कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील एक प्रसंग karmavir bhaurav patil 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील एक प्रसंग karmavir bhaurav patil 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो. भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो, त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटले.

सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली. अंधार पडला, रात्र झाली. ‘आता इथंच मुक्काम करा!’ अण्णांनी मला आग्रह केला. अण्णांचा तो आग्रह ! नाही कसे म्हणायचे? राहिलो झाले तिथे.

मी संस्थेचा परिसर पाहत निघालो. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूलाही गर्द झाडी होती. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडली होती. मुले पत्र्याच्या खोल्यांतून राहत होती. पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते.

मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो. त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला /

‘नुकतंच जेवण झालंय माझं,’ असे मी त्यांना सांगितले. अर्थात हे सर्व खोटेच होते. वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार! म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली.

मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली. माझ्या पोटात मात्र कावळे

ओरडत होते. मग मला झोप कशी येणार? मी तसाच पडून राहिलो.

अण्णांनी हे ओळखले. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, “जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू !” मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला. पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. मी अधाश्यासारखा त्यावर तुटून पडलो. पंचपक्वान्नांपेक्षाही ते मला रुचकर लागले. मग काय, बिछान्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला. मध्यरात्र उलटूने गेली. कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली. अण्णा उठले होते. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरूण आहे की नाही ते अण्णा पाहू लागले. त्यांनी पाहिले, की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगत उचलले, स्वतःच्या बिछान्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले. त्या उबेत तो मुलगा गाढ झोपी गेला.

त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती. कितीतरी जणांना वडील नव्हते; पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता. अशी होती अण्णांच्या मायेची पाखर. हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिले.

सकाळी मी उठलो. अण्णांना कडकडून भेटलो. नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, “अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे, तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणांस उदंड आयुष्य मिळो !”

अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण ‘कर्मवीर’ म्हणून ओळखतात.

Leave a Comment