दिनांक १५ जानेवारी, २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करिता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत mahanagarpalika voting
संदर्भ :- १. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का.५ दि.१५/१२/२०२५ व दि. २६/१२/२०२५ रोजीची पत्रे.
शासन परिपत्रक
आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-जेयुडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
२. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भाधीन पत्रान्वये राज्यातील २९ महानगरपालिकांच्या (परिशिष्ट-१) सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम २०२५-२६ जाहीर केला आहे. सदर निवडणूकोचे मतदान दि. १५ जानेवारी, २०२६ रोजी रोजी होणार आहे.
३. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-जेयूडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :-
1. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेल्या आणि कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
II. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.
III. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तोला अशा दिवसासाठी सामान्यतः वेतन मिळणार नाही.
या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्या दिवशी त्याला सुट्टी दिली नसती तर त्याला अनुज्ञेय असेल असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल.
IV. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित मतदारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक राहिल.
V. वर नमूद केल्यानुसार उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल.
४. सदर परिपत्रक राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का.५ दि.१५/१२/२०२५ व दि. २६/१२/२०२५ रोजीच्या पत्रांस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०११३१८२३१०४०१० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.








