आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्यातील सर्व खाजगी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स (रुग्णालये/क्लिनिक्स) द्वारे सेवा आणि सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करण्याबाबत private hospital service paripatrak 

आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्यातील सर्व खाजगी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स (रुग्णालये/क्लिनिक्स) द्वारे सेवा आणि सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करण्याबाबत private hospital service paripatrak

वाचा:

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२६/प्र.क्र. २४७/रुशआ-२

१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसर, क्रॉफर्ड मार्केटजवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – ४००००१.

दिनांक: १६ ऑक्टोबर, २०२६

१) भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे पत्र क्र. D.O.No.2.2803/38/2026-MS, दिनांक १२.१०.२०२६.

२) महाराष्ट्र नर्सिंग होम नियमावली २०२१, अनुसूची (Schedule) III.

प्रस्तावना:-

केंद्र शासनाने दिनांक १२.१०.२०२६ च्या अर्धशासकीय पत्रान्वये, राज्यातील खाजगी आरोग्य संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा आणि सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करण्याबाबत सूचित केले आहे. राज्यातील वैद्यकीय संस्था/खाजगी रुग्णालये या सर्व आरोग्य सेवा संस्थामध्ये उपलब्ध असलेल्या विविध सेवा आणि उपचारात्मक सुविधांसाठी आकारण्यात येणारे दर ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. आरोग्य सेवांच्या तरतुदीमध्ये पारदर्शकता आणल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचाराच्या संभाव्य आर्थिक खर्चाची पूर्वकल्पना येते. यामुळे त्यांना योग्य व वेळेवर निर्णय घेण्यास, वैद्यकीय खर्चाचे नियोजन करण्यास आणि देयका संदर्भातील अनावश्यक गोंधळ व तक्रारी टाळण्यास मदत होते. याशिवाय आरोग्य सेवा प्रणालीवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो. राज्यात “महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा व नियमावली २०२१, अनुसूची ॥॥” अंमलात असून, या नियमांनुसार सर्व क्लिनिकल आणि हॉस्पिटल सेवांचे दर दर्शनी भागावर प्रदर्शित करणे कायदेशीररित्या बंधनकारक (Mandatory) आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी आणि वैद्यकीय संस्थांनी खालील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे.

शासन परिपत्रकः

केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी रुग्णालये व इतर वैद्यकीय आस्थापना यांनी खालील नमूद केलेल्या बाबींचे पालन करणे बंधनकारक राहील.

१. दर पत्रक प्रदर्शित करणेः मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ या कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी रुग्णालये व इतर सर्व वैद्यकीय आस्थापना यांच्याद्वारे पुरविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा नियमावली २०२१, अनुसूची ॥ मध्ये नमूद वैद्यकीय सेवांचे आणि उपलब्ध सुविधांचे दर रुग्णालयात सर्वांना दिसतील अशा पद्धतीने ठळकपणे प्रदर्शित करावेत.

२. भाषा आणि प्रदर्शनाचे स्थानः सदर दरांची यादी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असणे अनिवार्य आहे. हे दर पत्रक रुग्णालयाच्या आवारातील महत्त्वाच्या, स्पष्टपणे नजरेस पडणाऱ्या आणि सहज प्रवेशयोग्य (Conspicuous locations) ठिकाणी लावावे, जेणेकरून रुग्ण व त्यांचे नातेवाईक ती माहिती सहजपणे वाचू शकतील. रुग्णालयाने दरांमध्ये बदल केल्यास हे पत्रक तात्काळ अद्ययावत (Revised) करावे.

३. देयकामधील (bill) पारदर्शकताः रुग्णालयांनी देयकासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रुग्णांना लागू असणारे सेवा शुल्क व विविध पॅकेजेसच्या दरांबाबत पुरेशी माहिती द्यावी. नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दर पत्रकाच्या उपलब्धतेबाबत व शुल्काबाबत योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन करावे जेणे करून रुग्णांना/रुग्णांच्या नातेवाईकांना संदिग्धता राहणार नाही.

४. आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी पॅकेज दरः मेडिकल व्हिसा (Medical Visa) किंवा आयुष व्हिसावर (Ayush Visa) भारतात उपचारासाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी, अशा आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी लागू असलेले विशेष पॅकेज दर स्पष्टपणे प्रदर्शित करावेत, जेणेकरून जागतिक स्तरावर पारदर्शकता राखली जाईल.

५. अंमलबजावणी व पुनरावलोकन (Compliance Review): रुग्णालयांची नोंदणी, नियमन आणि देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या सर्व सक्षम प्राधिकरणांनी, दरांच्या प्रदर्शनाबाबत “महाराष्ट्र नर्सिंग होम नियम, २०२१ अनुसूची III” च्या अनुपालनाचा वेळोवेळी आढावा घ्यावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.

२. सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सदर परिपत्रक त्यांच्या अखत्यारीतील सर्व खाजगी रुग्णालयांच्या व इतर सर्व वैद्यकीय आस्थापनांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.

3. उपरोक्त प्रमाणे सुचनांची काटेकोर अमलबजावणी करण्यात यावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६१०१६१०५६२५३३१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment