समग्र शिक्षा व पीएमश्री २०२५-२६ अंतर्गत निधी खर्चाबाबत samagra shiksha pmshri nidhi
महोदय,
सन २०२५-२६ मध्ये समग्र शिक्षा व पीएमश्री योजनेंतर्गत भारत सरकारने मंजूर केलेला निधी उपक्रमनिहाय आपल्या जिल्ह्यास / महानगरपालिकेस वितरीत करण्यात आला आहे.
समग्र शिक्षा योजनेंतर्गत भारत सरकारकडून उपक्रमाकरीता ३ हप्ते प्राप्त झालेले आहेत. मात्र ४ था हप्ता प्राप्त होण्यासाठी वितरीत करण्यात आलेला निधीच्या मर्यादेत किमान ७५% खर्च होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत निधी खर्च झालेला नाही. तसेच, पीएमश्री योजनेंतर्गत भारत सरकारकडून उपक्रमाकरीता १ हप्ता प्राप्त झाला असून २ रा हप्ता प्राप्त होण्यासाठी वितरीत करण्यात आलेला निधीच्या मर्यादेत किमान ७५% खर्च होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत निधी खर्च झालेला नाही.
त्याअनुषंगाने उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या मर्यादेत जिल्हा व महानगरपालिका स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित असल्याचे निदर्शनास आल्याने या कार्यालयाच्या स्तरावरुन. दि.२३/०२/२०२६, दि.२६/०२/२०२६, दि.०४/०३/२०२६, दि.०६/०३/२०२६, दि.०९/०३/२०२६, दि.१२/०३/२०२६ व दि. २१/०३/२०२६ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला. दि. २१/०३/२०२६ रोजी आयोजित बैठक मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग व मा. राज्य प्रकल्प संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत घेण्यात आलेल्या खर्चाच्या आढाव्यानुसार बहुतांश जिल्हा /
महानगरपालिकास्तरावर समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत निधी शिल्लक असल्याचे दिसून आले.
यावरून समग्र शिक्षा व पीएमश्री योजनेच्या अंमलबजावणीत अनास्था दिसून येत आहे, ही निश्चितच खेदाची बाब आहे. समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मंजूर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास प्रत्यक्ष लाभार्थीना या योजनेच्या माध्यमातून दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होईल.
या कार्यालयाचे स्तरावरून वितरीत करण्यात आलेला निधी दि. २३/०३/२०२६ रोजी दुपारी १२.०० पर्यंत खर्च न झाल्यास सदरचा अखर्चित निधी या कार्यालयाचे स्तरावर राज्य स्तरावरील उपक्रमांकरिता उपलब्ध करून घेण्यात येईल. निधी अभावी लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील.









