भारतातील पहिली महिला शिक्षिका, ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले krantijyoti savitribai fule jayanti bhashan
भारतातील पहिली महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, समाजसेविका, समाजसुधारक, कवयित्री, ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह १३ वर्षीय ज्योतिरावांशी झाला. त्यांनी सावित्रीबाईंना लिहायला, वाचायला शिकविले. सावित्रीबाईंनी अहमदनगर व पुणे येथून अध्यापिकेचे /शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण केले.
१ जानेवारी १८४८ रोजी ज्योतिरावांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत सुरुवातीला फक्त सहाच मुली होत्या. या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. त्यानंतर या फुले दाम्पत्यांनी मुली व अस्पृश्यांच्या मुलांसाठी पुणे व परिसरात जवळपास १८ शाळा सुरू केल्या. यासाठी त्यांना ज्योतिरावांची मावस बहिण सगुणाबाई यांचे मार्गदर्शन तर ज्योतिरावांचे मित्र उस्मान शेख व त्यांच्या भगिनी फातिमा शेख यांचे सहकार्य लाभले. परंतु हे काम करत असताना सनातनी लोकांनी त्यांच्या अंगावर चिखल, शेण टाकले, दगड-गोटे भिरकावले, पाणी टाकले, त्यांना शिव्या दिल्या. एवढेच नाही तर ज्योतिरावांचे वडील गोविंदराव यांनी या फुले दाम्पत्याला घराबाहेर काढले. तरीही त्यांनी न डगमगता आपले शैक्षणिक व सामाजिक कार्य चालूच ठेवले. त्यांच्या या शैक्षणिक कार्यामुळे १६ नोव्हेंबर १८५२ रोजी मेजर थॉमस कँडी या इंग्रज अधिकाऱ्याच्या हस्ते पुण्यातील विश्रामबागवाड्यात या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

समाजातील बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, सती पध्दत, केशवपन यासारख्या कुप्रथांना त्यांनी विरोध केला.केशवपन पध्दत बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करून त्यांचा संप घडवून आणला. विधवांनी आत्महत्या अथवा भ्रूणहत्या करू नये म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवा स्त्रियांचे सुखरूप बाळांतपण करून त्यांचा सांभाळ केला. विधवा पुनर्विवाहाचा कायदा होण्यासाठी प्रयत्न केला व प्रोत्साहन दिले. आत्महत्या करायला निघालेल्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. पुढे त्यांनी त्याला डॉक्टर बनविले. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या त्या महिला विभाग प्रमुख होत्या. यामार्फत दुष्काळात त्यांनी अन्नछत्रे चालविली, अनाथालये सुरू केली. सावित्रीबाईंनी काव्यफुले (१८५४), सावित्रीबाईची गाणी (१८९१), बावनकशी सुबोध रत्नाकर (१८९२) यासारख्या काव्यसंग्रहाचे लेखन केले. तसेच स्वतःची व ज्योतिरावांची भाषणे प्रकाशित केली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिरावांचे पुण्यात निधन झाले. यशवंतला होणाऱ्या समाजातील विरोधामुळे सावित्रीबाईंनी स्वतः ज्योतिरावांचे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. १९ व्या शतकाच्या शेवटी पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे यशवंतला सोबत घेऊन पुण्यातील हडपसरजवळील ससाणेच्या माळावर त्यांनी दवाखाना सुरू केला. अशातच मुंढव्यातील पांडुरंग बाबाजी गायकवाड या महार जातीतील मुलाला वाचविताना सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली. त्यामुळे १० मार्च १८९७रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. १९९५ पासून भारतभर त्यांचा जन्मदिन हा ‘बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने २०२० साली त्यांचा जन्मदिन ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.









