शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण २०२६-२७ बाबत balkanche sarvekshan paripatrak
संदर्भ- प्रस्तुत संचालनालयाचे पत्र क्रमांक १९८९५४०, दिनांक. २९ जून, २०२६
महोदय,
शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक २३ जून, २०२२ अन्वये राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात येते. सदर सर्वेक्षणामध्ये आढळून येणाऱ्या शाळाबाह्य तसेच अनियमित बालकांना त्यांच्या नजिकच्या शाळेत दाखल करणे व त्यांचे शिक्षण अखंडित राहण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येते. तथापि, असे असूनही प्रत्येक जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांचे प्रमाण अद्यापही लक्षणीय असल्याचे दिसून येते.
कौटुंबिक अडचणी, पालकांची कमकुवत आर्थिक परिस्थिती, शिक्षणाबाबत पालकांची अनास्था इ. कारणांमुळे बालके शाळेत दाखल होत नाहीत अथवा शाळेत अनियमित असतात. शहरे तसेच मोठ्या गावांतील रस्ते, रल्वेस्थानके, राज्य परिवहन मंडळाची बसस्थानके इ. ठिकाणी शाळाबाह्य बालके आढळून येत असतात. याची दखल घेऊन पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडून जून व जुलै २०२६ मध्ये पुणे शहरामध्ये रस्त्यांवर आढळून येणाऱ्या बालकांचे ( Street Children) सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. सदर सर्वेक्षणामध्ये केवळ पुणे शहरामध्ये ८३१ शाळाबाह्य बालके असल्याचे आढळून आले आहे. सदर ८३१ शाळाबाह्य बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्याबाबत कार्यवाहीचे नियोजन पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडून करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे यांनी राबविलेल्या शाळाबाह्य बालकांच्या शोधमोहिमेच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यवाही होणे गरजेचे आहे. तरी, आपल्या जिल्ह्यातील इतर यंत्रणांसोबत पोलीस प्रशासनाचेही सहकार्य घेऊन सर्वेक्षणाचे काम यशस्वीपणे पूर्ण करावे व एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यादृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी विनंती आहे.











