दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत, दि.२७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर,२०२५ dakshata janjagruti saptah 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत, दि.२७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर,२०२५ dakshata janjagruti saptah 

पहा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः संकीर्ण-२००१/११२८/प्र.क्र.४३/०१/११-अ,

दिनांक : २२ ऑक्टोबर, २००१

परिपत्रक

राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awareness Week) आयोजित करण्याचा निर्णय संदर्भाधीन दि.२२ ऑक्टोबर, २००१ च्या शासन आदेशान्वये घेण्यात आला आहे. यावर्षी दि.२७ ऑक्टोबर, २०२५ ते २ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केले आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी “दक्षता-आपली सामायिक जबाबदारी” (Vigilance: Our Shared Responsibility) ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

२. त्यानुसार राज्यातदेखील यावर्षी दि.२७ ऑक्टोबर, २०२५ ते २ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करावयाचे आहे. या संदर्भात पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत-

अ) राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत वरील कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे.

ब) दि.२७ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी / कर्मचारी प्रतिज्ञा करतील. (प्रतिज्ञेचा नमुना सोबत जोडला आहे.)

क) प्रतिज्ञा केल्यानंतर मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल. (संदेशांच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.)

ड) या सप्ताहाच्या निमित्ताने मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांचे संदेश राज्यातील जनतेसाठी प्रसृत करण्यात यावेत.

३. या सप्ताहाच्या निमित्ताने पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे –

अ) कार्यालयांच्या दर्शनी भागात व सार्वजनिक ठिकाणी (जसे, रेल्वेस्थानक, बसथांबे, विमानतळे, इत्यादि) भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक भित्तिपत्रके / कापडी फलक/साईन बोर्ड लावण्यात यावेत. व्हॉट्सअॅप, इत्यादि इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमांचा, ई-मेल्स, एस.एम.एस. यांचाही जनजागृतीसाठी वापर करावा.

ब) मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांतील मोक्याच्या ठिकाणी व्हेरीएबल मेसेज सिस्टिम बोर्डाद्वारे भ्रष्टाचार निर्मुलन जनजागृतीविषयक संदेश प्रसारीत करण्यात यावेत.

क) भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी कार्यालये/शाळा/महाविद्यालयांच्या स्तरावर वादविवाद स्पर्धा/व्याख्याने / निबंधस्पर्धा/ कार्यशाळा/ चर्चासत्र /मुलाखती यांचे आयोजन करावे.

ड) भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विशेष पुस्तिकांचे प्रकाशन व वाटप करावे.

इ) राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरीक यांना दक्षता जनजागृती मोहिमेत मोठया प्रमाणावर/उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याकरीता आवाहन करावे. त्याकरीता पथनाट्ये/नाटिका, काव्यवाचन, इ. नाविन्यपूर्ण व आकर्षक योजना / कार्यक्रमांची आखणी करावी.

फ) राज्य शासनाचे सर्व विभाग, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयांत भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विविध स्पर्धा / व्याख्याने/निबंधस्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करावे.

४. या सप्ताहाच्या आयोजनासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करुन दिला जाणार नसल्याने प्रत्येक कार्यालयाने त्यांच्याकडील उपलब्ध निधीतूनच खर्च करावयाचा आहे.

५. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनासंबंधीची जबाबदारी महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी सदर सप्ताहाचे आयोजन करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.

६ सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी या सूचना त्यांच्या आधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणाव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५१०१४११०८३०८९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रतिज्ञा

आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे असे मला वाटते. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते.

प्रत्येक नागरिकाने दक्ष राहायला पाहिजे आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकांप्रती वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे याची मला जाणीव आहे.

म्हणून मी प्रतिज्ञा घेतो की :

➡️जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन.

➡️लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही.

➡️सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पद्धतीने करेन.

➡️जनहितासाठी कार्य करेन.

➡️व्यक्तिगत वागणूकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन.

➡️भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन.

शासन निर्णय Pdf download

Related posts:

Leave a Comment