“दृष्टिकोन बदला” मराठी बोधकथा marathi bodhkatha
दृष्टिकोन बदला
एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरलेले होते. त्यामुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावरच राहत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचे कार्यही हे झाड प्रामाणिकपणे करत होते. त्यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. मात्र कालांतराने झाडाला या गोष्टीचा गर्व झाला. माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे, असा भ्रम त्याला झाला.
काही काळाने झाडाला फळे व फुले येण्याचे बंद झाले. पानांची गळती सुरू झाली. सावली नसल्याने वाटसरू येईनात, फळे नसल्याने पक्षी उडून गेले. झाडाला वाईट वाटले. त्याने तिथून जाणाऱ्या एका सद्गुरुषाला विचारले की, “आयुष्यभर मी सर्वांची सेवा केली, पण माझ्या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूससुद्धा करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्याची भाषा करत आहेत.”
सपुरुष म्हणाले, “अरे, वृक्षराजा, तू विचार करण्याची पद्धत बदल. जीवनभर कल्याणासाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्यूनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्या स्मरणातच राहणार आहेस. तेव्हा तू मरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल.”









