लोक कल्याणकारी राजे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध marathi nibandh rajarshi shahu maharaj
भारतातील लोककल्याणकारी राजा, महान समाजसुधारक, क्रांतिकारी विचारवंत, कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे होते. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर राणी आनंदीबाई यांनी दहा वर्षाच्या यशवंतला दत्तक घेतले व त्याचे नाव शाहू असे ठेवले. कोल्हापूर, राजकोट, धारवाड आदी ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण चालू असतानाच वयाच्या १७व्या वर्षी बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे त्यांना एकूण चार अपत्ये झाली.
२ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला तरणोपाय नाही म्हणून सर्वप्रथम त्यांनी समाजातील सर्व जाती धर्मासाठी वसतिगृहे, शाळा, महाविद्यालये सुरू केली. या दरम्यान १८९९ साली कोल्हापुरातील ब्राह्मणांनी शाहू महाराज हे क्षत्रिय नसून शूद्र आहेत. त्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्र म्हणण्याची गरज नाही; असे सांगितले. यावेळी महाराजांना शंकराचार्य, लोकमान्य टिळक यांच्यासह समस्त ब्राह्मणवर्गाने कडाडून विरोध केला. यालाच ‘वेदोक्त प्रकरण’ असे म्हणतात. याचाच परिणाम त्यांनी शंकराचार्य पद रद्द करून नवीन ‘क्षात्रजगद्गुरू’ पद निर्माण केले. त्यासाठी पुरोहितांच्या शाळा काढल्या. पारंपारिक कुलकर्णी वतने रद्द करून पगारी तलाठ्यांची नेमणूक केली. कोणत्याही विरोधाला न जुमानता २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानमध्ये मागासवर्गीयांसाठी ५०% आरक्षण जाहीर केले.
प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले (१९१७). विधवा
पुनर्विवाहाचा कायदा केला (१९१७). महार वतने बंद केली (१९१८). वेठबिगारी पध्दत बंद केली (१९१९). महिलांना क्रूरपणे वागविण्याच्या
विरोधात प्रतिबंधक कायदा केला (१९१९). घटस्फोटाचा कायदा मंजूर केला (१९२०). यासह सतीप्रथा, केशवपन, देवदासी, वाध्यामुरळी यासारख्या अनिष्ठ प्रथांवर बंदी घातली. रामोशी, पारधी या जातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना सन्मानाची वागणूक दिली व त्यांचे पुनर्वसन केले. सत्यशोधक चळवळीला राजाश्रय देऊन महात्मा फुलेंचे कार्य पुढे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. तसेच त्यांना ‘मूकनायक’ हे साप्ताहिक प्रकाशित करण्यासाठी मदत केली.
वरील सामाजिक कार्याबरोबर शेतकऱ्यांसाठी १९०७साली त्यांनी भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. शाहू मिलची स्थापना केली. शाहूपुरी बाजारपेठ वसविली. शेतकी संस्था उभारून शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून दिली. कोल्हापूर संस्थानात चित्रकला, लोककला, संगीत, चित्रपट, कुस्ती यासारख्या क्षेत्रांना राजाश्रय दिला. अशाप्रकारे सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता जपत त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रात एकमेवाद्वितीय कार्य केले. त्यामुळे इंग्रजांनी केंब्रिज विद्यापीठाच्या एल.एल.डी (१९०३) या मानद पदवीने त्यांना सन्मानित केले. १९१९ साली कानपूर येथील अखिल भारतीय कुर्मी परिषदेत लोकांनी त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो










