दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘संविधान दिन’ साजरा करणेबाबत sanvidhan din circular
विषयः दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘संविधान दिन’ साजरा करणेबाबत.
संदर्भ: महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन सामंजस्य करार दि. २८ एप्रिल, २०२५.
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस २०१५ पासून संविधान दिन (संविधान दिवस) म्हणून साजरा केला जातो, जो भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या मसुदा समितीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत केले व दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारताचे संविधान हा आपल्या लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ असून, देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची हमी देणारा सर्वोच्च कायदा आहे. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सन २०१५ पासून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता सुनिश्चित करणारी बंधुता प्रस्थापित करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. ही मूल्ये केवळ संविधानापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे, लोकशाही प्रक्रियेबद्दल आदर विकसित करणे आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविणे ही शालेय शिक्षणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन (SMF) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी ‘मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहकार्य, आदर, जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता यांसारखी मूल्ये रुजविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो. संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम या प्रयत्नांना अधिक बळकटी देणारे ठरू शकतात. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये समजून घेण्याबरोबरच ती प्रत्यक्ष जीवनात अनुभवण्याची व आचरणात आणण्याची संधी उपलब्ध करून देता येईल.
तदनुषंगाने २६ नोव्हेंबर, २०२६ संविधान दिनानिमित्त शाळांनी पुढील कार्यक्रम / उपक्रम मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून राबवावेत, ज्यात संवैधानिक मूल्य रुजविण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व, जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ होतील. अशा प्रकारे संविधान दिन हा फक्त औपचारिक न राहता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा सजीव अनुभव देणारा दिवस ठरेल.
१. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
उद्दिष्टे : १. विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेची ओळख करून देणे.
२. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत मूल्यांचे महत्त्व समजावून देणे.
३. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व अभिमान निर्माण करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी :
शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
करावे.
उद्देशिकेतील महत्त्वाच्या संकल्पनांचा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार अर्थ स्पष्ट करावा.
विद्यार्थ्यांना या मूल्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगण्याची संधी द्यावी.
२. संविधान जनजागृती प्रभात फेरी
उद्दिष्टे : १) विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे.
२) नागरिक म्हणून कर्तव्यभावना विकसित करणे.
३) समाजात संविधानाचे महत्त्व पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
विद्यार्थ्यांनी संविधानातील घोषवाक्यांसह फलक तयार करावेत.
शाळेपासून गाव किंवा परिसरात प्रभात फेरी काढावी.
फेरीदरम्यान घोषवाक्ये, देशभक्तीपर गीते सादर करावीत.
३. संविधान व्याख्यानमाला व चर्चासत्र
उद्दिष्टे : १) विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून देणे.
२) संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची ओळख करून देणे.
३) विद्यार्थ्यांना संविधानाच्या अभ्यासासाठी प्रेरित करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
संविधान अभ्यासक, प्राध्यापक किंवा वकील यांचे व्याख्यान आयोजित करावे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तर सत्राची व्यवस्था करावी.
व्याख्यानानंतर थोडक्यात चर्चासत्र घ्यावे.
४. संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा
उद्दिष्टे: १) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे.
२) संविधानाच्या मूल्यांबद्दल कलात्मक पद्धतीने जनजागृती करणे.
३) दृश्यकलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
स्पर्धेचे विषय ठरवावेत (उदा. “आपले संविधान आपला अभिमान”).
आवश्यक साहित्याची व्यवस्था करावी.
निवडक चित्रे प्रदर्शनासाठी शाळेत लावावीत.
५. संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा (Quiz Competition)
उद्दिष्टेः १) विद्यार्थ्यांचे संविधान विषयक ज्ञान वाढवणे.
२) गटाने कार्य करण्याची सवय लावणे.
३) स्पर्धात्मकतेतून शिकण्याची वृत्ती निर्माण करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
संविधानाशी संबंधित प्रश्नसंच तयार करणे.
गट किंवा वर्गनिहाय स्पर्धा घेणे.
विजेत्या गटांना प्रमाणपत्र व बक्षीस देणे,
६. संवैधानिक मूल्यांवर आधारित पथनाट्य
उद्दिष्टे :- १) समाजात संविधानिक मूल्यांची जनजागृती करणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये नाट्याद्वारे अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे.
३) सामाजिक समरसतेचा संदेश देणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर करण्यासाठी अभिनयाचे प्रशिक्षण द्यावे व सराव करवून घ्यावा.
शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करावे.
नाटकामधून संविधान दिनाचा संदेश द्यावा.
७. संविधानविषयक गीत, पोवाडा व सांस्कृतिक कार्यक्रम
उद्दिष्टे: १) लोककला व सांस्कृतिक माध्यमांतून संविधानाचे महत्त्व समजावून देणे.
२) विद्यार्थ्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे.
३) राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बंधुभावाची भावना दृढ करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः
विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित पोवाडे, गाणी शिकवणे.
शाळेच्या कार्यक्रमात सादरीकरण करणे.
सर्वोत्तम सादरीकरणास पारितोषिक देणे.
८. मानवी साखळी व सामाजिक ऐक्य उपक्रम
उद्दिष्टे :- १) विद्यार्थ्यांना एकता, बंधुता व सामूहिक जबाबदारी या मूल्यांचा अनुभव देणे.
२) विविधता असूनही एकत्र राहण्याचे महत्त्व समजावून देणे.
३) सामाजिक ऐक्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सहभागातून मानवी साखळी तयार करावी.
आम्ही भारताचे लोक’ या संकल्पनेवर आधारित संदेश द्यावा.
या उपक्रमातून एकता, समानता व बंधुता या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करावे.
९. सेल्फी पॉईंट -“I love Constitution” :-
उद्दिष्टेः १) विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून संविधानाशी जोडणे.
२) सकारात्मक प्रचाराद्वारे संविधान दिन लोकप्रिय करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
शाळेत “संविधान दिन सेल्फी पॉईंट” तयार करावा.
विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रतिक, भारतीय ध्वजासह छायाचित्रे घ्यावीत.
“माझा देश-माझा अभिमान” सारखे घोषवाक्य वापरावे.
१०. संविधानविषयक हस्तकला व प्रतिकृती निर्मिती
उद्दिष्टे : १) विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्य व सर्जनशीलतेला वाव देणे.
२) संविधानाशी संबंधित प्रतिक व ऐतिहासिक संदर्भाची ओळख करून देणे.
३) कृतीतून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी :
विद्यार्थ्यांना संविधानाची उद्देशिका, संसद भवन, संविधानाची प्रतिकृती किंवा संविधानाशी संबंधित
इतर शैक्षणिक साहित्य तयार करण्यास प्रोत्साहित करावे.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याचे शाळेत प्रदर्शन आयोजित करावे.
११. ‘माझे संविधान, माझे कर्तव्य’ अनुभव व अभिव्यक्ती उपक्रम
उद्दिष्टे : १) विद्यार्थ्यांना संवैधानिक मूल्यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडण्यास मदत करणे.
२) स्वतःच्या वर्तनातून मूल्यांचे आचरण करण्याची जाणीव निर्माण करणे.
३) जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी :
विद्यार्थ्यांना मी समतेचा आदर कसा करतो?’, ‘मी इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर कसा करतो?, ‘मी माझ्या वर्गात बंधुता कशी जपतो? अशा विषयांवर विचार मांडण्याची संधी द्यावी.
विद्यार्थ्यांकडून संवैधानिक मूल्ये आचरणात आणण्यासाठी वैयक्तिक संकल्प करून घ्यावेत.
वर्गामध्ये प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांवर आधारित चर्चा घडवून आणावी.
वरील उपक्रमांव्यतिरिक्त शाळांना स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांचे वयोगट व उपलब्ध साधनसामग्री यांचा विचार करून अन्य नाविन्यपूर्ण उपक्रमही आयोजित करता येतील.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत व सहभागातून करण्यात यावे. सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राहील, याची दक्षता घ्यावी. उपक्रम केवळ औपचारिक स्वरूपात न राबविता विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये समजून घेता येतील, त्यावर विचार करता येईल आणि ती दैनंदिन जीवनात आचरणात आणता येतील, अशा पद्धतीने त्यांचे नियोजन करावे.
महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगतपणे या उपक्रमांचे आयोजन करावे. कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन (SMF) मार्फत नियुक्त जिल्हा कार्यक्रम समन्वयक (DPC) व तालुका समन्वयक (TC) यांच्यामार्फत शाळांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. अहवाल सादरीकरण :
संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा जिल्ह्याचा एकत्रित अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे दिनांक ०५ डिसेंबर, २०२६ पर्यंत सादर करावा. तसेच सर्व शाळांनी https://the-octopus.com/api/sanvidhan Form या लिंकवर संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती भरावी.
सर्व संबंधितांनी संविधान दिनाचे उपक्रम उत्साहपूर्ण व प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्यांची जाणीव व आचरण विकसित करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा.










