सन २०२६-२७ मध्ये इ.३ री, ४ थी व ६ वी साठी सेतू अभ्यास अंमलबजावणीबाबत setu abhyas amlbajavani
तसेच इ. ६ वी प्रशिक्षण घटकसंच वितरणाबाबत.
संदर्भ
१. शासन निर्णय क्रमांक-२०२५/प्रक्र.९४/एस.डी.४ दि.१४/०७/२०२५
२. राज्यस्तरीय समन्वय समिती बैठक दि.०१/०६/२०२६.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलबजावणी अंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दि.१४/०७/२०२५ अन्वये सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येत आहे. सन. २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.
नवीन अभ्यासक्रम प्रथमच लागू होणाऱ्या इयत्ता (३री, ४थी, ६वी) मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बदललेल्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी सुकर व्हावी म्हणून तसेच, नवीन अभ्यासक्रमात वाढलेली शैक्षणिक पातळी, भाषिक समज आणि स्व-अभ्यासाची सवय यांची जुळवणूक सहज व्हावी यासाठी २१ दिवसांचा सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ३ री, ४ थी, ६ वी वर्गासाठी सदर सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेतू अभ्यासाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यातील शिक्षकांसाठी याद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत (सोबत संलग्न). सदर सूचना आपल्या अधिनस्त सर्व शाळांपर्यंत पोहोचवाव्यात. सेतू अभ्यास अंमलबजावणी सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुव्यवस्थितपणे व वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रभावी पर्यवेक्षण करावे.
सेतू अभ्यास पुस्तिका राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरापर्यंत पोहचविण्यात येत आहेत. त्यांचे वितरण शिक्षणाधिकारी यांनी आपल्या यंत्रणेमार्फत शाळांपर्यंत तात्काळ पूर्ण करावे. त्यासोबत इ. ६ वी चे शिक्षक प्रशिक्षण घटकसंच जिल्हा स्तरापर्यंत पोचविण्यात येत आहेत, ते आपल्या ताब्यात
ठेवून जिल्हास्तर प्रशिक्षणावेळी त्याचा उपयोग करावा. तालुकानिहाय वितरण तपशील यासोबत देण्यात आलेला आहे.
सोबत – शिक्षकांसाठी सेतू अभ्यास मार्गदर्शक सूचना व तपशील.










