चारित्र्य व पूर्वइतिहास पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणेबाबत character validation improvement
प्रस्तावना :
राज्यातील नागरिकांना खाजगी नोकरी, परदेशी जाण्याकरिता (Visa/Immigration), खासगी सुरक्षा रक्षक सेवा इत्यादी विविध कारणांसाठी चारित्र्य व पूर्वइतिहास पडताळणी प्रमाणपत्र (Police Clearance Certificate) आवश्यक असते. सद्यस्थितीत सदर सेवा विविध पातळ्यांवर दिली जात असली तरी त्यामध्ये एकसमानता, वेळबद्धता व पारदर्शकता सुनिश्चित करण्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आलेली आहे. चारित्र्य व पूर्वइतिहास पडताळणी प्रक्रियेतील आलेले पूर्व अनुभव तसेच वरील संदर्भाधीन सर्व शासन निर्णयांचा एकत्रित (संहितीकृत) आढावा घेऊन खाजगी उद्योग, परदेश गमन तसेच निम-शासकीय संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम इत्यादींमध्ये कार्यरत किंवा नियुक्त होऊ घातलेल्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य व पूर्वइतिहास (Character & Antecedents) पडताळणी प्रक्रिया अधिक सुकर व सोपी होण्याकरीता सदर सेवेचे सुलभीकरण व सुसूत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन
होती. त्याअनुषंगाने वाचा येथील क्र.२.३.५ व ६ अधिक्रमीत करण्यात येऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णयः
शासनाच्या डिजिटल सेवा वितरण धोरणानुसार नागरिकाभिमुख सेवा ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने चारित्र्य व पूर्वइतिहास (Character & Antecedents) पडताळणी प्रक्रिया सेवा आपले सरकार (Aaple Sarkar) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागरिकांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी करून विहित अर्ज भरणे आवश्यक राहील. चारित्र्य व पूर्वइतिहास पडताळणी सेवा प्रभावी, पारदर्शक व वेळबद्ध पद्धतीने प्रदान करण्यासाठी आपले सरकार (Aaple Sarkar) पोर्टलवरील अर्ज प्रक्रीया अधिक सुकर व सुलभ करून पुढीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे.
०१. प्रस्ताव सादर करण्याची पद्धतः
खाजगी नोकरी, परदेशी जाण्याकरिता (Visa/Immigration), खासगी सुरक्षा रक्षक सेवा इत्यादी विविध कारणांसाठी अर्जदाराने चारित्र्य पडताळणीसाठीचा अर्ज आपले सरकार पोर्टलवरून (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य राहील.
०२. शुल्काबाबत तरतूदः
चारित्र्य व पूर्वइतिहास प्रमाणपत्र (PCC) साठी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क आकारण्यात येईल. सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक राहील. प्रत्येक अर्जदारांच्या पडताळणीसाठी पुढीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येईलः
(अ) सामान्य PCC : रु.१५९/-
(ब) सुरक्षा रक्षक (Security Guard) PCC : रु.२५९/-
(क) परदेशी जाण्याकरिता PCC (Abroad PCC) : रु.१५९/-
तसेच, केंद्र/राज्य शासनाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या निम-शासकीय संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम इत्यादीमधील कार्यरत किंवा नियुक्त होऊ घातलेल्या कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य व पूर्वइतिहास पडताळणीसाठीही वरीलप्रमाणेच शुल्क आकारण्यात येतील.
०३. अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रेः
(अ) अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना आपले सरकार पोर्टलवर नमूद आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक राहील.
(ब) पोलीस ठाणे येथे चारित्र्य व पूर्वइतिहास अर्जाच्या पडताळणीदरम्यान अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे खरी, अचूक व मूळ प्रमाणपत्रे आहेत याची काटेकोरपणे खात्री संबंधित पोलीस ठाणे यांनी करावी. अर्जामध्ये अर्जाचा उद्देश स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक राहील. अर्जातील माहिती अपूर्ण किंवा चुकीची आढळल्यास संबंधित अर्ज नाकारण्यात येऊ शकतो.
०४. पडताळणी प्रक्रिया व कालमर्यादाः
(अ) चारित्र्य पडताळणीसाठी अर्जदाराने आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर तो संबंधित पोलीस ठाण्याकडे प्राप्त होईल. संबंधित पोलीस ठाण्यास अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराच्या वास्तव्याची सखोल पडताळणी करण्यात येईल. अर्जदाराविरुद्ध नोंद असलेल्या गुन्हे अभिलेखांची (Crime Record) तसेच इतर संबंधित माहितीची तपासणी करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार स्थानिक बीट अधिकारी/कर्मचारी यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष चौकशी करण्यात येईल.
पोलीस ठाण्यात अर्जदाराचा गुन्हे अभिलेख तपासून सदर अर्ज पुढील मान्यतेसाठी विशेष शाखेकडे (द्वितीय मान्यता) पाठविण्यात येईल. विशेष शाखेमार्फत अर्जदाराचा गुन्हे अभिलेख पुन्हा एकदा पडताळून अर्जास मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी अर्ज महाआयटीच्या पोर्टलवर पाठविण्यात येईल. तेथे डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) केलेले चारित्र्य व पूर्वइतिहास प्रमाणपत्र (PCC) पीडीएफ स्वरूपात तयार करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल.
(ब) अर्जदाराने अर्ज केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती वेळोवेळी लघुसंदेशाद्वारे (SMS) अर्जदारास कळविण्यात येईल, तसेच अर्जाची सद्यस्थिती आपले सरकार पोर्टलवर पाहता येईल.
(क) केंद्र/राज्य शासनाद्वारे नियुक्ती केलेल्या / नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य व पूर्वइतिहास (Character & Antecedents) पडताळणी प्रक्रीयेबाबत स्वतंत्र्यपणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.
(ड) पोलीस क्लीअरन्स प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून कमाल ३० (तीस) दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहील.
०५. अर्जदारास चारित्र्य व पूर्वइतिहास प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध असेल
०६. देखरेख व अहवालः
संबंधित पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक यांनी प्रलंबित प्रकरणांचा दरमहा सखोल व नियमित आढावा घ्यावा. उमेदवारांच्या चारित्र्य, पूर्वइतिहास तसेच बंदी घातलेल्या संघटनांशी असलेल्या संभाव्य संबंधांची अत्यंत काळजीपूर्वक व सर्वकष पडताळणी करणे आवश्यक राहील. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अयोग्य व्यक्तींना सेवा क्षेत्रात प्रवेश मिळू नये, यासाठी पडताळणीपूर्व प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक व अत्यावश्यक असेल. तसेच, सर्व संबंधित पोलीस घटकांनी निर्धारित कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करून पडताळणी प्रक्रिया तातडीने, पारदर्शकतेने व वेळेत पूर्ण करावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०३२७१७०७१७४०२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.









