राज्यातील शाळांमध्ये “विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत vishesh shaley swachhata mohim paripatrak 

राज्यातील शाळांमध्ये “विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत vishesh shaley swachhata mohim paripatrak 

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र. क्र. २७६ (ई-१८८७००७)/ एसडी-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १६ ऑक्टोंबर, २०२६.

वाचा :-

१. शालेय शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२६/ प्र. क्र. २६६ (ई-१८३९७९९)/एसडी-१, दि.१७.०९.२०२६.

२. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP २०२०).

३. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९, दि. २७.०८.२००९.

शासन परिपत्रक :-

शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्वच्छता, संस्कार, श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी व शिस्त यांचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. याकरिता शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, आनंददायी व अध्ययन-अध्यापनास पोषक असणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

२. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा व अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास महत्त्व देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या कालावधीचा सकारात्मक उपयोग करून शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व स्थानिक समुदाय यांच्या सहभागातून शाळांची स्वच्छता, सुशोभीकरण, देखभाल व शैक्षणिक वातावरण वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये “चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम” राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात यावी. सदरची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :-

१. मोहिमेची उद्दिष्टे-:

१. शाळांमध्ये गुणवत्ता, संस्कार व स्वच्छता यांचा समन्वय साधणे.

२. शाळा व शाळा परिसराची संपूर्ण स्वच्छता / सफाई (Deep Cleaning) करून स्वच्छ, सुंदर व सुरक्षित वातावरण निर्माण करणे.

३. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण करणे.

४. शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघ व स्थानिक समुदायाचा शाळेच्या विकासामध्ये सहभाग वाढविणे व याद्वारे शाळा व समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे.

५. शाळेचे वातावरण आनंददायी, सर्जनशील व अध्ययन-अध्यापनास पोषक बनविणे.

२. मोहिमेची कालमर्यादा-:

मोहिमेची अंमलबजावणी खालील दोन टप्प्यांमध्ये करण्यात यावी.

(अ) टप्पा १ :- दि. १८ ते २४ ऑक्टोबर २०२६

नियोजन व पूर्वतयारी – या कालावधीत प्रत्येक शाळेने पुढील कार्यवाही करावी-:

(१) शाळा व्यवस्थापन समितीची विशेष बैठक आयोजित करणे.

(२) शिक्षक, पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी संघ यांच्या सहभागाचे नियोजन करणे.

(३) वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडांगण इत्यादींची पाहणी करणे.

(४) शाळेतील आवश्यक स्वच्छता, दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या कामांची यादी तयार करणे.

(५) अनावश्यक व निरुपयोगी साहित्य / भंगार यांचे वर्गीकरण करणे.

(६) आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे निश्चित करणे.

(७) शाळानिहाय कृती आराखडा (Action Plan) तयार करणे.

(ब) टप्पा २ : दि. २५ ते ३१ ऑक्टोबर २०२६

प्रत्यक्ष कार्यवाही :- या कालावधीत पुढील कामांना प्राधान्य देण्यात यावे :-

(i) शाळेची संपूर्ण स्वच्छता / सखोल साफसफाई (Deep Cleaning):- वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय व संगणक कक्षांची सखोल साफसफाई व स्वच्छता.

(१) फरशी, भिंती, दरवाजे, खिडक्या, छत, पंखे व इतर परिसराची स्वच्छता.

(२) शाळेतील स्वच्छतागृहे व हात धुण्याच्या ठिकाणांची विशेष स्वच्छता.

(३) पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व पाणीपुरवठा व्यवस्थेची स्वच्छता.

(४) शाळेचा परिसर, क्रीडांगण, प्रवेशद्वार व परिसरातील कचरा/अनावश्यक वस्तू हटविणे.

(५) आवश्यकतेनुसार डास, कीटक व इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण करणाऱ्या बाबी दूर करण्यासाठी उपाययोजना करणे.

(६) कचरा वर्गीकरणासाठी योग्य व्यवस्था

(ii) किरकोळ दुरुस्ती व देखभाल : शाळेतील विद्युत, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, फर्निचर, दरवाजे-खिडक्या इत्यादींची पाहणी करून आवश्यक किरकोळ दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी.

(१) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक विद्युत जोडणी, तुटलेले फर्निचर, असुरक्षित भाग इत्यादी बाबी तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात.

(iii) अनावश्यक साहित्य व भंगार :-

शाळांमधील अनुपयुक्त / निरूपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दि.१७.०९.२०२६ रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, शाळेतील निरुपयोगी / अनावश्यक साहित्याचे वर्गीकरण करून विहित कार्यपद्धतीनुसार विल्हेवाट लावावी.

३. निधीची उपलब्धता :-

(१) राज्यातील शाळांमध्ये “विशेष शालेय स्वच्छता मोहीम” अंतर्गत करण्यात येणाऱ्या सखोल साफसफाई व स्वच्छता (Deep Cleaning), किरकोळ देखभाल व दुरुस्ती तसेच इतर अनुज्ञेय बाबींवरील खर्च शाळांना केंद्र

पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळेच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दिले जाणारे एकत्रित अनुदानातून (Composite School Grant) भागविता येईल.

(२) या मोहिमेसाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही.

(३) समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळेच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दिले जाणारे एकत्रित अनुदानातून (Composite School Grant) खर्च करताना संबंधित बाब त्या अनुदानाच्या प्रचलित अनुज्ञेय बाबींमध्ये समाविष्ट आहे, याची संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने खात्री करावी.

(४) विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची अनिवार्य आर्थिक वर्गणी अथवा निधी गोळा करण्यात येऊ नये.

४. लोकसहभाग :-

सदर मोहिमेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, उपलब्ध असल्यास CSR/स्थानिक सामाजिक संस्था या घटकांचा “माझी शाळा-माझी जबाबदारी” या भावनेतून सक्रिय लोकसहभाग सुनिश्चित करावा.

५. संनियंत्रण व जबाबदारी :-

(१) या मोहिमेच्या शाळास्तरीय अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.

(२) केंद्रप्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना मार्गदर्शन करून मोहीम अंमलबजावणीचा आढावा घ्यावा.

(३) गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील मोहिमेचे नियोजन, समन्वय व संनियंत्रण करावे.

(४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांनी जिल्हास्तरावर मोहिमेचा नियमित आढावा घेऊन उत्कृष्ट

कामगिरी करणाऱ्या शाळांची नोंद ठेवावी.

(५) विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी विभागातील मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन करावे.

(६) प्रत्येक शाळेने मोहीम सुरू करण्यापूर्वी व मोहीम पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे जतन करावीत. (उदा. वर्गखोली / शाळा परिसर / स्वच्छतागृह / पिण्याच्या पाण्याची व्यवस्था / क्रीडांगण / शाळेचा प्रवेश परिसर /सुशोभीकरण केलेल्या जागा).

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०२६१०१६१४४९३२१६४९ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment