विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या उपक्रमांतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील इ. १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर (School bag) देण्यास प्रशासकीय मान्यता free school bag paripatrak
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र. २४३ (ई-१७८६०२३)/एसडी-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक:- १९ ऑगस्ट, २०२६.
(१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण २४११/ (८०/११)/ अर्थसंकल्प, दिनांक २३ सप्टेंबर, २०११.
(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय, क्रमांक- भांखस-२०१४/प्र. क्र. ८२/ भाग-III/ उद्योग-४, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६.
(३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, संकीर्ण-२०२६/प्र.क्र. ३७ (ई- १५५७४०४)/ एसडी-१, दि.१३.०२.२०२६.
(४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं । २०२६/ स्पिकर-२/१०४, दि.०३.०७.२०२६.
प्रस्तावना:-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ हा राज्यामध्ये दि. ०१.०४.२०१० पासून लागू झालेला आहे. या कायद्यानुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० नुसार शाळांमध्ये आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देऊन, मुलांना २१ व्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात केलेल्या अशा समग्र व अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यावर भर दिलेला आहे. त्या अनुषंगाने मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागातील शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी विविध विशेष उपक्रम राबविण्याबाबत चर्चा होऊन, शैक्षणिक साहित्य अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर (School Bag) देण्याबाबत अभ्यास करून शासनास प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने शासनस्तरावर प्राप्त झालेल्या प्रस्तावास शासन निर्णय, दि. १३.०२.२०२६ अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
२. राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरण केले जाते. तसेच, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत दुपारचे जेवण दिले जाते. या सारख्या अनेक योजना विद्यार्थ्यांची १०० टक्के पटनोंदणी उपस्थिती व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुरु आहेत. तसेच, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतूदींचा विचार करता, शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी दि. २१.०७.२०२६ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर (School Bag) उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इ. १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यतेचा संदर्भ क्र. ३ येथील दि. १३.०२.२०२६ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे.
२. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इ. १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर (School Bag) पुरविण्यासंदर्भात शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संदर्भ क्र. ४ येथील दि. २१.०७.२०२६ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या रु. १७४,१९,३५,४२४/- (अक्षरी रुपये एकशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणीस लक्ष पस्तीस हजार चारशे चोवीस फक्त) इतक्या रकमेच्या प्रस्तावास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे :-
(२.१) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतच्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन दप्तर (School Bag) पुरविण्यासाठी “शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिका”, याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेल्या संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णय क्र. भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भा-III/उद्योग-४, दि. १ डिसेंबर, २०१६ मध्ये नमूद केलेल्या विहित कार्यपद्धती व तनंतर त्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील विहित अटी, शर्तीच्या अधीन राहून ई-निविदा राबवून खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
(२.२) प्रस्तुत ई-निविदेतील न्युनतम दरधारक (L-1) यांना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि. ०१ डिसेंबर, २०१६ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या “शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन
खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिकेत विहित केलेली कार्यपध्दती” तसेच शासनाचे प्रचलित नियम विचारात घेऊन निविदा अंतिम करावी.
(२.३) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतच्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दप्तरच्या (School Bag) किंमतीमध्ये DESIGN, SUPPLY (incl.transportation), व GST इत्यादी सर्व बाबींचा एकत्रितरित्या समावेश असेल, निविदाकार ई-निविदेमध्ये वरील बाबीसाठी वेगवेगळ्या किंमती दर्शविणार असल्यास संबंधित निविदा विचारात घेतली जाणार नाही.
३. संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय, दि. २३ सप्टेंबर, २०११ अन्वये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे (सायन्स कीट, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क बेंच, शैक्षणिक साहित्य इ.) या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर (School Bag) पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचे प्रारूप शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी तयार करावे व त्यास शासनाची मान्यता घ्यावी.
४. सदर खरेदीबाबतचा खर्च मागणी क्र. ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ००१, संचालक व प्रशासन (००) (००) (०१) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, (२२०२ L ०६६)” या लेखाशीर्षांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या तरतूदीमधून भागविण्यात येईल. याकरिता निधी वितरणाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा. त्या अनुषंगाने निधी वितरणाचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
५. सदरचा शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील भाग पहिला उपविभाग-३, अनुक्रमांक-४, परिच्छेद क्र. २७ (२) (ब) व वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दि. ०९.०४.२०२६ अन्वये विभागाला प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असुन त्याचा संकेतांक २०२६०८१९१६२५४३४१४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










