“महानता” मराठी बोधकथा marathi bodhkatha
महानता
पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांची राहणी साधी, पण विचारसरणी उच्च होती. दिसायला लहान पण कर्तृत्वाने व चारित्र्याने महान असे राष्ट्रनेते शास्त्रीजी होते. ते पंतप्रधान असतानाची गोष्ट. एके दिवशी आपल्या पत्नीला ललितादेवींना साडी आणण्यासाठी दुकानात गेले. त्यांना पाहून दुकानदाराने फार भारी रेशमी साड्या दाखवल्या. त्या हजार, दोन हजार किमतीच्या होत्या.
शास्त्रीजी म्हणाले, “अरे, एवढ्या महाग साड्या मला परवडणार नाहीत. दुसऱ्या साध्या व स्वस्त साड्या दाखवा.”
तेव्हा दुकानदार म्हणाला, “आपण पैशाची कशाला काळजी करता? मी थोडेच तुमच्याकडून पैसे घेणार आहे?” ते ऐकताच शास्त्रीजी एक दोन पावले मागे सरकले. जणू पुढे साप आहे आणि त्याच्या फण्यात लाचलुचपतीचे विष आहे, असा त्यांना भास झाला.
सात्त्विक संतापाने पंतप्रधान लाल होत उद्गारले, “महाशय! मी भारताचा पंतप्रधान अशासाठी नाही झालो की, अशा प्रकारे भेटी घेत फिरू! यापुढे एक शब्दही बोलू नका. अभद्र व्यवहारही करू नका. कृपया, मला परवडतील, अशाच साड्या दाखवा.” शास्त्रीजींनी मग स्वस्त साड्या घेतल्या व त्याचे पैसे चुकते करून दुकानातून बाहेर पडले.









