निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम टप्पा दोन नुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील अध्ययन स्तर मूल्यमापनबाबत शासन परिपत्रक nipun maharashtra abhiyan circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम टप्पा दोन नुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील अध्ययन स्तर मूल्यमापनबाबत शासन परिपत्रक nipun maharashtra abhiyan circular 

प्रति,

१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व),

३. शिक्षण निरीक्षक (मुंबई) (सर्व)

४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), महानगरपालिका (सर्व),

५. प्रशासन अधिकारी (शिक्षण), नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत (सर्व),

शासन परिपत्रक pdf download 

विषयः निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम टप्पा दोन नुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील

अध्ययन स्तर मूल्यमापनबाबत

संदर्भ: १) राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२०

२) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/एसडीई-६, दिनांक २७ ऑक्टोबर २०२१

३) शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे निपुण भारत अभियान सुधारित अध्ययन लक्ष्ये पत्र दि. २०/०८/२०२४

४) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/निपुण भारत अभियान / २०२४-२५/५२२५ दि. २५/१०/२०२४

५) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र. १७९/ एसडीई-६, दिनांक ०५ मार्च, २०२५

६) निपुण महाराष्ट्र अभियान पूर्वतयारी बाबतचे प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/E- १९९०७८९/

२०२६ चे पत्र दिनांक ३० जून २०२६.

७) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२३/प्र.क्र. ३०/एसडी-६, दिनांक १० मे २०२३

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने देशातील प्रत्येक बालकाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानातील अपेक्षित क्षमता प्राप्त कराव्यात, या उद्देशाने सन २०२१ मध्ये ‘निपुण भारत अभियान’ (National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy NIPUN Bharat) सुरू केले. या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये राज्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्देश दिले आहेत. संदर्भ क्रमांक ३ अन्वये केंद्र शासनाने निपुण भारत अभियानाची सुधारित अध्ययन लक्ष्ये निश्चित केली आहेत. यानुसार संदर्भ क्रमांक ४ अन्वये सुधारित अध्ययन लक्ष्ये आपणास अवगत करण्यात आलेली आहेत. या सर्व निर्देशांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक ५ अन्वये राज्यात ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ राबविण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये विकसित करणे, विद्यार्थ्यांचे नियमित अध्ययन स्तरनिहाय मूल्यमापन करणे आणि मूल्यमापनातून प्राप्त माहितीच्या आधारे आवश्यक अध्ययन अध्यापन सहाय्य उपलब्ध करून देणे यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सदर अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील सुमारे १.६ लाख शिक्षकांनी दरमहा अंदाजे ३२ लाख विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरांची नोंद केली आहे. डिसेंबर २०२५ च्या तुलनेत मार्च २०२६ मध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत विषयनिहाय १२ ते १५ टक्के अध्ययन संपादणूकीत वाढ दिसून आली आहे. तसेच निपुण शाळांचे प्रमाण डिसेंबर २०२५ मधील ८ टक्क्यांवरून मार्च २०२६ मध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढलेले आहे.

सदर अभियानाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीत सकारात्मक बदल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील शैक्षणिक वर्षातील अनुभव, विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती आणि अध्ययन लक्ष्ये विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

१. निपुण लक्ष्यांनुसार अध्ययन क्षेत्र व अध्ययन स्तर

दिनांक ०५ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. या कृती कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मराठी भाषेसाठी इयत्ता दुसरीमध्ये वाचन व लेखन आणि तिसरी ते पाचवीमध्ये वाचन व लेखन या अध्ययन क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला होता, तर गणित विषयासाठी इयत्ता दुसरीमध्ये संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया आणि तिसरी ते पाचवीमध्ये संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया या अध्ययन क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला होता.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पहिली वर्गाचा समावेश करण्यात येत आहे. इयत्ता पहिली व दुसरीमध्ये मराठी भाषेसाठी मौखिक भाषा, वाचन व लेखन तर इयत्ता तिसरी ते पाचवीमध्ये वाचन व लेखन या अध्ययन क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे, तर गणित विषयामध्ये इयत्ता पहिलीमध्ये अवकाशीय संबोध, आकार, आकृतिबंध, संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया व मापन, इयत्ता दुसरीमध्ये अवकाशीय संबोध, आकार, आकृतिबंध, संख्याज्ञान, चलनी व्यवहार, संख्यांवरील क्रिया व मापन तर इयत्ता तिसरी ते पाचवीमध्ये आकार, आकृतिबंध, संख्याज्ञान, चलनी व्यवहार, संख्यांवरील क्रिया व मापन या अध्ययन क्षेत्राचा समावेश करण्यात येत आहे. या सुधारित अध्ययन क्षेत्रानुसार अध्ययन स्तरांची पुनर्रचना करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा क्रमिक विकास लक्षात घेऊन अध्ययन स्तर निश्चित करण्यात आले आहेत. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात नमूद करण्यात आलेली लक्ष्ये शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस प्राप्त करणे आवश्यक आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या निर्धारित अध्ययन स्तरांनुसार NIPUN Maharashtra (SCERTM) अॅपद्वारे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीसाठी निश्चित केलेले अध्ययन क्षेत्र व निर्धारित अध्ययन स्तर जोडपत्र १ मध्ये देण्यात येत आहेत.

२. अध्ययन स्तर व मूल्यमापन प्रक्रियेबाबत उद्बोधन

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत निर्धारित अध्ययन स्तर व अनुषंगिक वर्गस्तरीय उपक्रम आणि मूल्यमापन प्रक्रिया याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती व पर्यवेक्षीय यंत्रणा यांचे उद्बोधन करावे.

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद तसेच शाळा स्तरावरील शिक्षक बैठकीमध्ये अध्ययन स्तरांचे वाचन व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात यावी, प्रत्येक अध्ययन स्तरामध्ये विद्यार्थ्यांकडून कोणत्या क्षमता अपेक्षित आहेत आणि त्या क्षमतांचे मूल्यमापन कसे

करावे, याबाबत सर्व शिक्षकांना स्पष्ट माहिती देण्यात यावी.

३. पालक सहभाग व UDISE + पोर्टलवरील माहितीचे अद्ययावतीकरण

सदर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पालकांचा सहभाग घेण्यात येत आहे. यासाठी निपुण महाराष्ट्र अॅपमध्ये पालकांचे संपर्क क्रमांक UDISE + पोर्टलमधून थेट जोडले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी आपल्या शाळेतील विद्याथ्यांची माहिती व त्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक UDISE + पोर्टलवर अचूक व अद्ययावत असल्याची खात्री करावी,

चाचणीपूर्वी प्रत्येक शाळेने किमान एक पालक सभा आयोजित करावी. या सभेमध्ये पालकांना अध्ययन स्तर, निपुण महाराष्ट्र अॅपवरील पालकांसाठी उपलब्ध सुविधा आणि घरच्या घरी विद्यार्थ्यांचा सराव कसा घ्यावा याबाबत माहिती व मार्गदर्शन करावे, शाळा व्यवस्थापन समिती व माता-पालक गट यांच्या सहकार्याने पालकांचा अभियानामधील सहभाग वाढवावा. पालकांनी दररोज आपल्या पाल्यासोबत वाचन, गोष्टी सांगणे, चित्रांवर चर्चा करणे व निपुण महाराष्ट्र अॅपमधील सोपे भाषिक व गणितीय खेळ यांसारख्या कृती कराव्यात, यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.

४. अध्ययन स्तरानुसार गट अध्ययन-अध्यापन व पूरक शैक्षणिक सहाय्य

प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सध्याची अध्ययन पातळी जाणून घ्यावी, निपुण भारत अभियानातील निर्धारित लक्ष्ये साध्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेच्या वेबसाईट वरील साहित्य व युट्युब चॅनेलवरील व्हिडीओ यांचा अधिकाधिक वापर करावा. अपेक्षित अध्ययन स्तरापेक्षा मागे असलेल्या

विद्यार्थ्यांची अध्ययन गरज ओळखून त्यांच्यासाठी स्तरनिहाय अध्ययन-अध्यापन व पूरक अध्यापन करावे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार अधिक सराव व वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात यावे. यासाठी वर्गातील नियमित निरीक्षण, तोंडी प्रश्नोत्तरे, वाचन, लेखन व सोप्या गणितीय कृतींचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीनुसार आवश्यकतेप्रमाणे गट तयार करून पुढील अध्ययन – अध्यापनाचे नियोजन व अपेक्षित कार्यवाही करावी.

५. अभियानाच्या प्रगतीचा नियमित आढावा व पर्यवेक्षण

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निपुण महाराष्ट्र अॅपवरील माहिती विश्लेषणाच्या आधारे संदर्भ क्रमांक २ व संदर्भ क्रमांक ७ च्या शासननिर्णयानुसार जिल्हा व तालुका स्तरावर नियमित आढावा बैठका आयोजित करण्यात याव्यात. तसेच शाळाभेटी व केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांच्या माध्यमातून अभियानाच्या प्रगतीचा दरमहा आढावा घेण्यात यावा व आवश्यकतेनुसार शैक्षणिक सहाय्य पुरविण्यात यावे.

उपरोक्त सर्व सूचनांची नोंद घेऊन निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम टप्पा दोन नुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर मूल्यमापन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये विकसित करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. अभियानाच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती होईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

जोडपत्र – १

Digitally signed by Mangesh Hiraman Joshi Date: 03-11-2026 17:25:13

(मंगेश जोशी भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत कार्यवाहीस्तवः

१) शिक्षण संचालक, (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

२) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्चमाध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

३) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग)

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३) मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

Related posts:

Leave a Comment