गुणग्राहक राजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज gungrahak raja 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुणग्राहक राजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज gungrahak raja 

तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले. बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते, एवढ्यात मुलांचा हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकू आला. महाराजांनी घोडा थांबवला. आवाजाच्या दिशेनं पाहिलं. तिथं एक वडाचं झाड होते. एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला. दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता. पहिल्यानं पारंबी पकडली. माकडासारखा झोका घेतला. घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला. दोघा पोरांचा सुरपारंबीचा खेळ सुरू झाला. सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले. मनानं त्यांच्या बालपणातील ‘मौजे कवळाणे’ गावी आले. तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले. पोरांसोबत सुरपारंबी खेळ खेळू लागले.

थोड्या वेळानं महाराज भानावर आले. स्वतःशी हसले. निघताना मानकऱ्यांस म्हणाले, “पोरं चपळ आहेत. कोणाची पोरं आहेत ही ? वि‌द्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा.”

सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले; पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती. घडलेला प्रसंग त्यांनी महाराणीसाहेबांना सांगितला. त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री. काटावालांना बोलावलं. नजरपागेतली ती पोरं शोधून आणायचा हुकूम केला. नारायणराव घाटगे यांनी त्या पोरांची नावं व राहण्याचं ठिकाण सांगितलं.

विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला. त्यानं पोरांचा शोध घेतला. गजानन आणि काळूला साहेबांकडे घेऊन आला. “झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खूश झाले. हा खेळ महाराणीसाहेबांनाही पाहायचाय. उदया तिसऱ्या प्रहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या!” विद्याधिकारी म्हणाले.

गजानन हा यशवंतराव माणिकचा, तर काळू रहिम चाबूकस्वाराचा मुलगा होता. महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं. गल्लीत वार्ता पसरली. पोरांची उत्सुकता वाढली. तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली, कारण महाराज शिस्तीचे होते.

दुसरा दिवस उजाडला. विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले. दोघांचे सदरे मळलेले होते. चेहऱ्यावर मात्र तरतरी होती.

राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं. महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तिथे आले. बरोबर तीन राजपुत्रही होते. बसण्यासाठी बाजूला सोफे ठेवले होते.

“काय नाव बाळांनो तुमचं ?” महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला, “माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबूकस्वार.”

“छान ! आम्ही परवा तुमचा सुरपारंबीचा खेळ पाहिला. आज राणीसाहेबांना तो दाखवा.”

गजानननं काळूला खूण केली. मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता. दीड हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती. काळूनं सूर हाती घेतला. एक पाय थोडा उचलून पायांखालून सूर दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला.

काळू आणि गजाननची झाडावर चढण्या-उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजानननं काळूला पकडलं. आता गजानननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली. पुन्हा तो खोडावर चढला.

गजाननला बाद करणं काळूला जमेना. दोन्ही पोरं धावपळीनं घामाघूम झाली. महाराजांनी खेळ थांबवला. दोघांना जवळ बोलावलं. खुशीत त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले, “छान खेळलात. खेळात हारजीत महत्त्वाची नाही. खेळणं महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हांला बक्षीस देणार आहोत.”

महाराजांनी घाटग्यांना खूण केली. एका तबकात जरीच्या दोन टोप्या होत्या. त्यांनी गजाननला जवळ बोलावले. “तू हरला नाहीस म्हणून ही भरजरी टोपी बक्षीस.” असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली. काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, “तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे.’

“तुमचा खेळ पाहताना आम्हांला आनंद झाला. एवढंच नाही, तर आम्ही खेळत आहोत, असा अनुभव

घेत गेलो.” महाराज म्हणाले. त्यांनी पोरांना बसवलं. मिठाई खाऊ घातली.

पोरं घोडागाडीतून घरी परतली. त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहल्लाभर पसरली.

गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. महाराजच बक्षीस समारंभासाठी आले होते. एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला. अभ्यासात, चित्रकलेत, एवढंच काय हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता. अठरा बक्षिसं त्या पोरानं घेतली. महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं. त्याला बघून त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, “बघू तुझं हस्ताक्षर !”

गजानननं कागद-शाई मिळवली. कामटीचा बोरू केला. कागदावर लिहिलं ‘श्रीमंत सयाजीराव महाराज की जय !’ महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. विद्याधिकाऱ्यांकडे वळून ते म्हणाले, “पोरगा गुणी आहे. त्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे.”

हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाला.

Leave a Comment