शैक्षणिक बातम्या educational news




टीईटी’ पॅटर्न बदलला; पाठांतर बाजूला, कस बुद्धीचाच!
प्रश्नांच्या वाढत्या काठिण्यपातळीने सहा लाख उमेदवारांची वाढणार धाकधूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शिक्षक पात्रता
परीक्षेने (टीईटी) यंदा अर्जसंख्येचा सहा लाखांचा उच्चांक गाठला असला तरी, यशाचा मार्ग पूर्वीपेक्षा अधिक खडतर झाला आहे. केवळ पुस्तकीज्ञान किंवा जुन्या प्रश्नपत्रिकांच्या सरावावर या परीक्षेत उत्तीर्ण होणे आता कठीण झाले असून, प्रश्नांच्या स्वरूपात झालेले सूक्ष्म बदल उमेदवारांच्या पात्रतेचे गणित बिघडवू शकतात. येत्या २१ जून रोजी होणाऱ्या या परीक्षेत काठिण्य पातळी हाच निकालाचा खरा ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार आहे.
पूर्वी टीईटीमध्ये थेट आणि माहितीवर आधारित प्रश्न विचारले जात असत. मात्र, गेल्या काही परीक्षांपासून प्रश्नांचा कल हा उपयोजनात्मक झाला आहे. बालमानसशास्त्रात आता केवळ व्याख्या न विचारता वर्गातील प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्यावर भर दिला जात आहे, तर गणित आणि विज्ञानात तार्किक विचार क्षमता तपासली जात आहे. अर्जाचा महापूर आल्याने खऱ्या अर्थाने पात्र उमेदवार निवडण्यासाठी परीक्षा परिषदेने प्रश्नांचा दर्जा केंद्रीय स्तरावरील सीटीईटीच्या धर्तीवर नेला आहे. त्यामुळेच, ६ लाख उमेदवारांच्या या महासंग्रामात केवळ अभ्यासातील सखोलता असलेल्यांनाच संधी मिळणार आहे.
निकालाचा चढ-उतार : यशाची टक्केवारी
२०१३ (सुरुवात) : ६.२९ लाख उमेदवारांपैकी ४.९३ टक्के उमेदवार पात्र ठरले.
२०१५ (सर्वांत कठीण): निकालाचा टक्का घसरून थेट ०.८५ टक्क्यावर आला.
२०१८-२०२१ : निकालात किंचित सुधारणा झाली, तरीही सरासरी प्रमाण ३ ते ४ टक्क्यांवरच राहिले.
२०२६ (अंदाज) : ६ लाख उमेदवारांपैकी साधारण १८ ते २४ हजार (३ ते ५ टक्के) उमेदवार पात्र ठरण्याची शक्यता आहे.
प्रश्नांचे स्वरूप खालील बारकाव्यांवर आधारित
१. संकल्पना स्पष्टता: पाठांतरापेक्षा विषयाची मूळ संकल्पना समजून घेण्यावर भर.
२. वेळेचे नियोजन प्रश्न मोठे आणि विश्लेषणात्मक असल्याने वेळेत पेपर सोडवणे हे मोठे आव्हान असेल.
३. काठिण्य पातळी : प्राथमिक (पेपर १) आणि उच्च प्राथमिक (पेपर २) या दोन्ही स्तरांवर प्रश्नांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
४. गुण सुधारण्यावर भर : अनेक जुन्या पात्र उमेदवारांनी स्कोर वाढवण्यासाठी अर्ज केल्याने चुरस अधिक वाढली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖




























