जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत मार्गदर्शक सूचना caste validity online process circular
महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: सीबीसी- २०२६/प्र.क्र.१०६/मावक मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – ४०००३२. दिनांक:- २५ नोव्हेंबर, २०२६
शासन परिपत्रक
वाचा :
१. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३).
२. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२, दिनांक ०१ सप्टेंबर २०१२.
३. शासन निर्णय क्रमांक सीबीसी-२०२०/प्र.क्र.१९/मावक, दिनांक ३० एप्रिल २०२५.
प्रस्तावना :
राज्यातील पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरी, निवडणूक व इतर शासकीय प्रयोजनांसाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. सद्यस्थितीत दि.०१.०८.२०२० पासून जात पडताळणी समित्यांचे कामकाज अंशतः ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. तथापि, सदर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्जदारांना येणाऱ्या अडचणी कमी करणे, अर्ज प्रक्रियेतील अनावश्यक पुनरावृत्ती टाळणे, अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती सहज उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थांचा व नागरिकांचा वेळ व श्रम वाचविणे, या उद्देशाने जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिकाधिक ऑनलाइन व नागरिकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.
राज्य शासनामार्फत अर्जदार विद्यार्थांना व राज्यातील इतर नागरिकांना सुलभ, गतिमान, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कामकाजात आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. डिजिटल महाराष्ट्र व गतिमान सेवा या संकल्पनेच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नागरिकाभिमुख प्रशासन, प्रक्रियेचे सुलभीकरण, वेळेची बचत आणि सेवा वितरणातील पारदर्शकता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेतया अनुषंगाने जात प्रमा णपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यक्षम व आधुनिक करण्यासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे.
या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि मे. टाटा कन्सल्टन्सी
सर्व्हिसेस (ICS) यांच्या तांत्रिक सहकार्याने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (Caste Certificate Validity Information System CCVIS) ही आधुनिक व प्रगत डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणालीद्वारे अर्ज व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे, अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन तपासणे, अर्जदारांच्या माहितीची पुनरावृत्ती कमी करणे शक्य होणार आहे. तसेच, याअनुषंगाने आवश्यक सुनावणीची प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चॅटबॉटद्वारे अर्जदारांना मार्गदर्शन व त्यांच्या प्रश्नांचे निराकरण व निर्गमित जात वैधता प्रमाणपत्र ई-मेल तसेच व्हॉट्सअॅपद्वारे उपलब्ध करून देण्यासारख्या सुविधांचा या प्रणालीमध्ये समावेश करण्यात येत आहे. या सुविधांमुळे अर्जदारांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन सुलभतेने उपलब्ध होऊन कार्यालयीन प्रक्रियेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
उपरोक्त सर्व बाबींचा विचार करून सदर प्रणालीच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन करण्याच्या अनुषंगाने अधिक सुलभता यावी, याकरिता नव्याने विकसित करण्यात आलेल्या प्रणालीच्या वापराबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येत आहेत.
(अ) अर्ज करण्याची पद्धत :
१) जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी करावयाचा अर्ज फक्त ऑनलाइन प्रणालीमधूनच दाखल करता येईल. अन्य मार्गाने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही अथवा ग्राह्य धरला जाणार नाही.
२) अर्जासोबत सादर करावयाची सर्व कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे व शपथपत्रे हीदेखील ऑनलाइन प्रणालीमध्ये सादर केली जातील. अर्जदारांनी संबंधित कागदपत्रे व शपथपत्रांच्या मूळ प्रती (Original)/प्रमाणित प्रती (Certified) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक राहील.
३) नियम १६ नुसार विहित केलेल्या पुराव्यांपैकी जात नोंदीबाबतचा व मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक राहील. सदर दस्तऐवजी पुरावा सादर न करू शकल्यास स्वयंघोषणापत्र सादर करेल. आवश्यकतेनुसार संबंधित समितीस अधिक पुराव्यांची मागणी करता येईल.
४) प्रस्तुत प्रणाली ही संपुर्ण ऑनलाईन असल्याने अर्ज कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुन्हा त्याची प्रिंटआउट काढून समितीच्या कार्यालयात दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही.
५) जात पडताळणीसाठी करावयाचा अर्ज अर्जदाराच्या आधार क्रमांकाशी निगडित (Aadhaar based) असल्याने एकच अर्ज दाखल करता येईल. त्यामुळे अर्जदारांनी ऑनलाइन तपशील भरताना व कागदपत्रे अपलोड करताना पुरेशी दक्षता घ्यावी.
(आ) समिती स्तरावरील कार्यवाही :
१) समितीकडे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर समितीच्या कार्यालयातील लिपिक सदर अर्जाची तांत्रिक तपासणी करेल. तांत्रिक तपासणीमध्ये अर्जातील सर्व तपशील नमूद आहेत काय, सर्व
कागदपत्रे व दस्तऐवज उघडतात काय, कागदपत्रांच्या मूळ प्रती स्कॅन करून अपलोड केल्या आहेत काय आणि सदर प्रती वाचनीय आहेत काय, याची तपासणी करेल.
तांत्रिक तपासणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या नमूद करून आणि त्रुटी नसल्यास तसे नमूद करून लिपिक सदर अर्ज समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी यांच्याकडे अग्रेषित करील.
२) सदस्य सचिवांकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते अर्जाची तपासणी करतील. जर लिपिकाने नमूद केलेली त्रुटी योग्य असेल, तर त्याबाबत सहमती दर्शवून अर्जदाराला त्रुटी पूर्ततेसाठी अर्ज परत करतील.
३) लिपिकाने नमूद केलेली त्रुटी योग्य नसेल किंवा दुर्लक्ष करण्याजोगी असेल किंवा अर्ज परिपूर्ण असल्यास, सदस्य सचिव अशा अर्जाची व त्यासोबतच्या पुराव्यांची गुणवत्तेवर पडताळणी करतील.
४) अर्जदाराचा अर्ज व पुराव्यांवरून अर्जदाराचा जातीचा दावा व वास्तव्यासंबंधी बाब सिद्ध होत असल्यास, सदस्य सचिव त्याचा निर्णय “वैध” नमूद करून अर्ज समितीचे अध्यक्ष व सदस्य तथा उपायुक्त यांच्याकडे अग्रेषित करतील.
५) अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांवरून अर्जदाराचा मानीव दिनांकाचा रहिवास किंवा जातीचा दावा सिद्ध होत नाही, असे सदस्य सचिवांचे मत असल्यास, तसे अभिप्राय नोंदवून व आवश्यक अतिरिक्त पुराव्यांबाबतचे अभिप्राय नोंदवून अर्ज समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्याकडे अग्रेषित करतील.
६) अध्यक्ष व सदस्य यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते सदर अर्जाची व पुराव्यांची गुणवत्तेवर पडताळणी करतील आणि त्यांचा निर्णय नमूद करतील.
७) समितीचे अध्यक्ष व उर्वरित दोन सदस्य यांनी अर्ज व पुराव्यांची गुणवत्तेवर पडताळणी केल्यानंतर खालीलप्रमाणे कार्यवाही करतील.
1) वैध : अर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्यांवरून जातीचा दावा व रहिवास सिद्ध झाल्यास समिती सदर जातीचा दावा “वैध” ठरवेल. सर्व सदस्यांनी त्यांचा निर्णय नोंदविल्यानंतर प्रणालीमध्ये वैधता प्रमाणपत्र तयार होईल व ते समितीचे उपायुक्त डिजिटल स्वाक्षरीने वैधता प्रमाणपत्र निर्गमित करतील.
॥) पुराव्यांची पडताळणी अर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्यांची संबंधित आस्थापनाकडून पडताळणी करण्याची आवश्यकता आहे, असा निर्णय समिती सदस्यांनी नोंदविल्यानंतर सदर अर्ज सदस्य सचिवांकडे जाईल व ते संबंधित आस्थापनांशी पत्रव्यवहार करतील.
III) दक्षता पथकाकडून पडताळणी: अर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्यांची व जातीच्या दाव्याची दक्षता पथकाकडून पडताळणी करण्याची आवश्यकता आहे, असा समितीचा निर्णय झाल्यास सदस्य सचिव चौकशीचे मुद्दे नमूद करून प्रकरण दक्षता पथकाकडे वर्ग करतील.
IV) नमुना २५ मधील नोटीसः- दक्षता पथकाच्या अहवलानुसार अर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्यांबाबत साशंकता असल्यास समिती अर्जदारास नमुना २५ मधील कारणे दाखवा नोटीस देऊन त्याबाबत म्हणणे मांडण्याची संधी देईल.
V) अतिरिक्त पुराव्यांची मागणी/पुराव्यांमधील त्रुटी: अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये त्रुटी
आहेत किंवा अतिरिक्त पुराव्यांची आवश्यकता आहे, असा समितीचा निर्णय झाल्यास सर्व सदस्य आवश्यक पुराव्यांचा तपशील नमूद करून सदर प्रकरण अर्जदाराकडे परत करू शकतील.
VI) सुनावणीची आवश्यकता: अर्जदाराच्या प्रकरणात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अर्जदाराला
सुनावणी देणे आवश्यक आहे, असा समितीचा निर्णय झाल्यास अशी सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. विशिष्ट व अपवादात्मक प्रकरणांमध्ये परिस्थितीनुसार बार्टी महासंचालकाची खात्री झाल्यास प्रत्यक्ष सुनावणीसाठी परवानगी असेल.
VII) अवैध : दक्षता पथकाचा चौकशी अहवाल व नमुना २५ मधील नोटीस अर्जदाराला दिल्यानंतर अर्जदाराचा खुलासा समाधानकारक नसल्यास किंवा अर्जदाराला जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी वाजवी संधी देऊनही सादर केलेल्या पुराव्यांवरून जातीचा दावा निर्विवादपणे सिद्ध होत नसल्यास समिती सदर प्रकरणात सकारण आदेश (Speaking Order) पारित करून आदेश अपलोड करील व जातीचा दावा अवैध ठरवील.
तथापि, अर्जदाराला वाजवी संधी व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची संधी दिल्याशिवाय समितीला जातीचा दावा अवैध ठरविता येणार नाही.
VIII) रक्ताचे नाते संबंधातील व्यक्तींचे जात वैधता प्रमाणपत्र प्रसिध्द करणे:- अर्जदाराने त्याच्या अर्जासोबत जातीचा पुराव म्हणुन रक्ताच्या नातेसंबंधातील व्यक्तीचे वैधता प्रमाणपत्र सादर केले असल्यास समितीला सदर वैधता प्रमाणत्र प्रणालीमध्ये ऑनलाईन प्रसिध्द करता येईल.
(इ) अर्ज निकाली काढण्याचा कालावधी (Timeline):
१) पडताळणी समिती जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतचा आपला निर्णय शक्यतो ६० दिवसांच्या आत घेईल. समितीचा निर्णय SMS/WhatsApp/ ई-मेलद्वारे अर्जदाराला पाठविला जाईल. त्यानंतरही अर्जदाराने त्रुटींची पूर्तता न केल्यास समिती स्तरावर अर्जदारास पुढील दोन महिने ऑनलाइन प्रणालीमधून SMS/WhatsApp/ ई-मेलद्वारे त्रुटी पूर्ततेबाबत कळविण्यात येईल.
२) अर्जदारास पाचव्या महिन्यात त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची संधी देण्यात येईल. तद्नंतर अर्जदाराने समितीस प्रतिसाद न दिल्यास अथवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास सदर प्रकरण निकाली काढण्यात येईल.
(ई) अर्ज पुनरज्जीवित (Reopen) करण्याची तरतूद :
समितीने वैध/अवैध ठरविलेल्या प्रकरणात अपिलीय प्राधिकरणाच्या किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित अर्ज संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांना महासंचालकांच्या पूर्वमान्यतेने पुनर्जीवित करता येतील.
(उ) शुल्कामध्ये सुधारणा :
ऑनलाइन प्रणालीच्या अनुषंगाने सेवा शुल्कामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
शैक्षणिक प्रयोजन: ₹१००/-
निवडणूक प्रयोजनः
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत/पंचायत समिती/जिल्हा परिषद) ₹५००/-
शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषद/नगरपंचायत) ११,०००/-
सेवाविषयक प्रयोजन: ₹१,०००/-
इतर प्रयोजनः शासकीय योजनांचा लाभ किंवा सवलती घेण्यासाठी वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यास ₹१,०००/-
सदरची नव्याने विकसित करण्यात आलेली कार्यप्रणाली https://www.cvc.barti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२६११२५१२४३२३७३२२ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










