“अंहकाराचा नाश” मराठी बोधकथा marathi bodhkatha

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“अंहकाराचा नाश” मराठी बोधकथा marathi bodhkatha

अंहकाराचा नाश

एका जंगलात एक मोठा ओबडधोबड काळा कुळकुळीत दगड पडलेला होता. त्याच्या बाजूला एका वेलीवर पांढरी सुवासिक फुलं वाऱ्याबरोबर मजेत डुलत होती.

त्या दगडाकडे पाहून फुलं नेहमी त्याची थट्टा करीत. त्याला काहीही म्हणत, “ना रंग ना रूप, काही कामाचा नाही. उगाच धरणीला भार आहे हा!” आताही त्यांची थट्टा चालूच होती; तेवढ्यात त्यांना एक मनुष्य दिसला. त्याच्या हातात छन्नी, हातोडा होता. तो दगडाच्या अवतीभोवती निरखून पाहतो आणि उद्‌गारलो वा सुरेख ! फारच छान ! फुलं म्हणाली, “या दगडोबाला छान म्हणणारा हा माणूस खरोखरच वेडा असेल; परंतु तो मनुष्य वेडा नव्हता. तो होता एक शिल्पकार !

दुसऱ्या दिवशी शिल्पकार आणखी काही साहित्य बरोबर घेऊन आला. दिवसभर छन्नी, हातोडा मारून त्याने दगडाचा ओबडधोबड भाग काढून टाकला. आता तो दगड सरळ गुळगुळीत खांबासारखा दिसू लागला होता. चार दिवस निघून गेले आणि त्या दगडातून एक सुंदर देवाची मूर्ती आकारास आली. मूर्तीवर शेवटचा हात मारून शिल्पकाराने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. भोवताली आवार बांधले. अनेक भाविक मग दर्शनासाठी येऊ लागले. जवळच्या वेलीवरची फुलं तोडून मुर्तीच्या पायांवर वाहू लागले.

गर्वाने हसणाऱ्या त्या फुलांना मात्र त्याच दगडाच्या चरणी पडून राहावे लागल्याने दुःख होई. त्यांचं गर्वहरण झाल होत. दुःखी झालेल्या फुलांना दगड म्हणाला, “मित्रानो, आपण जुने शेजारी आहोत. खूप दिवस तुम्ही मला हसलात, चिडवलंत पण मी शांत होतो, याचं कारण आपण सारे या ईश्वराचीच रचना आहोत. त्यांना नावे ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार? त्याने निर्माण केलेल्या वस्तू टाकाऊ व हीन कशा असतील? प्रत्येकात कोणता ना कोणता चांगला गुण भरलेला आहे. तो गुण आपण पाहावा, म्हणजे सारी सृष्टी आपल्याला सुंदर भासू लागेल.

फुलाना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. ती म्हणाली, मित्रा तू म्हणतोस ते खरंय! आम्हांला आमच्या रूपाचा गर्व झाला होता; परंतु आज आम्हांला कळलं की, ज्याच्यावर ईश्वराची कृपादृष्टी होते त्याला तुझ्यात शिल्पकाराच्या कौशल्याने देवत्व आलंय. आता तुझ्या चरणांवर पडून राहण्यातच आम्हांला भूषण वाटतंय ! मित्रांनो रूप, गुण, सौंदर्य, सत्ता, संपत्ती, विद्वत्ता, कीर्ती यांचा कधीही गर्व करू नये. त्याचा गर्व न करता त्याचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करण्यातच त्याचे सार्थक आहे.

 

 

Leave a Comment