विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision- SIR) कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून शिक्षकांच्या नियुक्तीबाबत
संदर्भ : या कार्यालयाचे समक्रमांकाचे दिनांक २७ जून, २०२६ रोजीचे पत्र.
महोदय,
भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १४.०५.२०२६ रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision- SIR) कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये दिनांक २० जून, २०२६ पासून सुरु झाला आहे. दिनांक ३० जून, २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer – BLO) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्र देणे व भरुन घेण्याची कार्यवाही करत आहेत.
२. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत राज्य शासकीय/ स्थानिक प्राधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल सिव्हील अपील क्र. ५६५९/२००७ (भारत निवडणूक आयोग विरुध्द सेट मेरी स्कूल व इतर) या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशानुसार भारत निवडणूक आयोगाने दिनांक २८.०१.२००८ च्या पत्रान्वये शिक्षकांना रजेच्या दिवशी, अशैक्षणिक दिवशी तसेच अशैक्षणिक तासांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कर्तव्ये पार पाडण्याबाबत सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
३. मा. सर्वोच्च न्यायालयाचे वरील प्रकरणी दिलेले आदेश तसेच त्यानुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या सुचना विचारात घेऊन तसेच शिक्षकांच्या अध्यापन कामामध्ये खंड पडु नये या कारणास्तव विशेष सखोल पुनरिक्षणाच्या कामासाठी (SIR) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी तसेच शैक्षणिक कर्तव्याच्या वेळेनंतर सोपविण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना या कार्यालयाच्या दिनांक २७.०६.२०२६ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. (पत्राची प्रत सोबत जोडली आहे.)
४. विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या दोषविरहीत व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण सुमारे २४ वर्षांनंतर राबविण्यात येत आहे. सदर काम राष्ट्रीय कर्तव्य असुन भारत निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सबब, शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज पार पाडण्याकरीता त्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच सदर काम विहित कालावधीत पूर्ण व्हावे आणि त्यांच्यावर कामाचा ताणही येवू नये,
याकरीता सर्व शाळा प्रशासनांना आपल्या स्तरावरुन खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात, अशी आपणांस विनंती आहे.
अ) विशेष सखोल पुनरिक्षणाच्या कालावधीत, ज्या शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे त्यांच्या शिकवणीच्या तासिका शक्यतो कमीत कमी व सलग कालावधीत ठेवण्यात याव्यात जेणेकरुन सदर शिक्षकांना त्यांचे दिवसाचे शैक्षणिक काम सलग पूर्ण करुन उर्वरित वेळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कर्तव्य पार पाडता येईल.
ब) ज्या शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती देण्यात आलेली नाही, अशा शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना त्यांच्या BLO च्या कामात सहाय्य करण्याबाबत सूचित करण्यात यावे. ज्यायोगे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांवर अतिरीक्त भार येणार नाही.










