क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चारोळी युक्त मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti
आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि समोर बसलेले माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो. स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या, स्त्रियांना साक्षर व्हा आणि निर्भर व्हा असे संदेश देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आपण साजरा करत आहोत.
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार ।।
भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका भारतीय स्त्रीमुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन…
कारण ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी राहून भाषण करत आहे. कदाचित त्या नसल्या असत्या तर माझ्यासारख्या अनेक मुली स्त्रिया चूल आणि मूल सांभाळत बसले असते.
बालमित्रांनो अशा महान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते.
इसवी सन 1840 मध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले 11 वर्षांचे होते.
सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या . लग्नानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला-वाचायला शिकवले.
त्याकाळी स्त्री शिकणे म्हणजे पाप असे समजले जायचे. त्याकाळी समाजाचा विरोध पत्करून सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले या दाम्पत्याने केले.
1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून शिक्षणाचा पाया रोवला. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांना मान मिळाला. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्यांचे निर्णय सत्यात उतरवत असताना सावित्रीबाईंना अनेक संकटे आली.
त्या मुलांना शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत. कारण त्याकाळी लोकांना स्त्री शिक्षण मान्य नव्हते. स्त्री शिकणे म्हणजे पाप आहे असे त्याकाळी समज होती. त्यामुळे सावित्रीबाईंना अशा संकटांना सामोरे जावे लागले. पण तरीही त्यांनी या सगळ्या संकटांपुढे डगमगले नाही. तर खंबीरपणे संकटांना तोंड दिले.
सावित्रीबाईंच्या कार्याविषयी सांगावे तेवढे कमीच आहे. शिक्षणासोबत त्यांनी उपेक्षितांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले. बालविवाह, सती, केशवपन अशा क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला. दीनदुबळ्यांना, अनाथांना, विधवांना त्यांनी आधार दिला. सावित्रीबाईंनी स्त्रीयांना “साक्षर व्हा निर्भर व्हा” असा संदेश दिला.
काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहून समाजाला जागृत करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले.
1896-97 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत असताना सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 साली त्यांचे निधन झाले.
“घरातील एक स्त्री शिकली, की कुटुंब शिकते. “हा विचार भारतीय समाजात रुजविणार्या सावित्रीबाई महान क्रांतिज्योती होत्या. अशा या ज्ञानज्योतीला शतशः प्रणाम करत शेवटच्या दोन ओळी सांगते…
तू क्रांतीज्योती, तू दयेची मुर्ती, तू ज्ञानाई !
तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई !
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे !
आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी तू सावित्रीमाई…










