“महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१” बाबतच्या सूचना sevajeshthata niyamavali 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१” बाबतच्या सूचना sevajeshthata niyamavali

परिपत्रक

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, यापूर्वी संदर्भ क्र.१ अन्वये दि.२१ जून १९८२ रोजी अधिसूचित केलेली “महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, १९८२ व त्या संदर्भात शासनाने निर्गमित केलेले सर्व आदेश किंवा अभिलेख अधिक्रमित करुन संदर्भ क्र.४ येथील दिनांक २१ जून २०२१ च्या अधिसूचनेद्वारे “महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१” हे नवीन नियम प्रसिध्द करण्यात आले आहेत. सदर दिनांक २१ जून २०२१ ची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावरील “कायदे व नियम” या स्थळाखाली उपलब्ध करण्यात आली आहे.

शासन परिपत्रक pdf download 

०२. सदर महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ ही दिनांक २१ जून २०२१ पासून अंमलात आली असून, महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्यांना हे नियम लागू झाले आहेत. सबब, यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्देश/ सूचना देण्यात येत आहेत.

(१) संदर्भ क्र.१ ते ३ येथील शासन अधिसूचना व शासन निर्णय व तद्संदर्भातील सर्व परिपत्रके अधिक्रमित झालेली आहेत.

(२) यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता निश्चित करताना, तसेच, मानीव दिनांक देताना महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदी विचारात घेण्याची दक्षता सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी घ्यावी.

(३) ” महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१” मधील नियम ५ नुसार प्रत्येक सक्षम प्राधिकाऱ्याने, यापुढे त्याच्या नियंत्रणाखालील प्रत्येक संवर्गाची, प्रतिवर्षी दिनांक १ जानेवारी रोजीची, त्या संवर्गात मागील वर्षी प्रत्यक्षात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अंतिम ज्येष्ठतायादी,

नियमावली सोबत जोडलेल्या परिशिष्ट ३ येथील विहित नमुन्यात प्रसिध्द करावी. अंतिम ज्येष्ठतायादी तयार करण्यासाठी सुलभ संदर्भासाठी नियमावली सोबतच्या परिशिष्ट-चार मधील उदाहरणाचे अवलोकन करावे. तसेच, अंतिम ज्येष्ठता यादी शासकीय संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात यावी. नियमावली सोबत जोडलेल्या परिशिष्ट ३ येथील विहित नमुन्यातील ज्येष्ठतायादी शिवाय अन्य कोणतीही ज्येष्ठतायादी अथवा कार्यरत कर्मचाऱ्यांची यादी (List of working employees) विचारात घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

(४) एखादया शासकीय कर्मचाऱ्यास मानीव दिनाक मजूर केल्यास, त्यानुसार अंतिम ज्येष्ठतायादीकरीता शुध्दीपत्रक तात्काळ प्रसिध्द करण्यात यावे.

(५) प्रत्येक संवर्गाची, प्रतिवर्षी दिनांक १ जानेवारी रोजीची ज्येष्ठतायादी प्रसिध्द करणे अनिवार्य राहील. ज्येष्ठतायादी संदर्भात अथवा पदोन्नतीसंदर्भात वा अन्य बाबींसंदर्भात न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्यास, न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून प्रत्येक वर्षाची ज्येष्ठतायादी प्रसिध्द करावी व न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून ज्येष्ठतायादी प्रसिध्द करीत असल्याचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये करावा. ज्येष्ठतासूचीस अथवा ज्येष्ठतासूचीच्या आधारे पदोन्नती देण्यास मा. न्यायालयाची स्थगिती असल्यास, संकीर्ण अर्ज याचिका दाखल करुन, न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यास मा. न्यायालयाची परवानगी घ्यावी व ही कार्यवाही ठराविक मुदत्तीत पूर्ण करुन, मा. न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन ज्येष्ठतायादी प्रसिध्द करावी.

(६) तात्पुरती ज्येष्ठतासूची/अंतिम ज्येष्ठतासूची विभाग/कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन, ज्येष्ठतासूची वेबसाईटवर उपलब्ध केल्याचे सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात यावे. याकरिता S.M.S., E-mail, HRMS इ. अत्याधुनिक ई माध्यमांचा/प्रणालींचा वापर करावा.

०३. महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ व प्रस्तुत शासन परिपत्रक सर्व मंत्रालयीन विभागानी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

०४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२१०७०९१५४६१०८२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment