राज्यातील शाळांमध्ये “चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत special clean mohim in school circular
संदर्भ : शासन परिपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२७६ (ई-१८८७००७)/एसडी-१, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२६.
उपरोक्त विषय व संदर्भीय शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये दिवाळीच्या कालावधीचा सकारात्मक उपयोग करून शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व स्थानिक समुदाय यांच्या सहभागातून “चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम” राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.
सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित शाळांना शासन परिपत्रकातील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत तात्काळ निर्देश देण्यात यावेत. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. पूर्वतयारी व नियोजन दि. १८ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शाळा व्यवस्थापन समितीची विशेष बैठक आयोजित करून शाळानिहाय कृती आराखडा तयार करावा. शाळेतील वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व क्रीडांगण यांची पाहणी करावी.
२. प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम दि. २५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शाळा व शाळा परिसराची सखोल स्वच्छता, स्वच्छतागृहांची साफसफाई, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच आवश्यक किरकोळ दुरुस्ती व देखभाल यांना प्राधान्य द्यावे.
३. अनावश्यक साहित्याची विल्हेवाट शाळांमधील निरुपयोगी व अनावश्यक साहित्याचे वर्गीकरण करून शासनाच्या दि. १७सप्टेंबर २०२६ रोजीच्या संबंधित परिपत्रकातील निर्देशांनुसार विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पुढील कार्यवाही करावी.
४. निधीचा विनियोग: सदर मोहिमेअंतर्गत अनुज्ञेय खर्च शाळेच्या एकत्रित अनुदानातून (Composite School Grant) प्रचलित नियम व अनुज्ञेय बाबींनुसार करता येईल. या मोहिमेसाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी उपलब्ध होणार नसल्याने विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची सक्तीची आर्थिक वर्गणी किंवा निधी गोळा करण्यात येऊ नये.
५. लोकसहभाग : शाळा व्यवस्थापन समिती, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी व उपलब्ध स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून “माझी शाळा-माझी जबाबदारी” या भावनेने मोहीम राबविण्यास प्रोत्साहन द्यावे.
६. संनियंत्रण व आढावा केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील मोहिमेचे नियोजन, संनियंत्रण व नियमित आढावा घ्यावा. मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
७. छायाचित्रे व अहवाल प्रत्येक शाळेने मोहीम सुरू करण्यापूर्वी व मोहीम पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे जतन करावीत. मोहिमेच्या अंमलबजावणीचा शाळानिहाय आढावा शिक्षणाधिकारी यांनी घ्यावा जिल्हयाचा एकत्रित अहवाल विभागीय
उपसंचालक कार्यालयास सादर करावा आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी जिल्हानिहाय एकत्रीत अहवाल या कार्यालयास व शासनास सादर करावा करावा.
सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सदर मोहिमेस सर्वोच्च प्राधान्य देऊन शासन परिपत्रकातील सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, याची खात्री करावी. मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक मार्गदर्शन करून नियमित संनियंत्रण करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल निर्धारित वेळेत या कार्यालयास व शासनास सादर करावा. सदर परिपत्रकाची आपल्या अधिनस्त सर्व संबंधित कार्यालये व शाळांच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी.










