राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी भाषण bharatratna do babasaheb ambedkar jayanti bhashan
दीनदलितांच्या उद्धारा, केले जीवाचे रान.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते, लिहिले भारतीय संविधान.
केला चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन.
अशा या महामानवाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन ……..
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ…
बा-बाणेदार ते स्वभावाने,
बा- बारकाईने अभ्यास करणारे,
सा-साधक ते बौद्ध धर्माचे,
हे- हेतू ज्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा,
ब- बदल समाजात घडवून आणणारे.
अनेक वर्ष चार्तुवर्णव्यवस्थेच्या नावाखाली, अन्याय सहन करणारे समाज बांधव. ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून, त्यांचे अश्रु पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. पुसण्या त्यांचे अश्रू, देण्या दीनदलितांना नवसंजीवन. अवतरला एक महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव…
अशा या महामानवाचा, युगप्रवर्तकाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई.
आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजीं मुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला यात तिळमात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी बी.ए, एम.ए, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डी. लिट अशा अनेक पदव्या संपादन केल्या.
‘मला माणसांच्या सहवासा पेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो’, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’, असे मौलिक विचार त्यांनी सांगितले.
‘माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्या सागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल,’ असे त्यांचे मत होते. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’. हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला.
बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाड येथील चवदार तळे. तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते.
त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी ओंजळीने पिले. त्यानंतर अनुयायांनी चवदार तळ्याचे पाणी पिले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की, दलितांच्या सर्व समस्या मनुस्मृति मुळे निर्माण झालेले आहेत. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले.
भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं? अन्यायाविरुद्ध लढावं कसं? संघर्षातून घडावं कसं? वादळात समोर उभं रहावं कसं? आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं? हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे, संपूर्ण जगाला दाखवून दिले.










