होते. ते म्हणाले. हेच माझे मंदिर आहे आणि जनसेवा हीच माझी ईश्वरसेवा आहे. त्या गृहस्थांच्या मनात गांधीजीबद्दलचा आदर कित्येक पटींनी वाढला.
तात्पर्य :- जनसेवा हीच ईश्वरसेवा









