शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करणेबाबत shikshakitar padavaril niyukti
संदर्भ: शासन पूरकपत्र क्र. एसएसएन १०९९/ (३४०/९९) माशि-२, दि.१०.०६.२००५.
प्रस्तावना: राज्यात शिक्षक अभियोगयता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन २०१७ पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरकपत्रकान्वये शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे, ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः
उक्त संदर्भाधीन शासन पूरकपत्र दिनांक १०.०६.२००५ मधील परिच्छेद क्र. ८ येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे –
“शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर, अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यास शिक्षणसेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षणसेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल.”
सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.
प्रत,
०२. शिक्षकेत्तर पदावरुन शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात/परिपत्रकात/संलेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहेत.
०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०३२५१७३७०६,३९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










