शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) २०२६-२७ ची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत educational planning calendar
संदर्भ:
१. दिनांक ०९.०५.२०२६ रोजीच्या बैठकीतील निर्देश.
२. या कार्यालयाचे पत्र क्र. प्रशिसं/८०२/कॅलेंडर/२०२६/, दिनांक १२.०५.२०२६.
३. आयुक्त (शिक्षण) पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं ८०२/कॅलेंडर /२०२५, दिनांक २०.०५.२०२५.
उपरोक्त विषयांकित प्रकरणी कळविण्यात येते की, कोणतेही शैक्षणिक अथवा प्रशासकीय काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी त्याचे पूर्व नियोजन असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि शाळा पातळीवर विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रम राबविले जातात. या सर्व उपक्रमांचे योग्य प्रकारे वर्गीकरण आणि महिनानिहाय नियोजन करून शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी ‘शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर)’ अंतिम करण्यात आले आहे. सदर शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) २०२६-२७ ची प्रत प्रिंट स्वरुपात सर्व शाळा, समुह साधन केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय कार्यालये यांना पुरविण्यात येणार आहे.
सदर कॅलेंडर हे केवळ शाळा, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांसाठी मर्यादित नसून, ते राज्यस्तरापासून ते थेट विभाग, जिल्हा, तालुका, बीट, केंद्र आणि शाळा पातळीवरील सर्व शिक्षक व अधिकारी यांना मार्गदर्शक ठरणार आहे. १. उद्दिष्टे :
दैनंदिन कामकाजात व विविध उपक्रम अंमलबजावणी यामध्ये सुसूत्रता आणणेः शिक्षक आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेला (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य (डायट), विभागीय शिक्षण उपसंचालक) महिनानिहाय करावयाच्या ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रमांची/कामांची पूर्वकल्पना देऊन आवश्यक नियोजन व अंमलबजावणी यामध्ये सुसूत्रता आणणे.
नियोजन, वेळेची बचत व अचूकताः पूर्व-नियोजित कालबद्ध वेळापत्रकानुसार उपक्रम, नियोजन व त्यानुसार अंमलबजावणी करणे
क्षेत्रीय समन्वयः राज्य पातळीपासून ते शाळा पातळीपर्यंतच्या सर्व घटकांमध्ये उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत एकवाक्यता निर्माण करणे.
२. स्वरुप : शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेडर) याची विभागणी ३ टप्प्यात केली आहे.
अ. दैनंदिन करावयाची कामे
आ. दरमहा करावयाची कामे
इ. महिनानिहाय आठवडानिहाय करावयाची कामे / उपक्रम
३ अंमलबजावणी / वापर :
राज्यातील विविध शाळा प्रकार- प्राथमिक (इयत्ता १ ते ४/५, इयत्ता १ ते ७/८), माध्यमिक (इयत्ता ५ते १०/१२, इयत्ता ८ ते १०/१२) इत्यादी शाळा प्रकार व शाळा व्यवस्थापन शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळा अशा शाळापैंकी सर्व शाळांनी आपल्याशी संबंधित उपक्रमांचे आवश्यक नियोजन करावे व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तर अशा विविध स्तरावरील संबंधित कार्यालये व अधिकारी यांनी आपल्याशी संबंधित उपक्रमावर विहित नियोजनानुसार आवश्यक पत्रव्यवहार, निधी वितरण, सूचना, मार्गदर्शन, आढावा इत्यादी कार्यवाही करावी
४. साध्य :
विद्यार्थी गुणवत्ता विकासः विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी वेळेत झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या
अध्ययन स्तरात व गुणवत्तेत निश्चित सुधारणा साध्य होईल.
प्रभावी पर्यवेक्षणः पर्यवेक्षीय यंत्रणेला शाळा भेटी दरम्यान नेमका कोणत्या घटकांचा किंवा उपक्रमाचा आढावा घ्यायचा आहे, याचे स्पष्ट उद्दिष्ट मिळाल्याने प्रशासकीय नियंत्रण अधिक मजबूत होईल.
१००% अंमलबजावणीः सर्व शैक्षणिक आणि शासकीय योजनांची उद्दिष्टे विहित कालमर्यादेत पूर्ण होऊन
कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी उपक्रमांपासून वंचित राहणार नाही.
तरी, सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी व शाळांनी उपरोक्त नमूद बाबींच्या अनुषंगाने शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) मधील नमूद उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करावी.
सोबतः शैक्षणिक कामकाज नियोजन (कॅलेंडर) २०२६-२७ प्रत.










