राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये माता- पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करणेबाबत shaikshanik melava ayojan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये माता- पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करणेबाबत shaikshanik melava ayojan paripatrak 

संदर्भ

– १. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०) मार्गदर्शक तत्त्वे.

२. केंद्र शासनाचे निपुण भारत’ (NIPUN Bharat) अभियान परिपत्रक

३. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, दि. २७ ऑक्टोबर २०२१

४. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) अभियानांतर्गत गृहभेट व पालक जागृती कार्यक्रम

५. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, दि २९ जून २०२२

६. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, दि ५ मार्च २०२५

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ हा उपक्रम एका व्यापक सामाजिक चळवळीच्या रूपात आयोजित करण्यात येत आहे. हा मेळावा शाळांमधील नेहमीची साधी किंवा औपचारिक मासिक सभा म्हणून न ठेवता, माता-पालकांशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्यासाठी एक प्रभावी प्रक्रिया विकसित करण्याच्या दृष्टीने आयोजित करावा. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासात आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये शाळेइतकाच कुटुंबाचा, आणि विशेषतः “आईचा” सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, शाळेतील त्यांची उपस्थिती टिकवून ठेवणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे यासाठी शाळा आणि माता पालक यांच्यात सातत्यपूर्ण सुसंवाद असणे काळाची गरज आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०) आणि केंद्र शासनाच्या ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत इयत्ता दुसरीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी “पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान” म्हणजेच वयानुरूप वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. ही केवळ शासकीय पातळीवरील योजना नसून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास साधता येण्यासाठी आवश्यक तयारी आहे. याबाबत तसेच शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत (उदा. मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, नवीन अभ्यासक्रम व त्यानुसार पाठ्यपुस्तके, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, व्यावसायिक शिक्षक, PAT उपस्थिती भत्ता आणि डिजिटल शिक्षण इ.) माहिती मातांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. बालकाच्या सुरुवातीच्या

वर्षांत त्याच्या सर्वांगीण विकासाची खरी पायाभरणी घरातूनच होत असल्याने, मातांनी जागरूक होऊन मुलांच्या गुणवत्ता विकासाची कौटुंबिक जबाबदारी स्वतःहून स्वीकारणे महत्वाचे आहे.

माता पालक शैक्षणिक मेळाव्याचे मुख्य उद्देश:-

१. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यात सुसंवाद व समन्वय असणे (सूचना, तक्रारी व अपेक्षा यावर मुक्त चर्चा, APAAR ID, UDISE + व इतर शैक्षणिक नोंदी, आवश्यक कागदपत्रे व माहिती अद्ययावत ठेवणे. शाळेची ओळख व उद्दिष्टे, शाळेची कार्यपद्धती, ध्येय व मूल्ये)

२. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांना देणे, (मूल्यमापन पद्धती व परीक्षा वेळापत्रक, वाचन संस्कृती व घरातील अभ्यास, घरी अभ्यासासाठी योग्य वातावरण, वाचनाची सवय विकसित करण्यासाठी उपाय)

३. विद्यार्थ्यांची उपस्थिती, उपस्थितीचे महत्व, विद्यार्थ्यांचे वर्तन व अध्ययनातील अडचणी यांवर चर्चा करणे. गळती व गैरहजेरी रोखणे

४. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग वाढविणे. (आरोग्य व पोषण, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, स्वच्छता, पौष्टिक आहार व सुरक्षितता, बालसुरक्षा व बालहक्क, बाल संरक्षण.)

५. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती पालकांपर्यंत पोहोचविणे. (विविध योजना, वार्षिक नियोजन, शाळेतील महत्त्वाचे कार्यक्रम, स्नेहसंमेलन, सहल, स्पर्धा व उपक्रमांची माहिती प्राथमिक, माध्यमिक असे शाळांचे प्रकार लक्षात घेता विषयांत आवश्यकतेनुसार बदल करावा इत्यादी)

६. माता-पालकांनी शैक्षणिक कामकाज, शैक्षणिक उपक्रम यामध्ये सहभागी होणे,

माता पालक शैक्षणिक मेळाव्यांचे महत्त्व :-

मुलांच्या जडणघडणीत आईची भूमिका मध्यवर्ती असते. माता पालक बैठकीच्या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या घरातील शैक्षणिक वातावरण आणि संभाव्य अडचणी समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, मातांनाही शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम, मुलांची प्रगती आणि त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती याबाबत योग्य मार्गदर्शन मिळते. हा दुहेरी संवाद मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि शाळेविषयी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी अत्यंत पोषक ठरतो. या मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक आईला मी माझ्या मुलाच्या / मुलीच्या शिक्षणात महत्वाची भूमिका बजावू शकते असा आत्मविश्वास मिळेल. या दृष्टीने माता पालक मेळावा महत्वाचा आहे.

१. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घर व शाळा यांच्यातील (पालक व शिक्षक) समन्वय वाढतो.

२. विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखून त्यावर योग्य उपाययोजना करता येतात.

३. पालकांचा शाळेवरील विश्वास व शालेय उपक्रमातसहभाग वाढतो.

४. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नियमितता व गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण होते.

५. माता पालकांचा शैक्षणिक तयारीत / उपक्रमात सहभाग वाढतो.

६. शिक्षकांचे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तरदायित्व निर्माण होते.

माता पालक शैक्षणिक मेळावा आयोजनासंदर्भातील सूचना :-

१. प्रत्येक शैक्षणिक वर्षात चार वेळा मेळाव्याचे आयोजन करणे (जुलै, ऑक्टोबर, जानेवारी व एप्रिल महिन्यात

पहिल्या शनिवारी)

२. सदर विशेष मेळाव्याचे आयोजन राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या (शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित) सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष शाळास्तरावर केले जाईल.

३. जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती (SMC) यांची माता पालक मेळावा आयोजित करण्याची प्राथमिक जबाबदारी असेल, जिल्हा शिक्षण विभाग स्थानिक पातळीवरील परिस्थिती नुसार या मेळाव्यांच्या अंमलबजावणीचे नियोजन करेल.

४. मेळाव्याचे आयोजन कसे करावे व काय काळजी घ्यावी

४.१ – मेळाव्याचे आयोजन/नियोजन करताना शिक्षकांनी किंवा समिती सदस्यांनी मातांना वैयक्तिक फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे निमंत्रण द्यावे. संवादाची भाषा कोणतीही क्लिष्ट शासकीय शब्दरचना न वापरता अतिशय साधी, सोपी व स्थानिक बोलीभाषेसारखी असावी. शिक्षकांनी निवडक मातांना बैठकीत त्यांचे अनुभव मांडण्यासाठी पूर्वतयारी करावयास सांगावी, जेणे करून बैठकीत त्यांचे अनुभव ऐकून इतर मातापालक चर्चेत सहभागी होतील. बैठक व्यवस्था

गरजेनुसार करावी आणि सोबत येणाऱ्या लहान मुलांमुळे बैठकीत अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्या खेळण्याची वेगळी सोय करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.

४.२ – ” माता- पालक शैक्षणिक मेळाव्याचे मुख्य उद्देश” यात नमूद बाबींसंदर्भात सविस्तर माहिती सांगावी, चर्चा करावी, माता -पालकांची मते / आवड लक्षात घेऊन त्यांचा शैक्षणिक उपक्रमात सहभाग घ्यावा. विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या विविध पैलूसंदर्भात शिक्षक व माता पालक यांनी चर्चा करावी.

४.३ – मेळाव्याच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील चांगल्या गोष्टी सांगून घरात खेळत-बागडत अभ्यास कसा करून घ्यावा यावर भर द्यावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कमतरता किंवा त्रुटी, कोणत्याही तक्रारी वा नकारात्मक चर्चा न करता सुलभन करावे. सकारात्मक संवादामुळे पालकांचा शाळेवरील विश्वास आणि सहभाग वाढतो. मेळाव्यामध्ये मातांना त्यांचे विचार, अडचणी व प्रश्न मांडण्याची पूर्ण संधी देऊन बोलते करावे, जेणेकरून मेळावा एकतर्फी होणार नाही.

४.४ रोज २० मिनिटे मुलांसोबत असा उपक्रम या माध्यमातून घ्यावा. माता पालकांनी विद्यार्थ्यांशी शाळेतील अध्ययन – अध्यापन याबाबत चर्चा करणे, वाचन लेखन, गोष्टींची पुस्तके, सांगितलेला अभ्यास, आरोग्यदायी सवयी, आवडता /नावडता विषय घटक यावर मुलांशी बोलावे/ ऐकावे/कृती घ्याव्यात / माहिती सांगावी.

४.५ – निपूण महाराष्ट्र अंतर्गत माता पालक गट कार्यरत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून या विद्यमान गटामधील मातांचा मेळावा आयोजनामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. इतर माता पालकांना या गटांशी जोडून घ्यावे. प्राथमिक स्तरावर निपूण महाराष्ट्र अभियानाच्या अंमल बजावणीच्या दृष्टीने वाचन लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया याबाबत खेळ, कृती, प्रात्यक्षिक करुन दाखवावे.

४.६ – मेळाव्याच्या समाप्तीनंतर शाळास्तरावर मातांची उपस्थिती, प्रमुख चर्चा, छायाचित्रे आणि निश्चित केलेले संकल्प व कृती यांची पद्धतशीर नोंद ठेवावी. तसेच या मेळाव्यातून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने आवश्यक अंमलबजावणी करावी. तसेच स्थानिक गरजांनुसार शाळा विकास आराखड्यात त्याचा समावेश करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘माता पालक शैक्षणिक मेळाव्याचे’ प्रभावीपणे आयोजन करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात. या मेळाव्यांचे नियोजन करून त्यात जास्तीत जास्त मातांचा सहभाग राहील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन त्याचा एकत्रित अहवाल वेळोवेळी या संचालनालयास सादर करावा.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment